आंद्रे डोलगोव : दुर्मिळ माशांची तस्करी करणारं जहाज जेव्हा पकडण्यात आलं...

फोटो स्रोत, Christopher Jones/NOAA
- Author, रिचर्ड ग्रे
- Role, बीबीसी फ्यूचर
आंद्रे डोलगोव किंवा STS-50 या जहाजाला कधी-कधी सी ब्रीज-1 या नावानेही ओळखलं जायचं. महासागरात चाचेगिरी करणारं हे जहाज होतं.
आंद्रे डोलगोव जहाज एका आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी नेटवर्कचा भाग होतं. अत्यंत सुनियोजित पद्धतीने ते काम करायचं.
आंद्रे डोलगोव सुमारे 10 वर्षं महासागरातील दुर्मिळ मासे पकडून त्यांची तस्करी करत होतं. याला पकडण्याच्या अनेक मोहिमा अपयशी ठरल्या. प्रत्येक वेळी चकवा देऊन पसार होण्यात हे जहाज पटाईत होतं.

- वाचा-कोरोना व्हायरसची नवी लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
- वाचा- मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोनावरची लस बनवण्याचं काम कुठवर आलं? येत्या सप्टेंबरपर्यंत लस येणार?
- वाचा- कोरोनाचं संकट कधी आणि कसं संपणार?

पण एके दिवशी समुद्री चाच्यांचं हे जहाज इंडोनेशियाच्या सुरक्षा दलाच्या तावडीत सापडलं. हे गंजलेलं, जुनं जहाज पाहून हेच जगातलं 'मोस्ट वाँटेड' जहाज आहे, यावर कोणाला विश्वासच बसला नसता.
इंडोनेशियाच्या नौदलाचे अधिकारी आंद्रे डोलगोववर चढले तेव्हा तिथं मासे पकडण्याच्या विशालकाय जाळ्यांचा खच पडला होता. तब्बल 29 किलोमीटरपर्यंत पसरवून ठेवता येतील, इतकं मोठं हे जाळं होतं.
याच्या मदतीने हे जहाज एकावेळी 60 लाख डॉलर किमतीचे मासे पकडू शकत होतं. या माशांची काळ्या बाजारात विक्री होत होती किंवा कायदेशीररीत्या पकडलेल्या माशांमध्ये मिसळून त्यांची विक्री केली जात होती.
या समुद्री चाच्यांच्या निशाण्यावर पूर्व आशियातील मलेशिया बेटांचा समूह तसंच इंडोनेशियातील सुमात्रा बेटांजवळचा समुद्री परिसर होता.
5 कोटी डॉलरचे मासे लुटले
समुद्री व्यापाराचे तज्ज्ञ सांगतात, समुद्रात पकडण्यात येणाऱ्या एकूण माशांपैकी 20 टक्के मासे बेकायदेशीरपणे पकडले जातात.

फोटो स्रोत, Sea shephard
बेकायदेशीररीत्या पकडल्यामुळे मासेमारीवर उदरनिर्वाह अवलंबून असलेल्या लोकांच्या आयुष्यावर वाईट परिणात होतो.
आंद्रे डोलगोवने मागच्या दहा वर्षांत सुमारे पाच कोटी डॉलरचे मासे समुद्रातून लुटल्याचा अंदाज आहे.
साधारणपणे, हे चाचे जहाज कोणत्याही देशाच्या अधिकार क्षेत्राबाहेरच्या परिसरात फिरत असतात. अशा ठिकाणी बेकायदेशीररीत्या कृत्य करणं त्यांना सोपं असतं.
या कामात अनेकवेळा सरकारी अधिकाऱ्यांचंही संगनमत असतं. भ्रष्टाचार, आर्थिक गैरव्यवहार आणि गुलामीसुद्धा या कामातील महत्त्वपूर्ण भाग आहे. या जहाजांमध्ये काम करणाऱ्या लोकांना मुख्यतः मानव तस्करीच्या माध्यमातून इथं आणलं जातं. पुढे त्यांना जहाजावरच बंदी बनवून ठेवण्यात येतं.
शिवाय समुद्री परिसंस्थेला धोकादायक असलेल्या शस्त्रांचा वापर हे समुद्री चाचे करतात. त्यामुळेच आंतरराष्ट्रीय पातळीवर या बेकायदेशीर जहाजांवर अंकुश लावण्यासाठी खूपच जास्त प्रयत्न केले जात आहेत.
1985 मध्ये जपानमध्ये बनलं होतं जहाज
आंद्रे डोलगोव या मोस्ट वाँटेड जहाजाचं खरं नाव शिनसेई मारू-2 होतं. हे 1985 मध्ये बनवण्यात आलं होतं.
कित्येक वर्षं हे जहाज जपानी सीफूड कंपनी मारूहा निचिरो कॉर्पोरेशनसाठी काम करायचं. तोपर्यंत जपान समुद्र आणि हिंदी महासागरात मासे पकडण्याचं काम हे जहाज करायचं. यानंतर आंद्र डोलगोव अनेक वर्ष इतर कंपन्यांसाठी मासे पकडण्याचं काम करत होतं.

फोटो स्रोत, Sea Shephard
2008 ते 2015 अंटार्क्टिक समुद्रात टूथफिश पकडण्यासाठीही तयार केलं गेलं होतं. टूथफिश दुर्मिळ आणि महाग मासा आहे. याला 'White Gold (पांढरं सोनं)' सुद्धा म्हटलं जातं.
हा मासा पकडण्यासाठी विशिष्ट परवान्याची गरज असते. पण आंद्रे डोलगोव हे काम बेकायदेशीरपणे करत होतं.
जहाजावर कधी लक्ष गेलं?
जहाजाच्या बेकायदेशीर कृत्यावर पहिल्यांदा ऑक्टोबर 2016 मध्ये चिनी अधिकाऱ्यांची नजर पडली. यावेळी आंद्रे डोलगोव स्वतःला कंबोडियातील नोंदणीकृत जहाज असल्याप्रमाणे दर्शवत होतं. पण चीनच्या अधिकाऱ्यांनी कारवाई करण्याआधी जहाजाने पलायन केलं.
नंतरह आंद्रे डोलगोव अनेकवेळा विविध देशांच्या तावडीत सापडलं. पण प्रत्येकवेळी कोणत्या तरी मार्गाने पलायन करण्यात जहाज यशस्वी व्हायचं.
पण पुढे या जहाजाला बेकायदेशीरपणे कुठेही नोंद न झालेलं जहाज म्हणून नोंद करण्यात आलं. त्यानंतर हे कोणत्याही बंदरावर थांबू शकत नव्हतं.
एकाच जहाजाची अनेक नावं
जानेवारी 2017 मध्ये या जहाजाचं नाव बदलून सी-ब्रीज-1 ठेवलं गेलं. आफ्रिकन देश टोगोमध्ये याची नोंदणी झाल्याचं ते दर्शवत होतं.
वेगवेगळ्या बंदरांवर पोहोचल्यानंतर वेगवेगळी नावं सांगून बनावट कागदपत्रांच्या आधारे हे जहाज निसटून जायचं.

फोटो स्रोत, Sea Shephard
टोगो, नायजेरिया आणि लॅटीन अमेरिकन देश बोलिव्हिया यांसारख्या आठ वेगवेगळ्या देशांसाठी काम करत असल्याचा दावा जहाजाचे कॅप्टन करत होते.
अखेर 2018 मध्ये आंद्रे डोलगोव मादागास्कर बेटातील एका बंदरावर पकडण्यात आलं. पण यावेळी सुद्धा जहाजाचे खलाखी अधिकाऱ्यांना चकवा देऊन पसार झाले.
पण यावेळी समुद्री चाच्यांनी आपले पुरावे सोडले होते. या जहाजात स्वयंचलित ट्रान्सपाँडर लावलेलं होतं. याचा वापर समुद्रात जहाजांची धडक रोखण्यासाठी करण्यात येतं.
याला AIS नावानेसुद्धा ओळखलं जातं. सॅटेलाईटच्या मदतीने याचं नेमकं लोकेशन शोधता येतं.
इंडोनेशियाच्या अधिकाऱ्यांनी आंद्रे डोलगोवच्या AIS चाच माग काढला. अनेक दिवसांच्या प्रयत्नांनंतर जहाज पकडण्यात ते यशस्वी ठरले.
जहाजाच्या मालकाचा पत्ता नाही
अशा प्रकारच्या अवैध जहाजांचा पाठलाग करणं, ते जप्त करणं आणि त्यांच्या पूर्ण नेटवर्कचा शोध लावणं हे महागडं काम आहे. या कामात कोणताही देश जास्त रस दाखवत नाही.
आंद्रे डोलगोव पकडण्यात आलं त्यावेळी ते इंडोनेशियाच्या समुद्री सीमेत होतं. इंडोनेशियाने 2014 मध्ये बेकायदेशीरपणे मासे पकडणारे 488 जहाज पकडले होते. या जहाजांवरच्या इंडोनेशियन नागरिकांवर कठोर कारवाई करण्यात आली.

फोटो स्रोत, Getty Images
पण या जहाजाचा मालक मालक कोण, त्याची बनावट कागदपत्रं कोण तयार करतं, या जहाजातून तस्करी झालेल्या माशांची विक्री कुठे झाली, किती पैशांचा व्यवहार झाला, या सर्व प्रश्नांची उत्तरं इंटरपोलच्या मदतीने शोधण्यात येत आहेत.
जाणकारांच्या मते, बेकायदेशीर मासे पकडण्याचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात पसरला आहे. काही जहाज पकडून परिस्थिती सुधारणार नाही. यासाठी ठोस रणनिती तयार करण्याची गरज आहे. या दृष्टीकोनातून काम करण्यात येत आहे. या कामात तंत्रज्ञानाचीही मदत घेतली जात आहे. इंटेलिजन्सच्या मदतीने हे काम आणखी सोपं होण्याची अपेक्षा आहे.

- वाचा- महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा - क्वारंटाईन, आयसोलेशन किंवा विलगीकरण म्हणजे नेमकं काय?
- वाचा -लहान मुलांना कोविड 19 चा धोका किती?
- वाचा - व्हेंटिलेटर्स काय असतात? कोरोनाच्या लढ्यात ते इतके महत्त्वाचे का आहेत?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








