कोरोना व्हायरस : लव्ह, सेक्स आणि कोरोना - लॉकडाऊनमध्ये लोक प्रेम कसं करतायत?

प्रेम शोधणं किती अवघड असतं, हे आता वेगळं सांगायला नकोच. पण लॉकडाऊनच्या काळात तर ते आणखीनच अवघड होऊन बसलंय.
चीन ते अमेरिका, स्पेन ते भारत आज जवळपास निम्म जगं लॉकडाऊन आहे. कोरोना विषाणुचा संसर्ग होऊ नये म्हणून सोशल डिस्टंसिंग पाळलं जात आहे. या परिस्थितीमुळे सामान्य आयुष्यावर बरीच बंधनं आली आहेत.
मात्र या लॉकडाऊनचा डेटिंग आणि रिलेशनशिपवर कसा परिणाम होतोय? याविषयी जगभरातल्या पाच जणांनी बीबीसीशी त्यांच्या कहाण्या शेअर केल्या आहेत.
पुढे वाचणार असाल तर जरा सावधान - हा प्रौढांचा विषय आहे
देबस्मिता, वय : 24, दिल्ली

मी सध्याच्या माझ्या बॉयफ्रेंडला तीन महिन्यांपूर्वी डेट करायला सुरुवात केली. यावेळी मला याचं खूप समाधान होतं, की आम्ही दोघं एकाच शहरात राहतो. यापूर्वीचे माझे रिलेशनशिप्स लाँग डिस्टंस रिलेशनशिप होते. त्यामुळे मी आता अशा मुलासोबत आहे ज्याच्यासोबत मला वेळ घालवायला मिळणार आहे, याचा मला खरंच आनंद झाला होता.
एकाच ऑफिसमध्ये असल्यामुळे आम्ही रोजच भेटायचो. मात्र, लॉकडाऊनमुळे हे रिलेशनशिपसुद्धा लाँग डिस्टंस रिलेशनशिप बनलं. माझ्यासाठी हे खूपच संतापजनक होतं. कारण असं काहीतरी होईल, यासाठी आपण मानसिकरित्या तयार नसतो.
आता आम्ही व्हीडिओ कॉलवरून एकमेकांशी बोलतो. दिवसातून सहा ते सात वेळा व्हीडिओ कॉल करतो. आम्ही दोघं एकाचवेळी एकच सिनेमा बघतो आणि सिनेमा बघत बघत गप्पा मारतो. कधीकधी आम्ही सारखाच स्वयंपाक बनवतो. मला कोडी आवडतात. त्यामुळे आता आम्ही खूप ऑनलाईन कोडी सोडवतो. एकमेकांपासून अनिश्चित काळासाठी दूर असताना रोजच्या आयुष्यातल्या गोष्टी कशा करायच्या, हे शोधण्याची ही आमची पद्धत आहे.
अशा जगण्याचा बराच ताण येतो आणि कधीकधी आम्हा दोघांमध्ये बराच वादही होतो. समोरासमोर बसून बोलणं फार वेगळं असतं. समोरासमोर बोलताना समजावून सांगणं जास्त सोपं असतं. समजून घेणं जास्त सोपं असतं.
मात्र, बरेचदा आम्हाला या सगळ्यांचं फार हसूही येतं. यातून आमचं रिलेशनशिप तावून सुलाखून बाहेर पडलं तर आम्हाला लोकांना सांगता येईल की आम्ही आमच्या नात्याच्या सुरुवातीच्या काळात एवढा मोठा अडथळा कसा पार केला. मला वाटतं हेसुद्धा स्पेशल आहे.

- महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा - क्वारंटाईन, आयसोलेशन किंवा विलगीकरण म्हणजे नेमकं काय?
- वाचा -लहान मुलांना कोविड 19 चा धोका किती?
- वाचा - व्हेंटिलेटर्स काय असतात? कोरोनाच्या लढ्यात ते इतके महत्त्वाचे का आहेत?
- वाचा - कोरोनाच्या तडाख्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था अजूनच संकटात?

सोफी*, वय : 27, शांघाई, चीन

वुहानमध्ये लॉकडाऊन सुरू झालं आणि संपूर्ण चीनमध्ये जवळपास तशाच पद्धतीचे निर्बंध लादले गेले त्याच्या जवळपास आठवडाभरापूर्वीच माझं ब्रेकअप झालं होतं. असं काहीतरी घडेल, याची कुणाला कल्पनादेखील नव्हती. मी एकटीच होते आणि म्हणून या सर्व परिस्थितीचा सामना करणं, माझ्यासाठी विशेष कठीण होतं.
मग मी डेटिंग अॅपची मदत घेण्याचा विचार केला. पुढे माझ्या मांजरासोबत अपार्टमेंटमध्ये एकटीने राहताना तासनतास डेटिंग अॅपवर घालवणं माझ्यासाठी मनोरंजनाचं माध्यमच बनलं.
मी अनेक मुलांशी गप्पा मारल्या. भरपूर बोलले. प्रत्यक्ष भेटण्याआधी एकमेकांना जाणून घेण्यासाठी गप्पा मारणं हाच एकमेव मार्ग असतो.
मात्र, त्यानंतर भेटायचं असतं. पण सर्व रेस्टॉरंट आणि सार्वजनिक ठिकाणं बंद होती. एखादं कॅफे उघड असेल तरी तिथे भेटताना चेहऱ्याला मास्क बांधूनच भेटावं लागायचं आणि अशाप्रकारे एखाद्याला पहिल्यांदा भेटायला जाताना मास्क बांधून भेटणं, याला काही अर्थ नसतो.
असं वाटतं, की जणू तुम्ही एखाद्या बुडबुड्यामध्ये कैद आहात आणि कुणीच हा बुडबुडा फोडू शकत नाही. मास्क बांधल्यामुळे सुरक्षित वाटतं. मात्र, बरेचदा तुम्हाला समोरच्या व्यक्तीला स्पर्श करायचा असतो किंवा स्पर्श करण्याची इच्छा होते. डेट करत असणाऱ्या व्यक्तीला तुम्ही ओळखत असाल तर गोष्ट वेगळी असते. मात्र, ऑनलाईन डेटिंगबद्दल सांगायचं तर या विषाणुमुळे बऱ्याच मर्यादा आल्या आहेत.
दोघांनाही विषाणुचा संसर्ग झालेला नाही, याची खात्री नसताना तुम्ही एखाद्या अनोळखी व्यक्तीला कसं भेटणार? हे फार रिस्की असतं.
यातून काहीच हाती लागत नाही. त्यामुळे मी ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. आणि खरं सांगायचं तर हे सगळं लवकर निवळेल, असंही मला वाटत नाही.
जेरेमी कोहेन, वय : 28, ब्रुकलीन, अमेरिका

माझ्या अपार्टमेंटमध्ये मी एकटीच आहे. अशाप्रकारे क्वारंटाईनमध्ये असताना स्वतःला बिझी ठेवण्यासाठी मी शेजार-पाजरच्या गच्चीवर दिसणाऱ्या लोकांचे फोटो काढायला सुरुवात केली.
काही दिवसांपूर्वी मला शेजारच्या गच्चीवर एक मुलगी डान्स करताना दिसली. तिची एनर्जी बघून मी अवाक् झाले. मी बाल्कनीत जाऊन तिला हात दाखवला. तिनेही माझ्याकडे बघून हात हलवला.
मला आमच्यामध्ये काहीतरी कनेक्शन असल्याचं लगेच जाणवलं. आता मला तिच्याशी बोलायचं होतं. असामान्य परिस्थितीत मार्गही असामान्य शोधावे लागतात. मी माझा ड्रोन काढला. एक छोटी नोट लिहिली. त्यावर माझा फोननंबर लिहिला. तो कागद ड्रोनला अडकवला आणि ड्रोन तिच्या गच्चीच्या दिशेने पाठवलं.
जवळपास तासाभरानंतर माझ्या मोबाईलवर तिचा मेसेज आला आणि अशाप्रकारे आमचं बोलणं सुरू झालं. मी तिला डेटसाठी विचारलं आणि तिच्या रुममेटच्या मदतीने डेट ठरवली.
ठरलेल्या दिवशी आम्ही दोघीही आपापल्या गच्चीवर गेलो. डेटसाठी दोघींनी जवळपास सारखीच तयारी केली होती. एक छोटा टेबल. त्यावर वाईन आणि थोडं स्नॅक्स. आम्ही फेसटाईमवरून एकमेकींना बघत होतो, बोलत होतो.
दुसऱ्या भेटीत मला तिच्या खूप जवळ जायचं होतं. मात्र, त्यासाठी प्रत्यक्षात कुठलीही सीमा ओलांडता येणार नव्हती.
मी सोशल मीडियावर आमच्याबद्दल पोस्ट करत होते. आमची कहाणी व्हायरल झाली. आम्हाला मुलाखतींसाठी फोन येत होते आणि अशा विचित्र पद्धतीने आम्ही एकमेकींच्या अधिक जवळ येत गेलो.
लॉकडाऊन नसतं तर कदाचित हे सगळं घडलंही नसतं. एक उत्कृष्ट व्यक्ती मला भेटली याचा मला खूप आनंद आहे.
मला वाटतं घरात बंद असल्यामुळेच मला क्रिएटिव्ह होण्याची आणि इतर कुणाशीतरी कनेक्ट होण्याची प्रेरणा मिळाली.
क्लारिस, वय : 35, किंशासा, कांगो प्रजासत्ताक

कोव्हिड-19 आजाराचं संकट ओढावण्यापूर्वी मी एकाला अगदी कॅज्युअल डेट करत होते. आम्ही जवळपास रोज भेटायचो. मात्र, भावनिकरित्या यात गुंतायची माझी इच्छा नव्हती. नात्याला वेळ द्यावा, असं मला वाटत होतं. मात्र, असं काहीतरी घडेल, असं कुणाला वाटलं होतं?
कांगो प्रजासत्ताकमध्ये सध्यातरी लॉकडाऊन नाही. मात्र, आरोग्य क्षेत्रात काम करत असल्यामुळे मी याकडे गांभीर्याने बघते. मात्र, याचा त्याला राग आला. मी जवळपास चार आठवड्यांपूर्वी त्याला भेटणं बंद केलं आणि हे का गरजेचं आहे, हेसुद्धा त्याला सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला वाटतं की मला त्याच्यापासून दूर व्हायचं आहे आणि म्हणून मी हे कारण पुढे केलं.
मला त्याची आठवण येते. आयुष्यात जो कायमस्वरूपी असणार आहे, अशा कुणालातरी मी गमावत तर नाही ना, अशी काळजी वाटते. तो माझी वाट बघणार नाही, अशी भीतीही मला सतावते. शारीरिक जवळीकही मी मिस करते.
सगळ्यांनाच कामेच्छा असते. मात्र, अशावेळी तुम्हाला पर्यायी मार्ग शोधावे लागतात. सुदैवाने, माझ्या व्हायब्रेटरने मला कायम साथ दिली आहे. मला वाटतं माझ्या बॉयफ्रेंडला याची कल्पना असावी आणि म्हणूनच कदाचित तो असं वागतोय.
या सर्वामुळे मी निराश झाले आहे आणि कधीकधी खूप एकटेपणा जाणवतो. आता तो पूर्वीसारखं माझ्याशी बोलत नाही आणि माझ्या मेसेजलाही उशिरा उत्तर देतो. मला स्वतःला आणि त्यालाही या आजारापासून दूर ठेवण्याचा माझा प्रयत्न आहे. पण, आता मी जवळपास मान्य केलं आहे की या संकटात आमचं नातं टिकणार नाही.
जुली, वय : 24, इलिगाना सिटी, फिलिपिन्स

मी दोन महिन्यांपेक्षाही जास्त काळापासून टिंडरवर आहे. फिलिपिन्समध्ये कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू होण्याआधी मी अनेक मुलांसोबत डेटवर जायचे आणि आम्ही जवळ यायचो. अर्थात मला जेव्हा वेळ असेल तेव्हाच हे सगळं करायचे.
आणि आता अचानक माझ्याकडे खूप वेळ आहे. पण मी कुणाला भेटू शकत नाही. मी सध्या कुणालाच डेट करत नसल्याने माझं सेक्चुअल लाईफही कंटाळवाणं झालं आहे. माझी कामेच्छा पूर्ण करण्यासाठी सध्या मी काहीच करू शकत नाही आणि यामुळे बरेचदा फ्रस्टेशन येतं.
लॉकडाऊनच्या काळातही मी डेटिंग अॅपवर बरीच अॅक्टिव्ह असते. मी मुलांशी बोलते. कामभावना चाळवणारे विषय बोलले जातात. मग आम्ही व्हिडियो कॉल करतो आणि सायबरसेक्स करतो. यातून आम्हा दोघांच्याही कामेच्छा पूर्ण करायला मदत होते. हे सामान्य नाही. पण आमच्याकडे दुसरा मार्गही नाही.
या मुलांना भेटायला मला आवडेल. पण इथे वाहतुकीचं साधनच सध्या उपलब्ध नाही आणि बाहेर पडायलाही मनाई आहे. मी माझ्या विद्यापीठाच्या हॉस्टेलवर एकटी राहते आणि सध्या भरपूर वेळ आहे. त्यामुळे तर कामेच्छा अधिकच चाळवतात. सगळं फार अवघड होऊन बसलं आहे. आता मी रोजच मास्ट्रूबेट करते. दिवसातून एकापेक्षा जास्त वेळेला. कदाचित पुढचे काही दिवस हे असंच असणार आहे.
*सोफी हे बदललेलं नाव आहे.
(निकिता मंधानी यांनी या कहाण्या गोळा केल्या आहेत, तर लॉर्ना हॅन्किन यांनी त्या संपादित केल्या आहेत. सर्व चित्र निकिता देशपांडे यांनी रेखाटली आहे.)
हेही नक्की वाचा -
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








