रॉस टेलर : मूळचा हॉकीपटू ते 100 वी टेस्ट खेळणारा आक्रमक क्रिकेटर

रॉस टेलर, न्यूझीलंड

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, रॉस टेलर
    • Author, पराग फाटक
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

क्रिकेटपटूंच्या आयुष्यात शंभरीचं महत्त्व अपार आहे. या तीन आकड्यांचा टिळा माथी लागावा यासाठी सर्वस्व पणाला लावायला लागतं. न्यूझीलंडचा अनुभवी बॅट्समन रॉस टेलरच्या आयुष्यात शुक्रवारी अनोखा शंभरी योग जुळून येणार आहे.

दांडपट्टा स्टाईल बॅटिंगसाठी ओळखला जाणारा रॉस टेलर शंभरावी टेस्ट खेळायला उतरणार आहे. न्यूझीलंडसाठी शंभर टेस्ट खेळणारा रॉस केवळ चौथा खेळाडू ठरणार आहे.

'रॉस' लीलेची शंभरी

या दुर्मीळतेतूनच रॉसचं वेगळपण ठसावं. याबरोबरीने टेस्ट, वनडे आणि ट्वेन्टी-२० अशा तिन्ही फॉरमॅटमध्ये १०० मॅचेस खेळणारा रॉस पहिला क्रिकेटपटू ठरणार आहे. वनडे स्पेशालिस्ट अशी प्रतिमा असणाऱ्या रॉसच्या टेस्टमधल्या शंभर नंबरी मुशाफिरीवर शिक्कामोर्तब होणार आहे.

News image

टेस्ट मॅचेसकरता तंत्रकौशल्य लागतं, संयम लागतो असं नेहमी म्हटलं जातं. अशा स्वरुपाचं तंत्र आपल्या पदरी नाही याची पुरेपूर जाण रॉसला आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पदार्पण केल्यानंतर मी पुन्हा टेस्ट खेळेन असं वाटलंच नव्हतं. टायमिंगच्या बाबतीत मी नशीबवान आहे, असं रॉस काही दिवसांपूर्वीच म्हणाला होता.

स्वत:मधलं उणेपण कमी करत कर्तेपण कसं निभवावं याचा प्रत्यय रॉसच्या कारकीर्दीने घडवला आहे. म्हणूनच शंभरावी टेस्टच्या निमित्ताने त्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला जाणार आहे.

समोअन प्रतिनिधी

न्यूझीलंडचा आधारवड झालेला रॉस समोआ संस्कृतीचा प्रतिनिधी आहे. रॉसची वाटचाल समजून घेण्यासाठी न्यूझीलंड-समोआ कनेक्शन समजून घेणं आवश्यक आहे. एकेकाळी न्यूझीलंडच्या अधिपत्याखालील समोआ हा आता स्वतंत्र देश आहे. समोआ हा बेटांचा समूह आहे. त्यांची स्वतंत्र भाषा आणि संस्कृती आहे.

रॉसची आई समोआची आहे तर वडील न्यूझीलंडचे आहेत. न्यूझीलंडमध्ये साधारण लाखभर समोअन स्थलांतरित आहेत.

न्यूझीलंड क्रिकेट संघात समोआचं प्रतिनिधित्व करणारा रॉस केवळ दुसरा खेळाडू आहे. पॅसिफिक समुद्रातल्या या बेटांच्या ठिपक्याला तब्बल 3,500 वर्षांचा इतिहास आहे. सद्यस्थितीत न्यूझीलंड-समोआ संबंध मैत्रीपूर्ण आहेत. मात्र 1914-1962 या कालावधीत समोआवर न्यूझीलंडचं राज्य होतं.

रॉस टेलर, न्यूझीलंड

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, रॉस टेलर

मास्टरटोन नावाच्या रमणीय शहरी रॉसचं बालपण गेलं. पाल्मस्टॉन नॉर्थ बॉईज हायस्कूल या क्रिकेटपटू घडवण्यासाठी प्रसिद्ध शाळेत रॉसच्या क्रिकेट कौशल्यांना पैलू पाडण्याचं काम झालं.

मात्र लहानपणी रॉस उत्तम हॉकीपटू होता. प्रशिक्षकांनी रॉसमधला क्रिकेटपटू हेरला. वयोगट स्पर्धांमध्ये चांगलं खेळत रॉसने सेंट्रल डिस्ट्रिक्ट्स संघात स्थान मिळवलं.

क्रिकेटच्या माहेरघरी प्रशिक्षण आणि सराव

लॉर्ड्स स्टेडियम ही क्रिकेटची पंढरी. लॉर्ड्सच्या प्रांगणात एमसीसी यंग क्रिकेटर्स क्लबच्या उपक्रमासाठी रॉसची निवड झाली.

दरवर्षी न्यूझीलंडच्या एका उदयोन्मुख क्रिकेटपटूला प्रगत प्रशिक्षणासाठी इथं पाठवलं जातं. मार्टिन क्रो, केन रुदरफोर्ड यांना ही संधी मिळाली होती.

त्या परंपेरत रॉसचा समावेश झाला. या युवा खेळाडूंना YC असं म्हटलं जातं. मेरलीबोन क्रिकेट क्लबचे तत्कालीन अध्यक्ष क्लाईव्ह रिडले यांनी हिथ्रो विमानतळावर रॉसला पाहिलं. त्याला नेट्समध्ये कौशल्य दाखवण्याची संधी देण्यात आली.

रॉस टेलर, न्यूझीलंड

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, लॉर्ड्स मैदानात रॉस टेलर सराव करताना

या मुलामध्ये बॉलला भिरकावून देण्याची अफलातून हातोटी आहे हे रिडले यांच्या लक्षात आलं. बचावात्मक खेळ हा या मुलाचा प्रांत नाही हेही त्यांनी जाणवलं.

हॅम्पस्टेड इथल्या हॉस्टेलमध्ये रॉसची राहण्याची व्यवस्था करण्यात आली. 46 क्रमांकाची बस पकडून रॉस लॉर्ड्स मैदानात खेळण्यासाठी जात असे.

लॉर्ड्सवर खेळण्याच्या अनुभवासाठी क्रिकेटपटू आसुसलेले असतात. रॉसला ती संधी कारकीर्दीच्या सुरुवातीलाच मिळाली आणि तीही गुणवत्तेच्या बळावर.

दांडपट्टा स्टाईल बॅटिंग

मूळचा हॉकीपटू असल्याचा प्रभाव रॉसच्या बॅटिंगमध्ये पाहायला मिळतो. दांडपट्टा खेळावं तशी रॉसची बॅटिंग शैली अनोखी आहे.

फस्टंपच्या थोडं बाहेर जात, बॉल मिडविकेटच्या पट्टयात पिटाळणं ही रॉसची खासियत. भारीभक्कम शरीर, मागचा पाय क्रीझमध्ये घट्ट रोवलेला आणि प्रचंड ताकदीच्या बळावर रॉस बॉलला 'काऊ कॉर्नर'च्या दिशेने भिरकावून देतो.

पूल आणि हूक हे दोन्ही फटके क्रिकेटविश्वात अवघड मानले जातात. पण कठीण गोष्टी रॉस सोप्या करतो. फास्ट बॉलरने शॉर्टपिच अर्थात उसळते चेंडू फेकणं बॅट्समनसाठी भंबेरी उडवणारं असतं मात्र रॉसच्या शिवशिवणाऱ्या हातांना असा बॉल म्हणजे सुवर्णसंधी वाटतं.

बॉलरला आणि बॉलला कस्पटासमान करत रॉस चिंधड्या उडवत जातो. पण खेळपट्टीवर नांगर टाकून, बॉलर्सचा आणि पिचचा आदर करत संयमाने खेळणं रॉससाठी नेहमीच अवघड होतं.

रॉस टेलर, न्यूझीलंड

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, रॉस स्टाईल बॅटिंग

घरच्या मैदानावर शेर असणाऱ्या रॉसची डरकाळी विदेशी खेळपट्यांवर क्षीण होते. बॉल हातभर वळणाऱ्या खेळपट्यांवर रॉसची त्रेधातिरपीट उडते.

परंतु आक्रमण हाच सर्वोत्तम बचाव या मंत्रासह रॉस खेळतो. तंत्राच्या बाबतीत पिछाडीवर असला तर रॉसची बॉलवरची हुकूमत कायम असते.

वेगाने रन्स आणि बॉलर्सचं खच्चीकरण अशी रॉसची प्रतिमा आहे. वेळीच रोखलं नाही तर रॉस बघताबघता मॅचचा घास हिरावून घेतो याचा अनुभव प्रतिस्पर्धी संघ वारंवार घेतात. म्हणूनच रॉसला झटपट माघारी धाडण्यासाठी नवनवीन क्लृप्त्या अवलंबल्या जातात.

रॉस टेलर, न्यूझीलंड

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, रॉसची बॅटिंग

रॉसच्या आकडेवारीकडे नजर टाकली तर धावांमध्ये, सरासरीत सातत्याने चढउतार पाहायला मिळतात.

एखाद्या हंगामात कर्दनकाळ होऊन बॉलर्सच्या डोक्यावर बसलेला रॉस पुढच्याच हंगामात केविलवाणाही ठरतो.

अडचणी येणार, संघर्ष करावा लागणार, धडपडत राहायचं, चुका टाळत सर्वोत्तम होण्यासाठी झटायचं ही शिकवण रॉस देतो.

रॉस टेस्ट मॅचेस खेळू शकतो असं अनेकांना वाटलं नव्हतं. अंगीभूत कौशल्यं अव्वल दर्जाचं नसलं तरी कष्टाने अढळस्थानापर्यंत पोहोचता येतं.

समोरच्याला आपल्या उणीवा दिसू नयेत यासाठी बलस्थानं पक्की करावी लागतात. रॉसची कारकीर्द हे त्याचं जितंजागतं उदाहरण आहे.

अफलातून फिल्डर

रॉस जगातल्या कोणत्याही संघात केवळ फिल्डर म्हणून खेळू शकतो. चांगली फिल्डिंग हे न्यूझीलंडच्या संघाचं व्यवच्छेदक लक्षण आहे. रॉस त्याला अपवाद नाही.

बॅट्समनच्या बॅटची कड घेऊन बॉल रॉसच्या सूपासारख्या हातात जाऊन विसावल्याचं चित्र सातत्याने पाहायला मिळतं.

रॉस टेलर, न्यूझीलंड

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, रॉसची फिल्डिंग न्यूझीलंडसाठी अतिशय फायद्याची ठरते

बाऊंड्रीवरून थेट कीपरच्या ग्लोव्हजमध्ये येणारा खणखणीत थ्रो, एकेक रन वाचवण्यासाठी बॉलवर घातली जाणारी झडप, बॉल हवेत उडाला की कॅच पकडायलाच हवा हे धोरण यामुळे रॉसला प्रतिस्पर्धी वचकून असतात.

कर्णधारपदाचा काटेरी मुकूट

बॅटिंगमध्ये स्वत:ला सिद्ध केल्यानंतर रॉसकडे न्यूझीलंडची धुरा सोपवण्यात आली. सच्च्या खेळभावनेनं खेळण्याची परंपरा रॉसच्या संघानेही जपली.

क्रिकेटचा गुणी विद्यार्थी असणाऱ्या रॉसने कर्णधार म्हणून छाप उमटवली. मात्र संघाची कामगिरी ढासळल्याने तसंच प्रशिक्षक माईक हेसन यांच्याशी झालेल्या मतभेदांमुळे रॉसची कर्णधारपदावरून हकालपट्टी करण्यात आली. कर्णधारपदाचा काटेरी मुकूट बाजूला झाल्यानंतर रॉसने ब्रेक घेतला.

रॉस टेलर, न्यूझीलंड

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, रॉस टेलर

न्यूझीलंडचे माजी खेळाडू आणि गुरु मार्टिन क्रो यांचा सल्ला घेतल्यानंतर रॉस परतला. भूतकाळात जे घडलं ते सोडून देत रॉस नवीन कर्णधार ब्रेंडन मॅक्क्युलमचा विश्वासू साथीदार झाला. मॅक्क्युलमनंतर केन विल्यसनच्या हाती धुरा सोपवण्यात आली. केनसाठीही रॉस विश्वासू भिडू आहे.

डोळ्याचं ऑपरेशन

साधारण चार वर्षांपूर्वी रॉसच्या डोळ्यांवर शस्त्रक्रिया करण्यात आली. शास्त्रीय भाषेत कठीण अशा आजारामुळे रॉसला बॉल टिपणं अवघड होऊ लागलं.

डे-नाईट मॅचेसमध्ये, पिंक बॉल टेस्टमध्ये फारच अडचण होऊ लागली. तंत्रापेक्षा हँड-आय कोऑर्डिनेशनवर भर असल्याने रॉससाठी खेळणं दिवसेंदिवस अवघड होऊ लागलं.

नेत्रतज्ज्ञांनी दिलेल्या ड्रॉप्समुळे तात्पुरता आराम पडला परंतु अखेर ऑपरेशन हाच उपाय सांगण्यात आला. प्रखर उन असलेल्या प्रदेशात तळपत्या किरणांमुळे डोळ्यांना असा त्रास होतो.

ऑपरेशन झालं आणि रॉसला खेळण्यासाठी नवी दृष्टी मिळाली. ऑपरेशन नंतरची रॉसची आकडेवारी डोळ्यांसकट मनाला तजेला देणारी आहे.

हिंदी स्लॅँग

रॉस टेलर आयपीएलच्या निमित्ताने दरवर्षी भारतात येत असतो. दिल्ली डेअरडेव्हिल्स, राजस्थान रॉयल्स, पुणे वॉरियर्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू या संघांकडून तो खेळला आहे. रॉसने काही हिंदी शब्द शिकून घेतले आहेत.

रॉस टेलर, न्यूझीलंड

फोटो स्रोत, Instagram

फोटो कॅप्शन, रॉस टेलरने इन्स्टाग्रामवर टाकलेला फोटो

मूळच्या भारतीय परंतु न्यूझीलंडकडून खेळणाऱ्या सहकाऱ्यांच्या मदतीने रॉसने वीरेंद्र सेहवागला दिलेलं धमाल प्रत्युत्तर चांगलंच व्हायरल झालं होतं.

भारताविरुद्धच्या एका टेस्टदरम्यान विराट कोहलीला अंपायर्सनी नॉटआऊट ठरवलं. त्यानंतर रॉसने हिंदीतून शिवी देत नाराजी व्यक्त केली होती.

वाईन कॉनोसिअर

खेळापल्याड रॉस वाईन कॉनोसिअर म्हणजे वारुणी जाणकार आहे. सततच्या दौऱ्यांमुळे रॉस देशापरदेशात फिरत असतो.

रॉस जिकडे जातो तिथे त्याच्याबरोबर वाईनची शास्त्रोक्त माहिती असणारा जाडजूड ग्रंथ बरोबर असतो. क्रिकेटला अलविदा केल्यानंतर रॉस या क्षेत्रात फटकेबाजी करताना दिसल्यास आश्चर्य वाटून घेऊ नका.

शतकी जीभ!

शतक झळकावल्यानंतर बॅट्समन बॅट उंचावून प्रेक्षकांना तसंच संघसहकाऱ्यांना अभिवादन करतात. काहीजण आपल्या आप्तस्वकीयांना उद्देशून प्रेम व्यक्त करतात. काहीजण हवेत उंच उडी मारून आनंद साजरा करतात. रॉस टेलर मात्र शतकी खेळी झाल्या झाल्या अख्खी जीभ बाहेर काढतो. त्याचवेळी बॅट उंचावून प्रेक्षक आणि ड्रेसिंगरुमला उद्देशून अभिवादन करतो.

रॉस टेलर, न्यूझीलंड

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, जीभ काढून शतकाचं सेलिब्रेशन

रॉसने कारकीर्दीत पहिल्यांदा असं सेलिब्रेशन 2007 मध्ये इडन पार्क, ऑकलंडध्ये झालेल्या मॅचमध्ये केलं होतं. रॉसने त्या मॅचमध्ये शतक झळकावलं.

2006 मध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी न्यूझीलंडच्या संघातून वगळल्याबद्दल रॉसने निवडसमितीप्रती नाराजी म्हणून जीभ दर्शवत शतक साजरं केलं.

निवडसमितीप्रती नाराजीतून सुरू झालेलं हे अनोखं सेलिब्रेशन रॉसची मुलगी मॅकेन्झीला अगदीच भावलं. शतकानंतर बाबा असं करून दाखवतात याची मॅकेन्झीला सवय झाली.

सातत्यपूर्ण कामगिरीच्या बळावर रॉसने संघातील स्थान पक्कं केलं. काही वर्षांत तो न्यूझीलंडचा कर्णधारदेखील झाला. त्यामुळे निवडसमितीप्रती नाराजी होण्याचं कारण उरलं नाही मात्र आपल्या मुलीला आणि काही वर्षांनंतर मुलाला हे सेलिब्रेशन आवडत असल्याने रॉसने शतकानंतर असं करायचं थांबवलं नाही. 

सेमी फायनल आणि संथ खेळीचा आरोप 

गेल्या वर्षीची वर्ल्ड कप सेमी फायनल तुम्हाला आठवतेय? भारतीय संघ वर्ल्ड कप जिंकण्याचा प्रबळ दावेदार होता. दमदार प्रदर्शनासह टीम इंडियाने सेमी फायनल गाठली. सेमी फायनलमध्ये टीम इंडियासमोर न्यूझीलंडचं आव्हान होतं. पावसामुळे दोन दिवस चाललेल्या या मॅचमध्ये न्यूझीलंडने टीम इंडियाचं वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न धुळीस मिळवलं. 

रॉस टेलर, न्यूझीलंड

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, संथ खेळी असा वर्ल्ड कप सेमी फायनलवेळी रॉसवर आरोप झाला होता.

न्यूझीलंडने 239 रन्स केल्या होत्या. बॉलर्सला चोपटवून चारशेपल्याड रन्स करण्याच्या काळात 239 म्हणजे मामुली वाटत होत्या. पण न्यूझीलंडच्या तेजतर्रार बॉलर्सनी टीम इंडियाच्या बलाढ्य बॅटिंगला सुरुंग लावला.

रवींद्र जडेजा आणि महेंद्रसिंग धोनी असेपर्यंत आपण मॅच जिंकू असं चित्र होतं. परंतु न्यूझीलंडने टिच्चून बॉलिंग आणि फिल्डिंग करत अंतिम फेरी गाठली. 

मॅचच्या पूर्वार्धात रॉस टेलरवर जबरदस्त टीका झाली. आक्रमक बॅटिंगसाठी प्रसिद्ध रॉस या मॅचमध्ये स्लॉथगतीने खेळत होता. रॉसच्या संथ खेळीमुळे न्यूझीलंडने मॅच घालवली अशीही चर्चा सुरू झाली.

परंतु टीम इंडियाची त्रेधातिरपीट होत असताना रॉसची 74 धावांची खेळी डोंगराप्रमाणे वाटू लागली. रॉसचा अनुभव न्यूझीलंडच्या कामी आला.

निवृत्तीचं काय?

पस्तिशी आली की कोणत्याही खेळाडूला विचारला जाणारा हमखास प्रश्न. रॉसच्या बॅटला शरीराची भक्कम साथ आहे. बॉलर्सना हाणून पाडण्याची खुमखुमी आजही कायम आहे.

रॉस टेलर, न्यूझीलंड

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, रॉस टेलर

गेल्या वर्षी विश्वविजेतेपदाचं रॉसचं स्वप्न थोडक्यात हुकलं होतं. त्यामुळे 2023चा वर्ल्ड कप खेळण्याची शक्यता फेटाळता येत नाही असं रॉस गंमतीत म्हणाला आहे.

सगळ्या फॉरमॅट्समध्ये शंभरहून अधिक मॅच खेळल्याने रॉस खऱ्या अर्थाने 'ऑल वेदर स्पेशालिस्ट' झाला आहे. जगभरातल्या क्रिकेटरसिकांना 'रॉस'लीला अनुभवणं नेहमीच आनंददायी असेल.

 हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)

बीबीसी