कोरोना व्हायरस पसरला 40 हून अधिक देशात, बळींची संख्या 2800 च्यावर

ईरान, कोरोनावायरस

फोटो स्रोत, Getty Images

चीनच्या वुहान शहरातून सुरू झालेला कोरोना व्हायरस आता अमेरिका, मध्य-पूर्व, यूरोप, आशिया आणि लॅटीन अमेरिकेसह जगभरातील 40 देशात पसरला आहे.

आता कोरोना व्हायरस चीनच्या अंतर्गत भागांपेक्षा कितीतरी जास्त वेगाने जगातील इतर देशात पसरू लागला आहे.

युरोपातील इटली या देशात कोरोना व्हायरसची लागण झालेल्यांची संख्या 400 पर्यंत पोहोचली आहे. काल एका दिवसात कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांचे 80 नवे रुग्ण आढळून आले.

इटलीशिवाय कोरोना व्हायरसने युरोपच्या नॉर्वे, ऑस्ट्रिया, जर्मनी, फ्रांस, ब्रिटन, ग्रीस, क्रोएशिया, स्वित्झर्लंड, जॉर्जिया, उत्तर मेसेडोनिया आणि स्पेनमध्ये आपले हातपाय पसरले आहेत.

मध्य-पूर्वेतील देशात इराण, इराकसह इतर देशांत कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव होत आहे.

तर एशिया-पॅसिफिक देशांत दक्षिण कोरियामध्ये कोरोना व्हायरस झपाट्याने पसरू लागला आहे.

दक्षिण कोरियात कोरोना व्हायरसचे 1595 प्रकरणं समोर आली आहेत.

पण कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावापासून वाचण्यासाठी जगातील देश काय करत आहेत, याची माहिती तुम्हाला हा लेख वाचून मिळेल.

धर्म आणि विज्ञानादरम्यान इराण द्विधा अवस्थेत

इराणमध्ये कोरोना व्हायरसची लागण झालेल्या लोकांची संख्या 139 बनली आहे.

आतापर्यंत इथं 19 जणांचा मृत्यू झाला आहे.

ईरान, कोरोनावायरस

फोटो स्रोत, EPA

व्हायरसची लागण झालेल्यांमध्ये इराणचे उप-आरोग्य मंत्री इराज हरिची यांच्यासह एका इराणी खासदाराचाही समावेश आहे.

देशभरात कोरोना व्हायरसची प्रकरणं समोर येत असल्याचं इराण सरकारच्या प्रवक्त्यांनी सांगितलं.

कोरोना व्हायरसग्रस्त भागात प्रवास करणं टाळण्याचं आवाहन राष्ट्रपती हसन रूहानी यांनी केलं आहे.

कोणत्याही शहर किंवा जिल्ह्यातील दळणवळणावर निर्बंध घालण्याचा कोणताही विचार नाही. आम्हाला फक्त कोरोना व्हायरसग्रस्त लोकांना वेगळं ठेवायचं आहे. कोणामध्ये ही लक्षणं दिसल्यास त्यांना वेगळं ठेवण्यात येईल, असं ते म्हणाले.

पण व्हायरसच्या प्रादुर्भावानंतरसुद्धा इराण सरकारने धार्मिक ठिकाणी येण्या-जाण्यावर निर्बंध घालण्यास नकार दिला आहे.

आरोग्य तज्ज्ञांनीही इराणच्या या भूमिकेबाबत काळजी व्यक्त केली आहे.

कोरोनावायरस

फोटो स्रोत, EPA

इराणमधून येत असलेल्या कोरोना व्हायरसबाबतच्या माहितीतून खरी स्थिती उघड होत नसल्याचं तज्ज्ञांचं मत आहे.

लंडनच्या किंग्स कॉलेजमधील साथीच्या रोगांच्या तज्ज्ञ डॉ. नताली मेकडॉरमेट सांगतात, "चीनबाहेर कोरोना व्हायरस ज्या ठिकाणी पसरला आहे, त्यामध्ये इराणची परिस्थिती गंभीर आहे. इथून योग्य आकडेवारी मिळत नाही. बहुतांश ज्येष्ठ नागरिकांची आकडेवारी देण्यात आली आहे. पण तरूणांमध्येही लागण झालेली असू शकते."

इराणमधील बीबीसी प्रतिनिधी राणा रहीमपॉर यांनी याबाबत अधिक माहिती दिली.

राणा रहीमपॉर यांचं विश्लेषण

इराणने दिलेल्या अधिकृत आकडेवारीपेक्षा जास्त जणांना कोरोना व्हायरसची लागण झालेली असण्याची शक्यता आहे.

अधिकाऱ्यांनी कोरोना व्हायरसग्रस्त परिसरातील वाहतुकीवर निर्बंध लावण्यास नकार दिला आहे. वाहतुकीवरची बंदी हा त्यावरचा उपाय असू शकत नाही, असं त्यांचं म्हणणं आहे.

उप-आरोग्य मंत्री इराज हरिची

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, कोरोना व्हायरसबाबत सरकारची भूमिका स्पष्ट करताना इराणचे उप-आरोग्य मंत्री इराज हरिची

कोरोना व्हायरसग्रस्त कुम आणि मशाद अद्याप खुले आहेत.

कुममध्ये अनेक ग्रॅंड अयोतोल्लाह आहेत. त्यांच्या मते, हे एक महत्त्वपूर्ण धार्मिक ठिकाण आहे. इथं अनेक परदेशी विद्यार्थी राहतात. हे शहर शिया समुदायाच्या अभिमानाचं प्रतीक आहे.

धर्मगुरुंच्या दृष्टीने या धार्मिक ठिकाणी येण्या-जाण्यावर बंदी घालणं एक मोठं पाऊल असेल.

आंतरराष्ट्रीय दबाव पडल्याशिवाय धर्मगुरू हे पाऊल उचलणार नाहीत.

इथं धार्मिक संरक्षणवाद आणि विज्ञान एकमेकांसमोर आल्याचं दिसून येतं.

अमेरिकेने उचललं पाऊल

कोरोना व्हायरसचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी उपराष्ट्राध्यक्ष माइक पेन्स यांच्याकडे सोपवली आहे.

पण इटली प्रवासावर निर्बंध लावण्यास त्यांनी नकार दिला आहे.

ईरान, कोरोनावायरस

फोटो स्रोत, Getty Images

"आम्ही कोरोना व्हायरसचा सामना करण्यास सज्ज आहोत," असं ट्रंप म्हणाले.

"येत्या काळात दक्षिण कोरिया आणि इटली या देशांत येण्या-जाण्यावर बंदी घालावी लागू शकते, पण ती वेळ अद्याप आलेली नाही," ट्रंप म्हणाले.

अमेरिकेत कोरोना व्हायरसची 53 प्रकरणं समोर आली आहेत. यापैकी 14 रुग्ण अमेरिकन आहेत तर 39 जण दुसऱ्या देशांतून आलेले आहेत.

इटलीसह युरोपात काय स्थिती?

गेल्या 24 तासांत कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 25 टक्क्यांनी वाढली आहे.

इटलीतील मिलानजवळचे लोम्बार्डी आणि व्हेनिसजवळचं व्हेनिटो या परिसरात कोरोना व्हायरसचा सर्वाधिक प्रादुर्भाव झाला आहे.

इथं कोरोना व्हायरसची लागण होऊन आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाला आहे.

इटलीमध्ये सर्व शाळा, विद्यापीठ, सिनेमागृह, सार्वजनिक ठिकाणं आणि क्रीडा स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत.

ईरान

फोटो स्रोत, AFP

सुमारे 55 हजार लोकसंख्येच्या 11 गावांमधली वाहतूकसुद्धा पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.

यादरम्यान इटली आर्थिक मंदीत जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

बीबीसी प्रतिनिधी मार्क लॉवेन सांगतात, "कोरोना व्हायरसच्या भीतीने मिलानचे रस्ते आणि हॉटेल ओस पडले आहेत. युरोपच्या आरोग्य आयुक्त स्टेला क्यरियाकिदेस यांनी इटलीच्या आरोग्यमंत्र्यांची भेट घेतली होती. त्या म्हणाल्या, ही स्थिती गंभीर आहे, पण तुम्ही धीर सोडू नका. या व्हायरसबाबत अनेक गोष्टी लोकांना माहीत नाहीत. हा कसा पसरतो, त्याचा स्त्रोत याबद्दल अज्ञान आहे."

तर गेल्या दोन दिवसांत ऑस्ट्रिया, क्रोएशिया, ग्रीस, नॉर्वे, स्वित्झर्लंड, जॉर्जिया, ब्रिटेन, जर्मनीसह उत्तर मेसेडोनिया मध्ये लोकांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याची माहिती मिळाली आहे.

डोनाल्ड

फोटो स्रोत, Getty Images

तसंच स्पेन आणि फ्रांसमध्येही कोरोना व्हायरसचे प्रकरण समोर आले आहेत.

यापैकी बहुतांश लोक इटली प्रवास करून आलेले आहेत.

ब्रिटनमध्ये आतापर्यंत 13 जणांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे.

कोरोना व्हायरस पाकिस्तानात दाखल

आशिया खंडातील देशांमध्ये पाकिस्तानात कोरोना वायरस दाखल झाला आहे.

व्हायरसग्रस्त दोन्ही रुग्णांची तब्येत स्थिर असल्याचं पाकिस्तानचे आरोग्य मंत्री जफर मिर्झा यांनी सांगितलं.

स्थानिक माध्यमांतील बातम्यांनुसार, यातील एका रुग्णाने नुकताच इराण प्रवास केला होता.

पाकिस्तानचा शेजारी देश अफगाणिस्तानातसुद्धा एक प्रकरण समोर आलं आहे.

तसंच इराकमध्ये सुद्धा अनेक प्रकरण समोर आले आहेत.

इटली

फोटो स्रोत, Getty Images

इराक सरकारने कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सार्वजनिक कार्यक्रम आणि लोकांच्या एकत्र जमा होण्यावर बंदी घातली आहे.

महामारी पसरण्याचा धोका

कोरोना व्हायरसचा वेगाने होणारा प्रादुर्भाव पाहता हा रोग पॅंडेमिक म्हणजेच विध्वंसक रोग बनू शकेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

एखादा रोग जगभरातील अनेक देश आणि भागांमध्ये पसरतो, त्यावेळी जागतिक आरोग्य संघटना त्याला 'पँडेमिक' म्हणून घोषित करते.

जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना व्हायरसला अद्याप 'पँडेमिक' म्हणून जाहीर केलं नाही.

पण चीनबाहेर कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव पाहता ही बाब गंभीर असल्याचं मत संघटनेच्या सरचिटणीसांनी व्यक्त केलं आहे.

जागतिक आरोग्य संघटनेतील वरिष्ठ अधिकारी ब्रूस एयलवार्ड यांनी काही दिवसांपूर्वी जगभरातील देशांना कोरोना व्हायरसबाबत इशारा दिला होता. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सज्ज राहण्याचं आवाहन त्यांनी केलं होतं.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)