कोरोना व्हायरस : मुंबई ते दुबई, लॉकडाऊनमुळे असं थांबलंय जग - पाहा फोटो

फोटो स्रोत, ANI
एरवी कधीही शांत नसणारे जगभरातील प्रसिद्ध रस्ते, पर्यटन स्थळं, समुद्र किनारे आज डोळ्यांनाही न दिसणाऱ्या एका विषाणूने अक्षरशः बंद पाडले आहेत.
काही ठिकाणी सरकारनेच बंदी घातली आहे तर काही ठिकाणी खबरदारीचा उपाय म्हणून लोक स्वतःच गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळत आहेत. जगभरातील अशीच काही ओस पडलेली प्रसिद्ध ठिकाणं आज कशी दिसत आहेत, पाहूया.
लंडन

फोटो स्रोत, HANNAH MCKAY / Reuters
हा आहे लंडनचा मेलेनियम पूल. एरवी गर्दीच्या वेळी पुलावर हजारो लोक ये-जा करत असतात.
मात्र पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी कोरोना विषाणूच्या फैलावाला आळा घालण्यासाठी यूकेच्या नागरिकांना 'अनावश्यक' प्रवास आणि गाठीभेटी टाळण्याचं आवाहन केल्यानंतर मेलेनियम पुलावर आज असा शुकशुकाट आहे.
खुद्द पंतप्रधान जॉन्सन, त्यांचे आरोग्य मंत्री, आरोग्य सचिव आणि प्रिन्स चार्ल्स हेसुद्धा कोरोना बाधित आढळले आहेत.


फोटो स्रोत, VALERY HACHE / Getty
फ्रान्समधल्या नीस या निसर्गरम्य शहरातील भूमध्य समुद्राची किनारपट्टीही अगदी शांत आहे.
या किनारपट्टीला समांतर असा 'प्रॉमेनाड दे अँगले' मार्ग आहे. संध्याकाळी अनेक पर्यटक, रहिवाशी या रस्त्यावर निवांत वेळ घालवायला येतात. मात्र गेल्या कित्येक आठवड्यांपासून फ्रान्समध्ये लॉकडाउन करण्यात आल्याने हे ठिकाणसुद्धा ओस पडलंय.

दुबई

फोटो स्रोत, MAHMOUD KHALED / EPA
ड्रोनने काढलेल्या या फोटोमध्ये दुबईतला समुद्रकिनारा दिसतोय.
दुबई म्हणजे पर्यटकांसाठी खास आकर्षण. मात्र कोरोनाच्या फैलावानंतर यूएई सरकारने पार्क आणि बिचेससह सर्व पर्यटन आणि सांस्कृतिक स्थळं 30 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. इतकंच नाही तर परदेशी प्रवाशांना व्हिसा देणंही बंद केलं आहे.

इटली

फोटो स्रोत, DANIEL DAL ZENNARO / EPA
हे आहे इटलीतील मिलान शहरातील जगप्रसिद्ध 'पिआझ्झा दुमो'. चीननंतर कोरोनामुळे इटलीत मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली आहे. त्यामुळे इटली सरकारने लोकांना घराबाहेर पडायला बंदी घातली आहे. तसंच अन्नधान्य दुकानं आणि मेडिकल स्टोअर्स वगळता सर्व दुकानं बंद केली आहेत. त्यामुळे या 'पिआझ्झा दुमो'मध्येही आता केवळ कबुतरं दिसतात. माणसं मात्र घरात कैद आहेत.

कोरोनाने भारतालाही विळखा घातला आहे. भारतातही पर्यटनस्थळं बंद आहेत.

फोटो स्रोत, ADNAN ABIDI / Reuters
लोकांनी पर्यटनस्थळांकडे कशी पाठ वळवली आहे, हे मुगल वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना असलेला दिल्लीतील सफदरजंग मकबऱ्याचा हा फोटो बघूनच लक्षात येतं.

व्हेनेझिएला

फोटो स्रोत, Miguel Gutierrez / EPA
व्हेनेझुएलाची राजधानी असणारं कॅराकॅस त्या देशाचं सांस्कृतिक आणि व्यावसायिक केंद्रही आहे. शहराचा मुख्य भाग असलेला फ्रान्सिस्को डी मिरांडा एव्हेन्यूमध्ये आज टाचणी पडला तरी आवाज होईल, एवढी शांतता आहे. लोकांनी घरातच राहावं, बाहेर पडू नये, दुकानं बंद ठेवावी आणि खबरदारीचे उपाय पाळावे, यासाठी व्हेनेझुएलाच्या सुरक्षा बलाचे जवान स्वतः नागरिकांशी चर्चा करत आहेत.

न्यूयॉर्क

फोटो स्रोत, JEENAH MOON / REUTERS
जगभरातल्या लोकांना जिथे जाण्याची इच्छा असते त्या अमेरिकेच्या न्यू यॉर्क शहरातही शुकशुकाट आहे. अमेरिकी सरकारने न्यू यॉर्क शहरातल्या शाळा, रेस्टॉरंट्स, बार आणि पर्यटन स्थळं सगळे तात्पुरते बंद केले आहेत. न्यू यॉर्कचा टाईम स्क्वेअरही बंद आहे.

स्पेन

फोटो स्रोत, FERNANDO VILLAR / EPA
स्पेनची राजधानी माद्रिदला लागून असलेल्या 'अॅलाकॅला दी हेनारेज' शहरातल्या या देखण्या इमारती. इथेही सुरक्षा दलांचे जवान रस्त्यावर खडा पहारा देत आहेत.
संपूर्ण स्पेनमध्ये नागरिकांनी घरीच राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. जीवनावश्यक वस्तू आणि कामाव्यतिरिक्त कुणालाही बाहेर पडायला बंदी आहे.

व्हिएन्ना

फोटो स्रोत, HELMUT FOHRINGER / AFP
ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्ना शहरातही कुणीच रस्त्यावर दिसत नाही. तिथेही पाच पेक्षा जास्त लोकांना एकत्र जमण्यावर सरकारने बंदी घातली आहे.

लेबनॉन

फोटो स्रोत, ALI HASHISHO / REUTERS
लेबनॉनमध्येही सरकारने वैद्यकीय आणीबाणी घोषित केली आहे. त्यामुळे लेबनॉनमधल्या तीन प्रमुख शहरांपैकी एक आणि पोर्ट सिटी अशी ओळख असलेल्या सिडॉनचे रस्तेही ओस पडलेले दिसतात.

थायलंड

फोटो स्रोत, LILLIAN SUWANRUMPHA / AFP
बार, कसिनो, मसाज पार्लर, नाईट लाईफ ते नयनरम्य बीचेस अशी पर्यटकांसाठी खास आकर्षणं असणारं शहर म्हणजे थायलँडची राजधानी बँकॉक. या शहरातही निरव शांतता पसरली आहे. थायलँडच्या एकूण उत्पन्नात 10% वाटा हा पर्यटनातून येतो. मात्र, कोरोनामुळे इथेही पर्यटकांची गर्दी रोडावली आहे.

सर्व फोटोंचे कॉपीराईट त्या त्या फोटोग्राफर्सचे आहेत.

- वाचा - महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग; पाहा सर्व ताजे अपडेट्स
- वाचा - कोरोना व्हायरसची शरीरातील प्राथमिक लक्षणं कशी ओळखाल?
- वाचा - कोरोना व्हायरसची लक्षणं दिसायला किती दिवस लागतात?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा -मास्कची विल्हेवाट कशी लावायची? नवं संकट टाळण्यासाठी ‘हे’ नक्की करा
- वाचा - क्वारंटाईन, आयसोलेशन किंवा विलगीकरण म्हणजे नेमकं काय?
- वाचा - मुंबईत लोकल ट्रेनमध्ये कसा रोखणार कोरोना व्हायरस?
- वाचा - 'गो कोरोना': या लोकांनी केली कोरोना व्हायरसवर मात

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








