कोरोना औषध : कोव्हिड-19 च्या गंभीर रुग्णांवर रेमडिसिव्हर औषधांच्या चाचण्या सुरू

फोटो स्रोत, Getty Images
- Author, सिद्धनाथ गानू
- Role, बीबीसी मराठी
कोव्हिड-19 मुळे गंभीररित्या आजारी पडलेल्या रुग्णांवर रेमडिसिव्हर औषधांचा चांगला परिणाम व्हावा यासाठी या औषधांची निर्मिती करणाऱ्या गिलिएड कंपनीने तिसऱ्या टप्प्यातल्या चाचण्या सुरू केल्या आहेत.
या तिसऱ्या टप्प्यातल्या चाचण्या असल्याने याचे निकाल आशादायी आले तर लशीबरोबरच रेमडिसिव्हर औषधाची परिणामकारकता सिद्ध होणार आहे.
रेमडिसिव्हर औषधांच्या चाचण्या
गिलिएड कंपनी ओपन लेबल आणि मल्टिसेंटर प्रकारच्या या चाचण्या करत असून हा या चाचण्यांचा तिसरा टप्पा आहे. या चाचणीत रेमडिसिव्हर औषधाचे दोन डोस दिले जाणार आहे. 5 दिवसांनंतर आणि 10 दिवसांनंतर हे डोस दिले जातील.
या चाचण्या प्रामुख्याने कोव्हिड-19 ने गंभीररित्या आजारी असलेल्या रुग्णांवर केल्या जात आहेत. सुरुवातीला 400 रुग्णांची यात नोंद केली गेली होती. पण, आता तिसऱ्या टप्प्यातल्या चाचण्यांपर्यंत 5 हजार 600 रुग्णांची नोंद केली आहे.
यापूर्वी या चाचण्यांचा पहिला टप्पा हा 29 एप्रिल आणि 27 मे ला झाला होता. या तिसऱ्या टप्प्यातल्या चाचण्यांचे निकाल नजीकच्या काळात पाहायला मिळती.
औषधाची किंमत 4800 रुपये
अमेरिकेतील मायलिन एनव्ही कंपनीने गिलिएड सायन्सेजच्या रेमडेसिविरचं जेनेरिक व्हर्जन भारतीय बाजारात आणलंय. त्याची किंमत 4,800 रुपये आहे.
अँटी व्हायरल औषध रेमडिसिव्हर कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांना बरं होण्यास मदतगार ठरू शकतं असं कोव्हिड-19 रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना लक्षात आलं. मायलिन एनव्ही कंपनीने भारतीय ग्राहकांसाठी निश्चित केलेली किंमत प्रगत देशांच्या तुलनेत 80 टक्क्यांनी कमी आहे.
कॅलिफोर्नियास्थित गिलिएड सायन्सेसने जेनेरिक औषधांची निर्मिती करणाऱ्यांबरोबर करार केला आहे. जेणेकरून रेमडिसिव्हरचा पुरवठा 127 देशांमध्ये होऊ शकेल. गेल्या महिन्यात सिप्ला आणि हेटरो लॅब्सने रेमडिसिव्हरचं भारतीय व्हर्जन लाँच केलं होतं. सिप्ला कंपनीने सिपरेमी नावाच्या औषधाची किंमत पाच हजारांच्या आसपास निश्चित केली होती. हेटरो लॅब्सने कोविफीर औषध 5,400 रुपयांना बाजारात आणलं होतं.
विकसित देशांमध्ये हे औषध महाग किमतीला उपलब्ध असेल असं गिलिएड सायन्सेस कंपनीने स्पष्ट केलं होतं. पुढच्या तीन महिन्यांपर्यंत रेमडिसिव्हरअमेरिकेतच विकण्याचा निर्णय झाला होता. मायलिन एनव्ही कंपनीनुसार, 4800 ही किंमत 100 मिलिग्रॅम बाटलीची असेल. एका कोरोना रुग्णाला अशा किती बाटल्या औषध लागेल हे स्पष्ट होऊ शकलेलं नाही.
गिलिएड सायन्सेसच्या माहितीनुसार, एखाद्या रुग्णाला पाच दिवसांचा कोर्स म्हणजेच हे औषध दिलं जातं तर त्याला सहा बाटल्या रेमडिसिव्हर लागतं. या औषधाच्या सेवनानंतर कोव्हिड रुग्णांमध्ये झालेल्या सकारात्मक बदलानंतर रेमडिसिव्हरची लोकप्रियता वाढली आहे.

- वाचा-कोरोना व्हायरसची नवी लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
- वाचा- मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोनावरची लस बनवण्याचं काम कुठवर आलं? येत्या सप्टेंबरपर्यंत लस येणार?
- वाचा- कोरोनाचं संकट कधी आणि कसं संपणार?

मायलिन एनव्हीने दिलेल्या माहितीनुसार जेनेरिक रेमडिसिव्हरचं उत्पादन भारतातच होणार आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बळ अशा 127 देशांना परवाना घेऊन पुरवठा करता येऊ शकेल.
ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने मायलिनच्या रेमडिसिव्हरच्या डेसरेम या नावाला मंजुरी दिली आहे. कोरोना संसर्गाच्या बाबतीत भारताने रशियाला मागे टाकले असून भारत आता तिसऱ्या स्थानी आहे.
या औषधाच्या चाचण्यांना काही प्रमाणात यश मिळाल्याचं अमेरिकेच्या नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ अॅलर्जी अँड इन्फेक्शिअस डिसिजेसचं म्हणणं आहे.
अमेरिकेतील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अलर्जी अँड इन्फेक्शिअस डिसिजेसचे संचालक अँथनी फाउची यांच्या माहितीनुसार, "रेमडेसिव्हिरमुळे बरं होण्याचा वेळ 15 दिवसांवरून 11 दिवसांपर्यंत खाली आणण्यात मदत झालीय. 31% प्रगती जरी 100% बरं होण्यासारखी नसली तरी हा आकडा एका गोष्टीचं प्रमाण आहे. ती गोष्ट म्हणजे औषधामुळे या व्हायरसला अडवता येऊ शकतं."
कोव्हिफॉर आणि सिप्रेमी - नवी औषधं
आता हेटेरो लॅब्स लिमिटेडने रेमडिसिव्हर औषधाच्या जेनरिक व्हर्जनची म्हणजेच छोट्या बाटलीची किंमत 5400 रुपये निश्चित केली आहे. रॉयटर्स या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, हेटेरो लॅब्सने बुधवारी (24 जून) जेनेरिक औषधासंदर्भात माहिती दिली. देशभरातल्या हॉस्पिटल्सना या औषधाचा पुरवठा करण्याची तयारी झाली आहे. 20 हजार बाटल्यांचा पुरवठा केला जाईल असा दावा कंपनीने केला आहे.
मुंबईत औषध तयार करणाऱ्या सिप्ला लिमिटेडने रेमडिसिव्हर वेगळं संस्करण तयार केल्याचा दावा केला आहे. याची किंमत 5000 रुपये असणार आहे. सिप्ला आणि हेटेरो या कंपन्यांनी अमेरिकच्या गिलियाड सायन्सेसबरोबर करार केला आहे. 127 देशांमध्ये औषध तयार करण्याचा आणि विकण्याचा अधिकार गिलियाड सायनेन्सने दिला आहे.
गंभीर स्थितीत असणाऱ्या कोरोना रुग्णांसाठी सिप्ला आणि हेटेरोच्या जेनरिक व्हर्जनच्या उपयोगाला मंजुरी देण्यात आली आहे. हेटेरो लॅब्सच्या औषधाचं नाव असणार आहे कोव्हिफॉर तर सिप्ला कंपनीच्या औषधाचं नाव आहे सिप्रेमी. कोव्हिफॉर आणि सिप्रेमी हे रेमडिसिव्हर या मूळ अमेरिकन औषधाचं जेनेरिक व्हर्जन आहे.
या औषधांच्या निर्मितीनंतरच्या पहिल्या बॅचेसचा उपयोग महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये सर्वप्रथम केला जाणार असल्याचं या दोन्ही कंपन्यांनी स्पष्ट केलंय.
अमेरिका तसंच दक्षिण कोरियात गंभीर स्थितीत असलेल्या कोरोना रुग्णांना रेमडिसिव्हर औषध देण्यात आलं. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली होती. जपानमध्येही या औषधाच्या वापराला मंजुरी देण्यात आली आहे. अमेरिकेत या औषधाच्या किमतीबाबत अंतिम निर्णय झालेला नाही. आफ्रिका खंडात आलेल्या इबोला उद्रेकावर रेमडिसिव्हर औषधाचा प्रयोग करण्यात आला होता.
रेमडिसिव्हर कोरोनावर रामबाण ठरेल?
सर्वप्रथम आपण जाणून घेऊया की हे औषध आहे तरी काय. जगात जेव्हा सार्स आणि इबोलाची साथ आली होती तेव्ही रेमडेसिव्हिर या औषधाची निर्मिती केली गेली. हे एक अँटी व्हायरल ड्रग आहे.
अमेरिकेची औषध कंपनी गिलियाडनं हे औषध बनवलं होतं. तज्ज्ञांच्या मते खरं तर सार्स, मर्स आणि इबोलासारख्या साथीच्या रोगांमध्ये याचा उपयोग झाला खरा, पण ते तितक्या प्रमाणावर यशस्वी ठरलं नव्हतं.
पण आता SARC-CoV-2 या कोरोना व्हायरसविरोधात याचा सध्या फायदा होत असल्याचं समोर आलंय. रुग्णाच्या शरीरात जाऊन ते अशा एन्झाईम्सवर हल्ला करतं जी व्हायरसला एकाचे दोन व्हायला मदत करतात.
अमेरिकेतील चाचणीतून काय समोर आलं?
अमेरिकेच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अलर्जी अँड इन्फेक्शिअस डिसिजेसने या औषधाची चाचणी केलीये. एकूण एक हजार 63 पेशंट्सनी या मानवी चाचणीत भाग घेतला होता. यातील अर्ध्या जणांना रेमडेसिव्हिरचे डोस दिले गेले होते तर बाकिच्यांना प्लेसिबो म्हणजे डमी ट्रीटमेंट दिली होती.
ज्या लोकांना रेमडेसिव्हिर दिलं होतं त्यांना दिसत असलेली लक्षणं ही 15 दिवसांच्या ऐवजी 11 दिवसांत बरी झाली. पण मृत्यू रोखण्यात या औषधाला कितपत यश येईल हे अजूनही स्पष्ट व्हायचंय.

फोटो स्रोत, Getty Images
रेमडेसिव्हिर दिलेल्या रुग्णांमध्ये मृत्युदर 8 टक्के होता तर डमी ट्रीटमेंट दिलेल्यांमध्ये 11.6 टक्के. पण शास्त्रज्ञ अजूनही या निकालांचा अभ्यास करतायत. आणि या चाचणीबद्दलचा संपूर्ण अहवाल अजून प्रकाशित व्हायचाय.
युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनमधल्या MRC क्लिनिकल ट्रायल्स युनिटचे संचालक प्रोफेसर महेश परमार यांच्या देखरेखिखाली युरोपियन युनियनमध्ये पेशंट्सवर चाचण्या होत होत्या. ते म्हणतात "हे औषध व्यापक स्तरावर उपलब्ध करून देण्यापूर्वी औषध नियंत्रकांना यासंदर्भातली माहिती आणि संशोधन याचा आढावा घेऊन याला परवाना द्यायचा की नाही हे ठरवावं लागेल आणि त्यानंतर त्या देशांच्या आरोग्य यंत्रणांनाही याचं मूल्यमापन करावं लागेल."
ही प्रक्रिया सुरू असताना औषधासंदर्भात या चाचण्यांबद्दल दीर्घकालीन आकडेवारी हाती येईल आणि हे कोव्हिडमुळे होणारे मृत्यू रोखू शकतं का हे पण कळेल असंही प्रोफेसर परमार म्हणाले.
जर एखाद्या औषधामुळे अतिदक्षतेच्या उपचारांची गरज कमी होत असेल तर हॉस्पिटल्सवरचा ताण कमी होईल आणि सोशल डिस्टन्सिंगची गरजही कमी होऊ शकते.
ऑक्सफर्ड विद्यापीठाचे डॉ. पीटर हॉर्बी कोव्हिड-19 वरच्या औषधांच्या जगातल्या सर्वांत मोठ्या चाचणीचं नेतृत्व करतायत. ते म्हणतात की, "आम्हाला याचे संपूर्ण निकाल पाहावे लागतील. पण याची (गुणकारकता) निश्चित असेल तर कोव्हिड19 शी सुरू असलेल्या लढ्यात ही चांगली बातमी आहे. पुढची पायरी असेल संपूर्ण माहिती गोळा करणं आणि जगभरातल्या लोकांना रेमडेसिव्हिरची न्याय्य पद्धतीने उपलब्धता असेल याची खातरजमा करणं"
अमेरिकेत यशस्वी मग चीनमध्ये का नाही?
अमेरिकेतून या चाचणीला यश आल्याचं सांगितलं जात असलं तरी चीनमध्ये मात्र ही चाचणी अयशस्वी झाल्याचं लॅन्सेट या प्रतिष्ठित वैद्यकीय नियतकालिकात छापून आलं होतं.
चीनमध्ये 237 पेशंट्सपैकी 158 जणांना या औषधाचे डोस दिले गेले होते. पण हे औषध घेतलेल्या रुग्णांमध्ये मृत्युदर 13.9 टक्के होता तर इतर औषधं घेतलेल्या पेशंट्समध्ये मृत्युदर 12.8 टक्के होता. या चाचण्या वेळेच्या आधीच थांबवाव्याही लागल्या होत्या.

फोटो स्रोत, Reuters
WHOने या चाचण्यांबद्दलचा ड्राफ्ट रिपोर्ट चुकून प्रसिद्ध केला होता, ज्यामुळे ही माहिती अचानक समोर आली होती. पण हे औषध बनवणाऱ्या गिलियाड सायन्सेस या कंपनीने मात्र चीनच्या या दाव्यांवर तेव्हा आक्षेप घेतले होते.
'जादूची कांडी नाही'
केंब्रिज युनिव्हर्सिटी हॉस्पिटल्समधले साथीच्या रोगांचे तज्ज्ञ प्रा. बाबाक जाविद म्हणतात, "ही आकडेवारी आशादायी आहे. अजूनपर्यंत कोव्हिडवर कोणताच उपाय सापडलेला नाही. कदाचित रेमडेसिव्हिरला फास्ट-ट्रॅक अप्रूव्हलसुद्धा मिळेल. पण ही जादूची कांडी नाही. या औषधामुळे वाचण्याची शक्यता 30 टक्क्यांनी वाढतेय."
एकीकडे रेमडेसिव्हिरकडे जग आशा लावून बसलपंय पण हेही सांगायला पाहिजे की या औषधाचे काही साईड इफेक्ट्सही आहेत. हे औषध बनवणाऱ्या गिलियाड कंपनीच्याच मते खाण्याची इच्छा उडणे, श्वास घ्यायला त्रास होणे तर 7 टक्के रुग्णांना जठराला सूज येणे, अशा दुष्परिणामांना सामोरं जावं लागू शकतं.
भारताला रेमडिसिव्हर औषध कसं मिळेल?
कोव्हिड-19 ला रोखण्यास रेमडिसिव्हर औषध गुणकारी ठरू शकतं, असा विश्वास अमेरिकेनं व्यक्त केल्यानंतर अवघ्या जगभरात या औषधाबद्दल चर्चा सुरू झाली.
भारताच्या आरोग्य मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेतही या औषधाचा उल्लेख झाला. रेमडिसिव्हरमुळं आशा पल्लवीत तर झाल्यात. मात्र, त्याचवेळी संयुक्त सचिव लव अग्रवाल म्हणाले, या औषधावर आणखी काही बोलण्यासाठी काही काळ आपण थांबलं पाहिजे.

फोटो स्रोत, Getty Images
"रेमडिसिव्हर औषधाची जगभरात चाचणी घेतली जातेय. कोव्हिड-19 वर उपचारासाठी अद्याप कुठलंच विशिष्ट असं औषध सापडलं नाहीय. गेल्या काही दिवासात प्रसिद्ध झालेल्या संशोधनातलेच रेमडिसिव्हरही एक आहे. हे औषध 100 टक्के गुणकारी आहे, हे अजून सिद्ध झालं नाहीय. या औषधाबाबत कुठलेही पाऊल उचलण्याआधी आणखी पुराव्यांची आम्ही वाट पाहत आहोत," असं लव अग्रवाल म्हणाले.
...तर भारतात रेमडिसिव्हर कसं येईल?
ICMRच्या जाणकारांनी बीबीसी हिंदीला सांगितल्यानुसार, या औषधाचं भारतीयांवरही वेगळी चाचणी होईल. भारतीयांवर या औषधाचा नकारात्मक परिणाम तर होत नाही ना, हे पाहिलं जाईल.
भारतात येणाऱ्या कुठल्याही औषधाला ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया मंजुरी देतं. त्यासाठी ICMR कडून सल्ला घेतला जातो. हे सर्व कायद्यान्वये होतं.
रेमडिसिव्हर जर कोव्हिड-19 वर मात करणारं औषध म्हणून सिद्ध झालं, तर सहाजिकच जगातील अनेक देश या औषधाची मागणी करतील. त्यावेळी रेमडिसिव्हर औषध बनवणारी अमेरिकेतील गिलियाड कंपनी त्या त्या देशातील स्थानिक कंपन्यांना पेटंट देऊन औषध बनवू शकतं.
CSIRचे महासंचालक डॉ. शेखर मांडे सांगतात, रेमडिसिव्हर औषधाची मूळ कंपनी भारतातल्या कंपन्यांना संपर्क नक्कीच करू शकते. कारण भारतातल्या कंपन्यांमध्ये औषध बनवण्याची क्षमता आहे.
डॉ. मांडे म्हणाले, "जर गिलियाड कंपनीनं काही भारतीय कंपन्यांना पेटंट दिलं, तर त्या कंपन्या सहज औषध बनवतील. मात्र, गिलिएड कंपनीच्या निर्णयावर सर्व अवलंबून आहे."

फोटो स्रोत, Getty Images
इंडियन ड्रग मॅन्युफॅक्चरर असोसिएशनचे महासचिव धारा पटेल यांच्या माहितीनुसार, रेमडिसिव्हर औषधाचं पेटंट 2035 पर्यंत आहे.
"भारतातल्या तीन कंपन्या या औषधाकडे लक्ष ठेवून आहेत. जर गिलियाड कंपनीनं पेटंट दिलं, तर भारतीय कंपन्या गिलियाडसोबत करार करून औषध बनवू शकतात. अर्थात, सरकार हेही पाहील की, या कंपन्या हे औषध बनवू शकतं का. त्यानतंरच परवाना दिला जाईल," असं धारा पटेल म्हणाले.
इतर औषधांचं काय?
मलेरिया आणि HIVवरची औषधं कोव्हिड-19 बरा करू शकतील का, याचीही चाचपणी सुरू आहे. हायड्रॉक्सिक्लोरोक्विन या अँटी-मलेरिया औषधानं रुग्णांचा बरं होण्याचा वेग वाढू शकतो यावरही अमेरिकेत चाचण्या घेतल्या गेल्यात.
तर HIVच्या औषधांच्या मिश्रणानं रुग्णांना काही केसेसमध्ये फायदा झाल्याचंही आपण पाहिलं होतं. भारतात याच औषधांचं असं जयपूर कॉकटेलचीही खूप चर्चा झाली होती.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 1
पण सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे औषध नसतानाही लोक कसे बरे होतायत? याचं उत्तर म्हणजे आपली रोगप्रतिकारक शक्ती. आणि ती वाढवण्यासाठी आपल्याला योग्य आहार, व्यायाम आणि जर रोगांची लागण झाली असेल तर मदत करणारी योग्य औषधं घेणं अत्यांत आवश्यक आहे.
या सगळ्या गोष्टी ऐकून बरं वाटत असेल किंवा आपल्या आशा पल्लवित होत असतील तरी पुन्हा एकदा सांगतो. सध्या रेमडेसिव्हिर असू दे किंवा लस, यावर सध्या फक्त आणि फक्त चाचण्या सुरू आहेत. या दोन्ही गोष्टी मानवी चाचण्यांच्या स्टेजमध्ये आहेत आणि त्यांना मान्यता किंवा मंजुरी मिळायला काही काळ जाणार आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 2
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)









