कोरोना लॉकडाऊन : सायकल चालवून पाच वर्षांच्या चिमुकलीनं जमवले 21 हजार पौंड

सायकलिंग

फोटो स्रोत, FAYE ALLINSON

पाच वर्षांच्या एका चिमुरडीनं कोरोना व्हायरसच्या संकटकाळात दररोज एक मैल सायकलिंग करत 21 हजार पौंडाचा निधी जमवला आहे. शंभर दिवस सायकलिंग करत अधिकाधिक निधी जमा करण्याचा तिने निर्धार केला आहे.

लंडनच्या उत्तरेस असलेल्या हर्डफोर्टशायर या लहानशा गावात राहणारी बेट्टी ली अॅलिन्सन लॉकडाऊनच्या काळात सायकल चालवायला शिकली. तिची आजी ज्या रुग्णालयात काम करते, त्या रुग्णालयाला मदत करण्याची तिची इच्छा होती, त्यामुळे तिनं सायकलिंगचा उपक्रम हातात घेतला.

तिच्या या उपक्रमाची दखल प्रख्यात फुटबॉलपटू डेव्हिड बेक्हॅमने मे महिन्यात घेतली. "ती खरंच खूप भारी आहे," असं बेकहॅमनं म्हटलं होतं.

"मी जो काही निधी जमवला आहे, त्यामुळे मला खूप छान वाटतंय. पण आता मी थोडीशी थकलीये," बेट्टी सांगत होती.

बेट्टी ही इंग्लंडचे माजी फुटबॉलपटू इयान अॅलिन्सन यांची नात आहे. इयान अॅलिन्सन हे आर्सेनलकडून खेळायचे.

बेट्टीनं एप्रिल महिन्यात तिचा हा निधी गोळा करण्याचा उपक्रम सुरू केला होता. लॉकडाऊनमुळं तिची डिस्नेलँडची ट्रिप हुकली होती. त्याच्यासाठी तिने राखून ठेवलेले 7 पौंड तिच्याकडे होते. या रकमेपासूनच तिनं आपला निधी जमवायला सुरुवात केली.

तिची आई फेय अॅलिन्सनने सांगितलं की, "आम्हाला खूप भरभरून प्रतिसाद मिळाला."

सायकलिंग

फोटो स्रोत, FAYE ALLINSON

बेट्टीनं जो काही निधी जमवला आहे, तो सगळा गार्डनर हाऊस हॉस्पाइस केअरला दिला जाईल. कोरोना व्हायरसच्या काळात अनेक कार्यक्रम रद्द झाल्यानं या सुश्रुषा केंद्राला 25 हजार पौंडांची जी रक्कम मिळणं अपेक्षित होतं, ती मिळाली नव्हती.

"युरो डिस्नेलँडची तिची ट्रिप रद्द झाल्यानं ती चांगलीच नाराज झाली होती. तिची नाराजी दूर करून काहीतरी सकारात्मक काम करावं या हेतूनं आम्ही तिला म्हटलं की, आपण आजीला मदत करूया," बेट्टीची आई सांगत होती.

"आम्ही 500 पौंड जमा करण्याचंच उद्दिष्टं ठेवलं होतं. पण नंतर जास्तीत जास्त रक्कम जमा होत गेली. पण एवढी रक्कम आम्हाला अपेक्षित नव्हती."

संपूर्ण युकेमधून बेट्टीला फुटबॉल शर्ट भेट म्हणून आले. ती सायकलिंग करताना प्रत्येक दिवशी नवीन शर्ट घालते.

सायकलिंग करताना फुटबॉलची थीम वापरण्यामागची प्रेरणा ही बेट्टीचे आजोबा इयान आणि वडील ली होते. तिचे आजोबा इयान हे सध्या सेंट अलबन्स सिटी फुटबॉल टीमचे मॅनेजर आहेत, तर वडील ली हे हेन्डन टाउनचे इन चार्ज आहेत.

"आम्हाला मदत करण्यासाठी फुटबॉल कम्युनिटी एकत्र आली होती. हे खरंच खूप मोलाचं ठरलं. तिच्या आजोबांनाही बेट्टीचा खूप अभिमान वाटतो," बेट्टीच्या आई सांगतात.

सायकलिंग

फोटो स्रोत, FAYE ALLINSON

5 जुलै हा बेट्टीच्या उपक्रमाचा 75 वा दिवस होता. तिला कोणत्याही परिस्थितीत शंभर दिवस पूर्ण करायचे आहेत.

"ती अजिबात मागे हटत नाहीये. मला खरंच नवल वाटतंय. अगदी सुरूवातीला ती दिवसातून पाच वेळा तरी पडायची. रोजच्या मैलभराच्या अंतरात तिला खरचटायचं. धडपडत-रडत ती रोजचं ठरलेलं अंतर पूर्ण करायची."

गार्डनर हाऊस हॉस्पाइसच्या बेथ पॉवर यांनी म्हटलं, की या चिमुकलीचे आभार कसे मानायचे हेच आम्हाला कळत नाहीये. ती खरंच प्रेरणादायी आहे. तिनं जमवलेला प्रत्येक पैसा इथल्या स्थानिकांसाठी वापरला जाईल. त्यामुळे आमच्या इथे उपचार घेत असलेल्या प्रत्येक स्थानिक कुटुंबाला याची मदत होईल.

कोरोना
लाईन
YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)