कोरोना : कोव्हिड-19 आजारावर सध्या जगभरात उपचार कोणकोणते सुरू आहेत?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, जेम्स गॅलाघर
- Role, आरोग्य आणि विज्ञान प्रतिनिधी
कोव्हिड-19 आजारावर अजून ठोस लस किंवा औषध सापडलेलं नाही. जगभरात यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत. औषध शोधण्याचे हे प्रयत्न कुठवर आले आहेत? सध्या कोण-कोणत्या उपचार पद्धतींचा वापर सुरू आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण या लेखात जाणून घेणार आहोत.
कोव्हिड-19 आजारावर नेमके उपचार करण्यासाठी सध्या जगभरात मोठ्या पातळीवर संशोधन आणि चाचण्या सुरू आहेत.
उपचारांवर नेमकं काय काम सुरू आहे?
कोव्हिड-19 आजारावर जगभरात 150 हून अधिक औषधांवर संशोधन करण्यात आलं आहे. यातली बरीच औषधं चलनात आहेत आणि कोव्हिड-19 च्या उपचारांमध्येही त्यांचा वापर केला जातोय. तसंच, काही औषधं आणि लशींची निर्मितीही अंतिम टप्प्यात आली आहेत.
- जागतिक आरोग्य संघटनेने कोव्हिड-19 वरच्या सर्वांत प्रभावी उपचारांसाठी सॉलिडॅरिटी ट्रायल सुरू केलं आहे. थेट आणि नेमके उपचार करण्यावर त्यांनी भर देण्याचं ठरवलं आहे.
- आमची रिकव्हरी ट्रायल सर्वांत जास्त असल्याचं ब्रिटनचं म्हणणं आहे. युकेच्या रिकव्हरी ट्रायलमध्ये आतापर्यंत 11 हजार रुग्णांनी सहभाग घेतलेला आहे.
- कोरोनामुळे गंभीर आजारी पडलेल्यांवर डेक्सामेथासोन औषधाचे चांगले परिणाम होत असल्याचं युकेमध्ये दिसून आल्यं.
- याव्यतिरिक्त जगभरातल्या अनेक संशोधनं केंद्रांमध्ये कोरोनातून बरे झालेल्या रुग्णाच्या रक्ताच्या नमुन्यांवर संशोधन सुरू आहे.
कुठल्या प्रकारचं औषधं उपयोगी ठरू शकेल?
कोव्हिड-19 आजारात आतापर्यंत तीन प्रकारची औषधं वापरली जात आहेत.

- वाचा - युरेका! कोरोनावर प्रभावी औषध सापडलं, डेक्सामेथासोनकडून WHO ला पण आशा
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
- वाचा- मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोनावरची लस बनवण्याचं काम कुठवर आलं? येत्या सप्टेंबरपर्यंत लस येणार?
- वाचा- कोरोनाचं संकट कधी आणि कसं संपणार?

- अँटीबॉडी ड्रग्ज (प्रतिजैविक औषध). है औषध थेट कोरोना विषाणू शरीरात राहण्याच्या क्षमतेवर परिणाम करतं.
- अशी औषधं जी शरीरातील प्रतिकारशक्ती यंत्रणा शिथील करते. एखाद्या रुग्णाची प्रतिकारशक्ती जेव्हा गरजेपेक्षा जास्त काम करते तेव्हा तो रुग्ण गंभीररित्या आजारी पडतो.
- आजारातून बरे झालेल्या रुग्णाच्या रक्तातून अँटीबॉडीज तयार करणं किंवा लॅबमध्ये तयार करण्यात आलेल्या अँटीबॉडीज वापरणं.
'डेक्सामेथासोन आणि रेमडिसिव्हर औषधं प्रभावी'
डेक्सामेथासोन, हे औषध सध्या कोरोनाग्रस्तांवर उपचार करताना सर्वाधिक प्रभावी ठरतंय. कोव्हिड-19 झालेल्या रुग्णांचे प्राण वाचवण्यात या औषधाने महत्त्वाची भूमिका महत्त्वाची बजावली आहे.
अत्यंत स्वस्त दरात मिळणाऱ्या या स्टिरॉईडमुळे व्हेंटिलेटरव असलेल्या दर तिसऱ्या रुग्णाची आणि ऑक्सिजनवर असणाऱ्या दर पाचव्या रुग्णाचे जीव या औषधामुळेच वाचले आहेत. कोरोना व्हायरसशी लढताना शरीरांतर्गत सूज वाढते. कारण, आपली रोगप्रतिकारक शक्ती कोरोना व्हायरसशी लढत असते. रोगप्रतिकारक शक्तीचा जास्तीचा प्रतिकार आपल्याच शरीराला घातक ठरू शकतो.
डेक्सामेथासोन औषध नेमकं रोगप्रतिकारक शक्तीचा असा जास्तीचा प्रतिकार कमी करतं. डेक्सामेथासोनबद्दल WHO सुद्धा आशादायी आहे.
तसंच जागतिक आरोग्य संघटनेचे डॉ. ब्रूस आइलवर्ड यांचं म्हणणं आहे की चीन भेटीनंतर त्यांच्या लक्षात आलं की रेमडेसिवीर हे औषधही कोव्हिड-19 वर प्रभावी असल्याचं दिसतं.

फोटो स्रोत, AFP
इबोलावर उपचार म्हणून हे औषध तयार करण्यात आलं होतं. मात्र, या औषधाचा प्राण्यांवर ट्रायल केल्यानंतर इतर अनेक प्राणघातक विषाणुंपासून उत्पन्न होणाऱ्या आजारांवरही हे औषध उपयोगी असल्याचं दिसलं.
उदा. मर्स किंवा श्वसनाशी संबंधित इतर आजारांवर. हेच औषध कोव्हिड-19 आजारावरही उपयुक्त ठरेल, अशी आशा व्यक्त होतेय.
अमेरिकेत रेमडिसिव्हर औषधाची चाचणी 1 हजार रुग्णांवर घेण्यात आली. या औषधाने त्या रुग्णांची कोरोनाची 15 दिवसांची लक्षणं 11 दिवसांवर आणली. काही रुग्णांना हेच औषध दिलं गेलं तर काही रुग्णांना वेगळ म्हणजेच प्लासिबो उपचार पद्धतीचं औषध देण्यात आलं.
जागतिक आरोग्य संघटना सॉलिडॅरिटी ट्रायलअंतर्गत ज्या औषधांवर संशोधन करतंय त्यात या औषधाचाही समावेश आहे. हे औषध तयार करणाऱ्या गिलीड कंपनीनेसुद्धा स्वतः एक स्वतंत्र संशोधन करायला सुरुवात केली आहे.
रेमडिसिव्हर औषधामुळे लोक बरे होत असले किंवा अनेक जण ICU मधून बाहेर येत असले तरी कोरोना व्हायरसमुळे होणारे मृत्यू हे औषध थांबवत याबद्दल अजून तरी ठोस उत्तर मिळालेलं नाही. भारतात ही औषधं काहीशी महाग मिळत असल्याने अनेक रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
रेमडिसिव्हर आणि डेक्सामेथासोन औषधांचा रुग्णांवर चांगला परिणाम पडत असल्याने युके सरकारने NHS म्हणजचे तिथल्या राष्ट्रीय आरोग्य सेवेतील हॉस्पिटल्सना ही औषधं उपलब्ध करून दिली आहेत.
तसंच, या औषधांची निर्मिती करणाऱ्या गिलीड कंपनीकडून पुढे निर्मिती केली जाणारी सगळीच औषधं अमेरिकेनं विकत घेतली आहेत. अमेरिकेतल्या दि डिपार्टमेंट ऑफ हेल्थ अँड ह्युमन सर्व्हिसेसने या औषधाचे 5 लाख डोस देशात वितरित केले आहेत. जुलै महिन्यातलं हे गिलीड 100 टक्के उत्पादन त्यांनीच विकत घेतलंय.
तसंच, ऑगस्ट आणि सप्टेंबरमधलं 90 टक्के उत्पादनही अमेरिकेनं विकत घेतलेलं आहे.
एचआयव्हीची औषधं परिणामकारक आहेत का?
याबाबत बरीच चर्चा आहे. मात्र, एचआयव्हीच्या उपचारांसाठी वापरली जाणारी लोपीनावीर आणि रिटोनावीर ही औषधं कोव्हिड-19 आजारातही चांगले परिणाम दाखवत असल्याचे फारसे पुरावे नाहीत.
प्रयोगशाळेत करण्यात आलेल्या प्रयोगांमध्ये ही औषधं परिणामकारक असल्याचं आढळलं असलं तरी प्रत्यक्ष रुग्णांना या औषधांचा फारसा उपयोग झालेला नाही.

फोटो स्रोत, Getty Images
मात्र, इथे लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे ही औषधं गंभीररित्या आजारी कोरोनाग्रस्तांना देण्यात आली. यातल्या एक चतुर्थांश रुग्णांचा मृत्यू झाला. यावरून असा निष्कर्षही काढला जाऊ शकतो की उशिरा दिल्यावर हे औषध कोरोना विषाणुच्या संक्रमणावर परिणाम करत नाही.
मलेरियाचं औषधं परिणामकारक आहे का?
सॉलिडॅरिटी ट्रायल आणि रिकव्हरी ट्रायल या दोन्ही चाचण्यांमध्ये मलेरियाच्या औषधावरही परिक्षण सुरू आहे.
क्लोरोक्वीन आणि त्यापासून तयार करण्यात आलेली हायड्रॉक्सी-क्लोरोक्वीनमध्ये विषाणू आणि माणसाच्या शरीरातील रोकप्रतिकार शक्ती दोन्ही शिथील करण्याचे गुण आहेत.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी कोरोनाच्या उपचारांमध्ये मलेरियावरील हायड्रॉक्सी-क्लोरोक्वीन हे औषध उपयुक्त असल्याचं म्हटल्यानंतर जगभरात या औषधाची चर्चा झाली. मात्र, हे औषध परिणामकारक आहेच, याचेही ठोस पुरावे अद्याप तरी मिळालेले नाहीत.
हायड्रॉक्सी-क्लोरोक्वीनचा वापर आर्थरायटिसमध्येही करतात. हे औषध रोगप्रतिकार शक्ती नियमित करण्यात मदत करतं. प्रयोगशाळेत करण्यात आलेल्या परिक्षणांमध्ये हे औषध कोरोना विषाणुचा शरीरातला फैलाव रोखू शकत असल्याचं आढळलं आहे. तसंच डॉक्टरांचा अनुभवही सांगतो की रुग्णांवर या औषधाचे सकारात्मक परिणाम दिसले आहेत.

फोटो स्रोत, AFP
मात्र, या औषधाच्या परिणामकारकतेविषयी अजूनतरी ठोस पुरावे मिळालेले नाहीत, असं जागतिक आरोग्य संघटनेचं म्हणणं आहे.
कोरोना विषाणू : शरीरात नेमकं काय घडतं?
शरीरातली रोगप्रतिकार शक्ती एखाद्या विषाणुविरोधात खूप जास्त काम करत असेल तर शरीरावर सूज येऊ शकते. विषाणुच्या संक्रमणाला रोखण्यासाठी शरीराच्या रोगप्रतिकार शक्तीवर विश्वास ठेवणं योग्य असलं तरी या शक्तीने गरजेपेक्षा जास्त काम केलं तर त्याचे आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात आणि ते प्राणघातकही ठरू शकतात.
सॉलिडॅरिटी ट्रायलमध्ये इंटरफेरॉन बिटावरही परीक्षण सुरू आहे. अनेक प्रकारच्या व्याधी आणि सूज कमी करण्यासाठी याचा वापर होतो. इंटरफेरॉन एक प्रकारचं रसायन आहे. विषाणू जेव्हा शरीरावर हल्ला करतो तेव्हा शरीरात हे रसायन स्त्रवत.
ब्रिटनमध्ये सुरू असलेल्या रिकव्हरी ट्रायलमध्ये डेक्सामेथासोनवर प्रयोग सुरू आहेत. डेक्सामेथॅसोन एक प्रकारचं स्टेरॉईड आहे. हे स्टेरॉईड सूज कमी करण्यात मदत करतं.
बरे झालेल्या रुग्णाच्या रक्तापासून उपचार होऊ शकतात का?
कोव्हिड-19 आजारातून पूर्णपणे बरे झालेल्या रुग्णांच्या शरीरात या विषाणुविरोधी अँटीबॉडी तयार झालेल्या असतात. या अँटीबॉडीजचा इतर कोरोनाग्रस्तांवर उपचारासाठी वापर होऊ शकतो.
या उपचारात आजारातून बरे झालेल्या रुग्णाच्या शरीरातल्या रक्तातून प्लाझ्मा (यात अँटीबॉडीज असतात) काढून तो कोरोनाग्रस्त रुग्णाच्या शरीरात टाकतात.
अमेरिकेत आतापर्यंत 500 रुग्ण या उपचारामुळे बरे झाले आहेत. इतर देशही आता कोव्हिड-19 वर उपचार म्हणून प्लाझ्मा थेरपीचा वापर करू लागले आहेत.
कधी येणार औषध?
कोरोना व्हायरसवर अंतिम आणि परिणाम करणार ठोस औषध कधी येईल या प्रश्नाचं उत्तर आता लवकरच मिळण्याची शक्यता आहे. येत्या काही महिन्यात जगभारात सुरू असलेल्या ट्रायलचे परिणाम येऊ लागतील.

फोटो स्रोत, Getty Images
कोरोनाच्या लशीविषयी बोलणंही घाईच ठरेल. कारण डॉक्टर सध्या जी औषधं उपलब्ध आहेत ती कोरोनावर किती उपयुक्त आणि सुरक्षित आहेत, याचाच अभ्यास करत आहेत.
लस शोधण्याच्या कामाची सुरुवात तर शून्यापासून करावी लागेल. काही अगदीच नव्या औषधांवरही प्रयोगशाळेत ट्रायल सुरू आहेत. मात्र, माणसांना देण्यासाठी त्या अजून तयार नाहीत.
कोव्हिड-19 वर लवकरात लवकर उपचार शोधणं रुग्णांना बरं करण्यासाठी तर उपयोगी ठरणार आहेच. शिवाय लॉकडाऊनचं संकटही त्यामुळे दूर होऊ शकेल.
कोरोनावर प्रभावी उपचारपद्धती सापडल्यानंतर एक सामान्य आजार म्हणून कोव्हिड-19ची गणती केली जाईल.
सध्या डॉक्टर काय उपचार करतात?
बहुतांश कोरोनाग्रस्त गंभीर आजारी पडत नाहीत. बेड रेस्ट, पॅरासिटॅमॉल आणि भरपूर द्रव पदार्थ घेतल्याने घरच्या घरीच हा आजार बरा होतो.
मात्र, काही रुग्णांना गंभीर स्वरुपाची लक्षणं असतात. त्यांना हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात ठेवण्याची आणि व्हेंटिलेटर्सची गरज पडू शकते.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








