कोरोना व्हायरस चीनने मुद्दाम पसरवलाय, असं तुम्हाला वाटतं का?

कोरोना चीन

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, हर्षल आकुडे
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

कोरोना व्हायरसमुळे सगळ्या जगाला क्वारंटाईन होण्याची वेळ आली आहे. त्यामुळे लोक सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टीव्ह झाल्याचं दिसत आहेत.

या सगळ्या गदारोळात कोरोना व्हायरस हे "चीनने बनवलेलं जैविक हत्यार म्हणजेच बायोवेपन" असल्याचा दावा करणारा मेसेज तुम्हालाही व्हॉट्सअॅपवर आला असेल.

कदाचित तुम्हीसुद्धा तो शेअर केलेला असू शकतो. याच दाव्यांची सत्यता पडताळण्याचा प्रयत्न बीबीसी मराठीने केला आहे.

काय आहे मेसेजमध्ये?

कोरोना व्हायरस म्हणजे चीनचं नाटक असल्याचा दावा या मेसेजमध्ये करण्यात आला आहे. यामध्ये चीन कशाप्रकारे आजारी पडतो. स्वतःच्या चलनाचं अवमूल्यन करतो.

कोरोना चीन

फोटो स्रोत, Getty Images

त्यानंतर चीनमध्ये असलेल्या युरोपीय आणि अमेरिकन कंपन्यांचा व्यापार कमी झाल्याने त्यांचे शेअर्सचे भाव घसरतात आणि त्याचा फायदा चीन पुढे कशा प्रकारे घेतो, चीनचे मित्र असलेल्या उत्तर कोरिया आणि रशिया या देशांमध्ये या व्हायरसचा कसा प्रसार झाला नाही वगैरे वर्णन करण्यात आलं आहे.

पण फक्त व्हॉट्सअपवरच अशा प्रकारचे मेसेज पाठवण्यात आले आहेत, असं नाही. वॉशिंग्टन टाईम्स या अमेरिकेतील न्यूज वेबसाईटनेही याबाबत बातमी दिली होती.

कोरोना
लाईन

चीनने आपल्या जैविक हत्यार उपक्रमाअंतर्गत वुहान शहरातील वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी याठिकाणी कोरोना व्हायरस तयार केला होता. तिथून तो लिक झाल्यामुळे समाजात पसरला, असं या बातमीत म्हटलं आहे. ही बातमी देताना इस्रायलच्या एका माजी लष्करी अधिकाऱ्याचाही उल्लेख करण्यात आला आहे.

जैविक हत्यार म्हणजे नेमकं काय?

युद्धात वापरली जाणारी विमानं, बंदूक, रणगाडे आदी शस्त्रास्त्रं दृश्य स्वरूपातील शस्त्रास्त्र आहेत. पण तंत्रज्ञानाने प्रगती केली तशी जैविक हत्यारांबाबतही चर्चा होऊ लागली आहे.

कोरोना चीन

फोटो स्रोत, Getty Images

जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, जैविक हत्यार म्हणजे विशिष्ट प्रकारचे विषाणू, बॅक्टेरिया, बुरशी किंवा विषारी सुक्ष्मजीव तयार करून एखाद्या भागात जाणीवपूर्वक सोडले जातात. या विषाणूंमुळे संबंधित परिसरात आजार पसरू शकतात. परिणामी मानव, प्राणी किंवा वृक्षांचा नाश होऊ शकतो.

अँथ्रॅक्स, बोटुलिनम टॉक्झिन किंवा प्लेग यांच्यासारखे जैविक हत्यार वापरल्यास त्याचा सामाजिक आरोग्यावर अनिष्ट परिणाम होऊ शकतो. यामुळे अत्यंत कमी वेळेत अनेकांचा जीव जाऊ शकतो. हे रोखणं कठीण असतं.

उदाहरणार्थ इबोला किंव हास्सा विषाणूंचा त्याचा वापर जैविक हत्यारांप्रमाणे केल्यास त्यातून साथीचे रोग पसरु शकतात.

कोरोना चीन

फोटो स्रोत, Getty Images

दहशत पसरवण्यासाठी, मोठ्या प्रमाणात नरसंहार करण्यासाठी जैविक हत्यार वापरले जाऊ शकतात. जैविक हत्यारांचा वापर ही गंभीर समस्या आहे. अशा प्रकारची हत्यारं वापरली जाण्याचा धोका दिवसेंदिवस वाढत चालला आहे, असं जागतिक आरोग्य संघटनेनं सांगितलं आहे.

40 वर्षांपूर्वीचं पुस्तक आणि वुहान-400

कोरोना व्हायरसबाबत अफवांना पेव फुटलेलं असतानाच काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते मनिष तिवारी यांनीही चीनने बायोवेपन वापरल्यासंदर्भात प्रश्नजैचिन्ह उपस्थित केलं आहे. यासाठी त्यांनी अमेरिकन लेखक डीन कुंटूज यांनी 1981 मध्ये लिहिलेल्या ‘द आईज ऑफ डार्कनेस’ या पुस्तकाचा दाखला दिला आहे.

आपल्या ट्विटमध्ये तिवारी यांनी म्हटलंय,

कोरोना व्हायरस म्हणजे चीनने तयार केलेलं जैविक हत्यार "वुहान-400" हेच आहे का? हे पुस्तक 1981 साली प्रकाशित झालं आहे. हा उतारा वाचा.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

विशेष म्हणजे या पुस्तकातील उताऱ्यामध्ये वुहान शहराचाच उल्लेख असल्यामुळे या ट्विटची चर्चा सगळीकडे रंगली आहे.

अमेरिका-चीन आमनेसामने

गेली काही वर्षे अमेरिका आणि चीन या दोन्ही देशांमध्ये काही काळासाठी व्यापार युद्ध झालं होतं. त्याची किनार या वादाला असू शकते.

कोरोना चीन

फोटो स्रोत, Getty Images

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी काही दिवसांपूर्वी कोरोना व्हायरसला चायनीज व्हायरस म्हटलं. त्याला प्रत्युत्तर देताना अमेरिकेने यापेक्षा परिस्थिती नियंत्रणात आणण्याकडे लक्ष द्यावं, असं चीन सरकारच्या प्रवक्त्यांनी म्हटलं होतं. दरम्यान रशियालील माध्यमांनी अमेरिकन सैन्यानेच हा व्हायरस चीनमध्ये पेरल्याचा आरोप केला.

त्यानंतर वाद निर्माण झाल्यामुळे ट्रंप यांनी यापुढे हा शब्द वापरणार नसल्याचं म्हटलं आहे.

बिनबुडाचे आरोप

जैविक हत्यारांबाबतच्या सध्याच्या चर्चा पाहिल्यास अमेरिका, चीन आणि रशिया हे बलाढ्य देश एकमेकांवर फक्त बिनबुडाचे आरोप करत असल्याचं दिसून येईल. हे आरोप करताना असताना त्यांनी त्यासंदर्भात कोणतीही पार्श्वभूमी सांगितलेली नाही.

ट्रंप

फोटो स्रोत, Getty Images

परस्परांवर आरोप करत असताना ते करत असलेले दावे सिद्ध करण्यासाठी कोणताही पुरावा त्यांनी दिलेला नाही. त्यामुळे या अनुषंगाने फॉरवर्ड करण्यात येत असलेल्या मेसेजवर कितपत विश्वास ठेवावा याबाबत प्रश्नचिन्ह आहे. तसंच एका काल्पनिक पुस्तकातील माहितीच्या आधारे आपण आपलं मत बनवणं सध्यातरी घाईचं ठरेल.

कारण या सगळ्य दाव्यांची सत्यता सध्यातरी पडताळली जाऊ शकत नाही.

त्यामुळे कोरोना व्हायरस बाबत चुकीचा तर्क मांडून अफवांचे मेसेज फॉरवर्ड करण्याऐवजी घरातून बाहेर न पडणं, स्वच्छतेच्या नियमांचं पालन करणं यांसारखे उपाय वापरल्यास कोरोना व्हायरसवर आळा घालणं आपल्य सर्वांना शक्य होईल.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)