टिकटॉक: अमेरिकेत येत्या 48 तासांमध्ये टिकटॉक आणि विचॅट बंद होणार

टिकटॉक

अमेरिकेत येत्या 48 तासांमध्ये टिकटॉकवर आणि विचॅटवर बंदी आणण्यात येणार आहे.

अमेरिकेच्या वाणिज्य मंत्रालयाने ही दोन्ही अॅप्स यूएस अॅप्स स्टोअरवरुन काढली जातील. अमेरिकन लोक ते डाऊनलोड करू शकणार नाहीत.

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप शेवटच्या क्षणी समझोत्याला राजी झाले तरच हा निर्णय थांबू शकेल.

चिनी अॅप्स अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोकादायक ठरू शकतात. या कंपन्या अमेरिकेन लोकांचा खासगी डेटा चीनला देऊ शकतात अशी भीती त्यांना वाटते. अर्थात चीन आणि चिनी कंपन्यांनी हे आरोप सतत फेटाळले आहेत.

भारतापाठोपाठ अमेरिकेतही टिकटॉकवर बंदी आणली गेलीय. 7 ऑगस्ट रोजीच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी टिकटॉकवरील बंदीच्या आदेशावर स्वाक्षरी केली.

या बंदीविरोधात टिकटॉक आता कायद्याचे दार ठोठावणार आहे. याच आठवड्यात ट्रंप प्रशासनानं घातलेल्या बंदीविरोधात टिकटॉक कंपनीकडून कायदेशीर कारवाईला सुरुवात केली जाण्याची शक्यता आहे.

7 ऑगस्ट 2020 रोजी डोनाल्ड ट्रंप यांनी ज्या आदेशावर स्वाक्षरी केली, त्यानुसार चीनमध्ये निर्माण झालेल्या टिकटॉक आणि विचॅट या व्हीडिओ शेअर करणाऱ्या सोशल मीडिया अॅप्सवर येत्या 45 दिवसांत म्हणजेच 15 सप्टेंबरपर्यंत अमेरिकेत बंदी येण्याची शक्यता आहे.

ही बंदी टाळण्यासाठी चीनमधल्या या अॅप्सच्या मालकांना त्यांची यातली भागिदारी अमेरिकन व्यावसायिकांना विकावी लागणार असल्याची अटही ट्रंप यांनी आदेशात घातली आहे. यासाठी 15 सप्टेंबरपर्यंतची मुदत त्यांच्या हातात आहे.

मुख्य म्हणजे 45 दिवसांनंतर जर अमेरिकेतल्या कोणीही जर टिकटॉक किंवा वी-चॅटचा वापर केला तर त्यांच्या कायदेशीर कारवाई करण्याचे संकेतही या आदेशात देण्यात आले आहेत.

एकट्या अमेरिकेत टिकटॉकचे 8 कोटी युजर्स आहेत. त्यामुळे बंदीचा अर्थातच टिकटॉकला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

टिकटॉक राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोकादायक - ट्रंप प्रशासन

टिकटॉक अॅपकडे गेलेल्या डेटाचा अॅक्सेस चीनच्या कम्युनिस्ट पार्टीला मिळत असल्याचा दावाही ट्रंप प्रशासनाने केला आहे. यामुळे अमेरिकन नागरिकांची माहीती चीनच्या सरकारला मिळत असून हा राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोका असल्याचं त्यांनी म्हटलंय.

बाईट डान्स कंपनीने याबद्दल म्हटलंय की, "आम्ही गेले वर्षभर आमच्या कामाची माहीती ट्रंप प्रशासनापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करत आहोत. पण, त्यांच्याकडून लक्ष दिलं गेलेलं नाही. उलट त्यांनी आतापर्यंत आमच्याबाबतीत घेतलेले निर्णय एकतर्फी आहेत. त्यामुळे योग्य आणि न्यायाची बाजू सावरून धरण्यासाठी आम्ही हरतर्हेने प्रयत्न करू आणि त्यासाठी न्यायालयातही जाऊ"

टिकटॉक

फोटो स्रोत, Reuters

जर भारतापाठोपाठ अमेरिकेतही बंदी आल्यास टिकटॉकची मुख्य कंपनी असलेल्या बाईटडान्सला जबर फटका बसू शकतो.

विचॅट अॅपची मालकी असलेल्या टेंसेंट कंपनीने आम्ही या आदेशाचा अभ्यास करत असल्याचं म्हटलंय. टेंसेंट ही जगातली आघाडीची गेमिंग क्षेत्रातली कंपनी आहे. एपिक गेम्स या मोठ्या कंपनीत टेंसेंटचा 40 टक्के हिस्सा आहे.

टिकटॉकची विक्री होणार?

डोनाल्ड ट्रंप यांनी अमेरिकेत टिकटॉकवर बंदीचे संकेत देण्याची वेळ खूप महत्त्वाची मानली जातेय. याचं कारण टिकटॉकच्या विक्रीची सध्या चर्चा सुरू झालीय. त्यातही मायक्रोसॉफ्ट ही बलाढ्य सॉफ्टवेअर कंपनीच टिकटॉक खरेदी करणार असल्याचेही अंदाज बांधले जात आहेत.

मायक्रोसॉफ्ट आणि बाईट डान्स कंपनीत चर्चा सुरू आहे. मायक्रोसॉफ्टची त्यांच्यासोबतची बोलणी यशस्वी झाली तर टिकटॉकचा अमेरिकेतल्या उद्योगाचा हिस्सा मायक्रोसॉफ्ट विकत घेईल. यासाठी बोलणी करून व्यवहार पूर्ण करण्यासाठी दोन्ही कंपन्यांकडे येत्या 15 सप्टेंबरपर्यंतचा अवधी आहे.

टिकटॉक

फोटो स्रोत, Getty Images

टिकटॉकनं आपल्या स्पष्टीकरणात म्हटलंय की, आम्ही अफवा किंवा अंदाजांवर कुठलची प्रतिक्रिया देत नाही. आम्हाला टिकटॉकच्या दीर्घकालीन यशावर विश्वास आहे.

बाईटडान्सने टिकटॉक अॅपचं अमेरिकेत 2017 साली लॉन्चिंग केलं. त्यानंतर म्युझकली नावाच्या व्हीडिओ प्लॅटफॉर्मची खरेदी केली. अमेरिका आणि युरोपमधील तरुणाईमध्ये 'म्युझिकली' प्रचंड लोकप्रिय आहे.

'टिकटॉक' आहे तरी काय?

'टिकटॉक' एक सोशल मीडिया अप्लिकेशन आहे. या अॅपवरून युजर छोटे-छोटे (पंधरा सेकंदांपर्यंतचे) व्हिडियो तयार करून शेअर करू शकतात.

या अॅप्लिकेशनचे कॉपी राईट 'बाईट डान्स' या चीनी कंपनीकडे आहे. या कंपनीने सप्टेंबर 2016 मध्ये 'टिकटॉक' अॅप लॉन्च केलं. 2018साली या अॅपची लोकप्रियता प्रचंड वाढली आणि ऑक्टोबर 2018 मध्ये अमेरिकेत ते सर्वाधिक डाउनलोड केलेले अॅप ठरले.

टिकटॉक

फोटो स्रोत, Getty Images

गुगल प्लेस्टोरवर टिकटॉकची ओळख 'Short videos for you' (तुमच्यासाठी छोटे व्हीडिओज) अशी करून देण्यात आलेली आहे.

प्ले स्टोरवर टिकटॉक विषयी लिहिलं आहे -

मोबाईलवर छोटे-छोटे व्हीडियो बनवण्यासाठी टिकटॉक हे काही सामान्य माध्यम नाही. हे बनावट नाही. खरे आहे आणि ते अमर्याद आहे - तुम्ही सकाळी 7.45 वाजता ब्रश करत असाल किंवा नाश्ता बनवत असाल - जे काही करत असाल, जिथेही असाल, टिक-टॉकवर या आणि 15 सेकंदात जगाला तुमचं म्हणणं सांगा.

टिकटॉकच्या साथीने तुमच्या आयुष्यातील मजा वाढेल. तुम्ही आयुष्याचा प्रत्येक क्षण जगता आणि प्रत्येक क्षणी काहीतरी नवीन शोधता. तुम्ही तुमच्या व्हीडियोमध्ये स्पेशल इफेक्ट फिल्टर, ब्युटी इफेक्ट, इमोजी स्टिकर आणि म्युजिकने नवीन रंग भरू शकता.

टिकटॉक

फोटो स्रोत, Reuters

टिकटॉकची वैशिष्ट्यं

  • टिकटॉकवरून व्हिडियो तयार करताना तुम्ही तुमचा आवाज वापरू शकत नाही. तुम्हाला लिपसिंक करावं लागतं.
  • फेसबुक आणि ट्विटरवर ब्लू टिक मिळवण्यासाठी म्हणजेच आपले अकाउंट व्हेरिफाय करून घेण्यासाठी सामान्य व्यक्तींना बरीच मेहनत घ्यावी लागते. मात्र टिकटॉकवर वेरिफाईड अकाउंट असणाऱ्या वापरकर्त्यांची संख्या मोठी आहे. या अॅपवर ब्लू टिक नाही तर ऑरेंज टिक मिळतं.
  • ज्या युजर्सना ऑरेंज टिक मिळते त्यांच्या अकाउंटवर 'पॉप्युलर क्रिएटर' लिहिलेलं असतं. शिवाय अकाउंट बघितल्यावर युजरला किती हार्ट्स मिळाले आहेत, हे देखील कळतं. म्हणजेच किती लोकांना तो व्हीडियो आवडलेला आहे, हे कळतं.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)