कोरोना लॉकडाऊन वाढला, पण निर्बंध शिथील करणं खरंच किती सोपं आहे?

लॉकडाऊन

फोटो स्रोत, ANI

    • Author, जेम्स गॅलाघर
    • Role, बीबीसी आरोग्य प्रतिनिधी

कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी सध्यातरी जगभरातील सर्व देशांसमोर लॉकडाऊन हाच एकमेव पर्याय असल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र कोरोनामुळे आणि त्यातच या लॉकडाऊनमुळे लोकांमध्ये नैराश्य वाढताना दिसतंय.

त्यामुळेच लॉकडाऊन पूर्णपणे हटवायचा की लॉकडाऊन हटविण्याऐवजी काही निर्बंधांमध्ये सवलत द्यायची, असाही प्रश्न जगातील राष्ट्रांसमोर आहे. कारण लॉकडाऊन हटवताना कोरोनाचा संसर्ग नियंत्रित करून लक्षावधी लोकांचे प्राण वाचविण्याचंही आव्हान सध्याच्या घडीला आहे.

चीनच्या वुहानमध्ये नुकताच लॉकडाऊन संपविण्याचा निर्णय घेण्यात आला, मात्र त्यानंतर तिथं संसर्ग झालेले नवीन रुग्ण समोर आल्यामुळे अधिकाऱ्यांची चिंता वाढली आहे.

भारतानेही आता लॉकडाऊनचा चौथा टप्पा 31 मे पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या देशात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असल्यामुळे भीती सुद्धा आहेच.

मात्र कोरोनाला रोखण्याचं आव्हान हे दीर्घकालीन आहे, हा केवळ काही आठवड्यांचा प्रश्न नाहीये. त्यामुळे लॉकडाऊन हा काही कायमस्वरूपी किंवा दीर्घकालीन पर्याय असू शकत नाही, हेही आता लोकांना तसंच नेत्यांना कळून चुकलंय.

कोरोना
लाईन

लंडन स्कूल ऑफ हायजीन अँड ट्रॉपिकल मेडिसीनमधील डॉक्टर अॅडम कुचार्सकी यांनी बीबीसीशी बोलताना म्हटलं, "आपल्याकडे सध्याच्या घडीला तरी अजून कोणतेही चांगले पर्याय नाहीयेत. एकादिवसात सगळं काही नक्कीच बदलणार नाही, पण गोष्टी नक्कीच रुळावर येऊ शकतात."

लॉकडाऊनची खरंच आवश्यकता का?

कोरोनाचा संसर्ग होण्याचं प्रमाण जरी कमी झालं, तरी आपलं आयुष्य लगेच पूर्वपदावर नाही येणार.

आता ब्रिटनचंच उदाहरण घेऊया. तिथे संसर्ग झालेल्यांची संख्या चार पटीनं वाढण्याचा अंदाज वर्तवला जातोय किंवा असंही म्हणता येईल, की जवळपास 63 लाख लोकांना संसर्ग होण्याची शक्यता आहे.

कोरोना व्हायरस

फोटो स्रोत, AFP

लॉकडाऊन नसेल तर कोरोनाची लागण झालेल्या एका व्यक्तीमुळे सरासरी तीन लोकांना कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो. लॉकडाऊनमुळे हे प्रमाण 60 ते 70 टक्के कमी झालं आहे.

जर आपण सोशल डिस्टन्सिंग कमी करत असू, तर त्याऐवजी आपल्याला कोरोना व्हायरसच्या संसर्गाला रोखण्याचे इतर उपाय शोधून काढायला हवेत.

अनेक देशांना लॉकडाऊनमुळे कोरोनाचा संसर्ग रोखण्यात यश आलं आहे. अगदी 70 टक्क्यांपर्यंत संसर्ग कमी झाल्याचीही उदाहरणं आहेत.

डॉक्टर अडम कुचार्सकी सांगतात, की चीनमध्ये लॉकडाऊनच्या काळात कोरोनाच्या संसर्ग होण्यात 80 ते 90 टक्के घट झालीये.

त्यामुळेच सध्याच्या घडीला परिस्थिती नियंत्रणात ठेवून आपण काही निर्बंधांमधून लोकांना सवलत देण्याचा विचार नक्कीच करू शकतो.

चीनच्या ज्या वुहानमधून कोरोनाच्या संक्रमणाला सुरूवात झाली होती, तिथे बरेच दिवस आणि अतिशय काटेकोर लॉकडाऊन होता. त्याचा परिणामही दिसून आला. मात्र इतर देशांमधलं चित्र अजून स्पष्ट नाही.

मोठ्या प्रमाणावर चाचण्यांची गरज

मोठ्या प्रमाणावर चाचण्या केल्यामुळे आपण कोणत्याही संसर्ग झालेल्या व्यक्तीचा संसर्ग दुसऱ्या व्यक्तीला होणार नाही, याची खबरदारी घेऊ शकतो.

डॉ. अडम कुचार्सकी सांगतात, "सध्या तुम्हाला एकमेकांच्या संपर्कात येणं 60 ते 70 टक्क्यांनी कमी करणं गरजेचं आहे. तरच कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव कमी होईल."

कोरोना व्हायरस

फोटो स्रोत, AFP

फोटो कॅप्शन, मोठ्या प्रमाणावर टेस्टिंग करणं ही गरज आहे

पण मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या तपासण्यांमुळे जनजीवन तितकं सुरळीत राहू शकत नाही. त्यामुळे आपल्याला अन्य उपायांवरही विचार करायला हवेत, जे दीर्घकालीन असतील. कारण या व्हायरसचा संसर्ग होण्याचा धोका हा भविष्यातही कायम राहणार आहे.

हे उपाय आपल्याला तातडीनं शोधावे लागतील. कारण ज्या गतीनं कोरोनाचा प्रादूर्भाव होत आहे, आपल्याला त्याच्यापेक्षा दोन पावलं पुढं राहायला हवं. सध्या काही स्मार्टफोन अपवर चर्चा होत आहे, ज्यामुळे कोरोना व्हायरसचा संसर्ग झालाय, की नाही हे कळेल.

स्वतःला सुरक्षित ठेवण्याचे प्रयत्न

संसर्गापासून वाचण्याचा दुसरा एक प्रभावी उपाय म्हणजे स्वतः प्रयत्न करत राहणं.

कोरोनाचं अगदी समूळ उच्चाटन करण्याचा प्रयत्न करण्याऐवजी ज्यांना संसर्गाचा धोका सर्वाधिक आहे, त्यांचा बचाव कसा करता येईल, याला प्राधान्य देणं.

कोरोना व्हायरस

फोटो स्रोत, AFP

वाढतं वय आणि आरोग्य सुविधांचा अभाव या अशा दोन गोष्टी आहेत, ज्यामुळे कोव्हिड-19 जीवघेणा ठरु शकतो.

युनिव्हर्सिटी ऑफ एडिनबरामधील प्रोफेसर मार्क वुलहाऊसनं सांगितलं, की नैसर्गिकदृष्ट्या विचार करायचा झाल्यास आपल्यापैकी 80 टक्के लोकांसाठी हा व्हायरस खरंच खूप वाईट आहे. यामुळे खरंच आरोग्यविषयक गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. पण हा व्हायरस आरोग्य सेवांवर गंभीर परिणाम करणारा नाहीये, तसंच आपल्याला पूर्णपणे लॉकडाऊन करावं लागण्याच्या स्थितीत नेणाराही नाहीये.

ते सांगतात, "जर आपण खरंच एक सुरक्षा कवच तयार करण्यात यशस्वी झालो तर आपल्याला भविष्यात नक्कीच दिलासा मिळेल."

आपण असं सुरुवातीपासूनच करत असून अनेक जण कित्येक आठवड्यांपासून घरातच आहेत. सर्व आरोग्य कर्मचारी आणि ज्येष्ठ नागरिकांची वेळोवेळी चाचणी करत आपण आपलं सुरक्षाकवच अधिक मजबूत करू शकतो.

लॉकडाऊन हटविण्याची पद्धत काय?

लॉकडाऊनच्या दरम्यान आपण कोणते निर्बंध हटवू शकतो. डॉ. अडम कुचार्सकी सांगतात, "काही गोष्टी अशा असतात ज्यामध्ये कमी जोखीम आहे."

कोरोना व्हायरस

फोटो स्रोत, AFP

आपण निर्बंधांची तीन गटात वर्गवारी करू शकतो, असं कुचार्सकी सांगतात. पहिला निर्बंध ज्यामध्ये कमी जोखीम असेल. दुसऱ्या प्रकारच्या निर्बंधांमध्ये थोडी जास्त जोखीम असेल आणि तिसऱ्या प्रकारचे निर्बंध जे हटवल्यास संसर्गाचा धोका अचानक वाढू शकतो.

ज्यामध्ये कमी जोखीम आहे, असे निर्बंध हटविणे म्हणजे बाहेर पडून व्यायामाला परवानगी देणं. काही देशात यावरही निर्बंध आहेत. दुसऱ्या प्रकारच्या निर्बंधांमध्ये फार आवश्यकता नसलेल्या वस्तूंच्या खरेदीवरचे निर्बंध हटवणं किंवा एखाद्या निमित्तानं घराबाहेर एकत्र जमा होणं.

जे निर्बंध हटवले तर संसर्गाचा धोका मोठ्या प्रमाणावर वाढतो, त्यामध्ये वर्क फ्रॉम होम संपवणं, शाळा-कॉलेज पुन्हा सुरू करणं किंवा अलगीकरण-विलगीकरण बंद करणं.

मात्र समाज आणि अर्थव्यवस्थेला होणारं नुकसान कमी होईल यादृष्टीनं कोणता निर्बंध किती मर्यादेपर्यंत कमी करायचा, हे ठरवणं सध्याच्या परिस्थितीत अवघड आहे.

इम्युनिटी पासपोर्ट

सध्या इम्युनिटी पासपोर्टचीही मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहे. जर चाचणीतून तुम्हाला संसर्ग झाल्याचं समोर आलं आणि व्हायरसला मारणाऱ्या अँटीबॉडीही तुमच्या शरीरात तयार असतील तर तुम्ही तुमचं दैनंदिन आयुष्य जगू शकतात.

कोरोना व्हायरस

फोटो स्रोत, Getty Images

यामध्ये अनेक वैज्ञानिक चिंताही आहेत. पण आपल्याकडे आताच्या घडीला अँटीबॉडींबद्दल सांगणारी योग्य चाचणी नाहीये. आणि आपल्याला हेही माहीत नाही, की जर अँटीबॉडीनं तुम्हाला आजारी पडल्यापासून वाचवलं नाही, तर त्या अँटीबॉडी त्या व्हायरसला इतरांमध्ये पसरण्यापासून रोखू तरी शकतो का?

काय असेल सर्वाधिक फायदेशीर?

प्रोफेसर फर्गुसन यांच्या मते मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात निर्बंध हटवायला सुरुवात होईल. मात्र आपण व्हायरसचा संसर्ग रोखण्यात किती प्रमाणात यशस्वी होतोय, यावरही हा निर्णय अवलंबून असेल.

व्हायरसचा प्रादुर्भाव शक्य तितका कमी केल्यानंतरच आपण हे ठरवू शकतो, की त्याचा पुन्हा संसर्ग होण्याची शक्यता आपण कमी केली आहे, की नाही. जर असं नाही झालं तर लॉकडाऊन लांबू शकतो.

कोरोना व्हायरस

फोटो स्रोत, Getty Images

जर आपण आधीच लॉकडाऊन हटविण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर मोठ्या संख्येनं रुग्णांची संख्या समोर आली तर अजूनच गंभीर समस्या निर्माण होऊ शकते.

जर यावर लस शोधण्यात आली, तर मात्र चित्र बदलेल. जर लोकांना लस देऊन त्यांची या विषाणूविरोधात लढण्याची प्रतिकारक्षमता वाढवली तर सोशल डिस्टन्सिंगची आवश्यकता उरणार नाही. मात्र त्यासाठी एका वर्षापेक्षा जास्त काळ लागेल.

जर आपल्याला नजीकच्या काळात लस बनविण्यात कोणतंही यश नाही मिळालं तर 'हर्ड इम्युनिटी' ची शक्यता वाढू शकते. जेव्हा मोठ्या प्रमाणात लोकांना (जवळपास 70 टक्के) विषाणूचा संसर्ग झाला आणि मग व्हायरसचा प्रादुर्भाव अधिक वाढणारच नाही, तेव्हा ही हर्ड इम्युनिटी' कामी येते.

येत्या काळात आपण सामान्य आयुष्य जगायला लागू ही आशा करायला हरकत नाही, पण सध्या तरी आपण अंधारातच चाचपड आहोत.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)