कोरोना व्हायरसः कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्या पत्नीलाही लागण

जस्टिन ट्रुडो आणि सोफी ग्रेगोइर ट्रुडो

फोटो स्रोत, Getty Images

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांची पत्नी सोफी ग्रेगोइर ट्रुडो यांना कोरोना व्हायरसची लागण झालीय. त्यामुळं सोफी ग्रेगोइर ट्रुडो आणि जस्टिन ट्रुडो यांना इतरांपासून वेगळं ठेवण्यात आलंय.

सोफी ग्रेगोइर ट्रुडो यांची तब्येत ठीक असल्याची माहिती कॅनडाच्या पंतप्रधानांच्या माध्यम संचालकांनी पत्रकाद्वारे दिली.

Presentational grey line
BBC
Presentational grey line

जस्टिन ट्रुडो यांच्यामध्ये कोरोना व्हायरसची कोणतीही लक्षणं आढळली नाहीत. मात्र, खबरदारी म्हणून त्यांना 14 दिवसांसाठी वेगळ्या जागी ठेवण्यात येणार आहे.

सोफी या नुकत्याच यूकेतून परतल्या होत्या. त्यानंतर त्यांच्यामध्ये फ्लूसदृश लक्षणं जाणवल्यानं त्यानं डॉक्टरांकडे नेण्यात आलं, अशी माहिती स्वत: जस्टिन ट्रुडो यांनी ट्विटरवरून दिलीय.

ट्वीट

फोटो स्रोत, Twitter

तर इतरांपासून वेगळं ठेवण्यात आल्यानंतर सोफी ग्रेगोइर ट्रुडो यांनी एक पत्रक काढलं आणि लोकांना आपल्या तब्येतीबाबत माहिती दिली. त्यात त्या म्हणाल्या, "या लक्षणांमुळं मला अस्वस्थ वाटतंय, पण मी बरी होऊन परत येईन."

'जस्टिन ट्रुडो काम सुरूच ठेवणार'

इतरांपासून 14 दिवस वेगळं ठेण्यात आलं असूनही जस्टिन ट्रुडो हे पंतप्रधान म्हणून त्यांचं काम सुरूच ठेवणार आहेत, अशी माहिती कॅनडाच्या पंतप्रधान कार्यालयानं दिली. तसंच, ट्रुडो उद्या कॅनडाच्या जनतेला उद्देशून भाषण करणार आहेत.

"जस्टिन ट्रुडो यांची तब्येत ठीक असून, त्यांच्यामध्ये कोरोना व्हायरसची कोणतीही लक्षणं आढळली नाहीत. केवळ खबरदारी आणि डॉक्टरांच्या सूचना म्हणून त्यांना 14 दिवस वेगळं ठेवण्यात आलंय," अशी माहिती कॅनडाच्या पंतप्रधान कार्यालयानं दिली.

ऑस्कर विजेते अभिनेते टॉम हँक्स यांनाही कोरोना व्हायरसची लागण

दोनच दिवसांपूर्वच ऑस्कर विजेते अभिनेते टॉम हँक्स आणि त्यांची पत्नी रिटा विल्सन यांनाही कोरोना व्हायरसची लागण झाल्याची माहिती टॉम यांनी जाहीर केली आहे.

टॉम हँक्स

फोटो स्रोत, EPA

फोटो कॅप्शन, टॉम हँक्स आणि रिटा विल्सन

हँक्स आणि रिटा दोघेही 63 वर्षांचे आहेत. क्वीन्सलँडमध्ये सर्दीची लक्षणं दिसून आल्यावर वैद्यकीय उपचार घ्यायला सुरुवात केल्याचे त्यांनी इन्स्टाग्रामवर लिहिलं आहे. आता ते काही काळ सर्वांपासून दूर राहून उपचार घेतील.

एल्विस प्रिसलेच्या जीवनावर आधारित चित्रपटाचं चित्रिकरण करण्यासाठी ते गोल्ड कोस्ट येथे गेले होते.

हँक्स यांनी इन्स्टाग्रामवर लिहिलं, आम्हाला थोडसं थकल्यासारखं वाटत होतं. सर्दी आणि अंगदुखीचा त्रास होत होता. रिटालाही सर्दी होती आणि थोडा तापही आला. तपासणी केल्यानंतर आम्हाला कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे दिसून आले. या आजाराची माहिती आपण वेळोवेळी सर्वांना सांगत राहू असं त्यांनी सांगितलं आहे.

कोरोनाची लक्षणं
फोटो कॅप्शन, कोरोना व्हायरसची लागण झाल्यास दिसणारी लक्षणं

टॉम काम करत असेल्या चित्रपटाचं काम तात्पुरतं थांबवल्याचं ऑस्ट्रेलियातील स्थानिक माध्यमांनी दिली आहे. गायिका आणि अभिनेत्री असलेल्या रिटा यांनी ब्रिस्बेन इथल्या एम्पोरियम हॉटेल आणि सिडनी ऑपेरा हाऊस येथे गेल्या आठवड्यात एका मैफिलित सहभाग घेतला होता.

अमेरिकेत युरोपिय प्रवाशांना बंदी

अमेरिकेनं युरोपातून येणाऱ्या प्रवाशांवर 30 दिवसांची बंदी घातली आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी ही घोषणा केली आहे. शुक्रवारी मध्यरात्रीपासून ही घोषणा लागू होणार आहे.

विषाणूंचा प्रसार रोखण्यासाठी
फोटो कॅप्शन, विषाणूंचा प्रसार रोखण्यासाठी

राष्ट्राला उद्देशून दिलेल्या संदेशात ट्रंप यांनी ही घोषणा केली आहे. "कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी मी सर्व प्रकारच्या यंत्रणांचा वापर करण्यासाठी तयार आहे," असं ट्वीट त्यांनी केलं आहे.

"कोरोना व्हायरस हा सर्वांचा समान शत्रू आहे. संपूर्ण जगाचा शत्रू आहे. सुरक्षित पद्धतीने आपल्याला त्याला लवकरात लवकर हारवावं लागेल. अमेरिकी लोकांची सुरक्षा आणि त्यांच्या जीवनापेक्षा मला काहीच महत्त्वाचं नाही," असं सुद्धा त्यांनी ट्वीट केलं आहे.

अमेरिकेत आतापर्यंत 1135 लोकांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. तर 38 जणांचा मृत्यू झाला आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)