Aliens: 'परग्रहांवरील जीवांचा शोध घ्यायला सरकारने निधी द्यावा' – अमेरिकेच्या ज्येष्ठ शास्त्रज्ञाची मागणी

Alien says Hi

फोटो स्रोत, BWFolsom

    • Author, पल्लब घोष
    • Role, विज्ञान प्रतिनिधी, बीबीसी न्यूज

पृथ्वीबाहेर ब्रह्मांडात इतर कुठे बुद्धी असलेले जीव आहेत का, याचा गांभीर्याने शोध घेण्याचा सल्ला अमेरिकेच्या एका ज्येष्ठ शास्त्रज्ञाने दिला आहे.

गेली अनेक दशकं सरकार या मोहिमेला गांभीर्याने घेत नसून त्यासाठी पुरेसा निधी देत नाहीये. त्यामुळे सरकारी निधीवर चालणाऱ्या या संशोधन संस्थांना अधिक सहकार्य मिळण्याची गरज आहे, असं वर्जिनियातील युएस नॅशनल रेडिओ अॅस्ट्रोनॉमी ऑबझर्व्हेटरीचे संचालक डॉ. अॅन्थोनी बिझले बीबीसीशी बोलताना म्हणाले.

अशाप्रकारच्या विज्ञानाला आताआतापर्यंत गौण किंवा अनुषांगिक विज्ञान (fringe science) मानलं जायचं. मात्र, Search for Extra-Terrestrial Intelligence किंवा Seti संदर्भात डॉ. बिझले यांनी समर्थन दिल्यामुळे आता हा विषय मुख्यप्रवाहात आला आहे. वैज्ञानिकांच्या दृष्टिकोनात हा एक फार मोठा बदल आहे.

सिअॅटलमध्ये झालेल्या अमेरिकन असोसिएशन फॉर द अॅडव्हान्समेंट ऑफ सायंसेसमध्ये डॉ. बिझले यांनी हे मत व्यक्त केलं आहे. "थंडबस्त्यात गेलेल्या सेतीला बाहेर काढून वेधशाळेतील इतर प्रयोगांबरोबरच राबवण्याची गरज" असल्याचं ते म्हणाले.

'सेती'च्या प्रयोगात न्यू मॅक्सिकोमधील Very Large Array (VLA) ही वेधशाळा सहकार्य करणार असल्याची घोषणा नुकतीच या मोहिमेला आर्थिक हातभार लावणाऱ्या एका खाजगी संस्थेने केली आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. बिझले यांच्या वक्तव्याला अधिक महत्त्व प्राप्त झालंय.

VLA ही अनेक अँटिना असलेली एक वेधशाळा असून त्यांच्याकडे जगातली सर्वोत्तम दुर्बिण असल्याचं म्हटलं जातं.

News image

VLAला मिळतं तसं सहकार्य मिळाल्यास 'सेती'च्या यशाची शक्यता दहा ते शंभर पट वाढेल, असं डॉ. अॅन्ड्रू सिमियॉन या खगोलशास्त्रज्ञाला वाटतं. इतकंच नाही तर VLAचं सहकार्य मिळालं तर अशा प्रकारच्या शोधाची विश्वासार्हतादेखील वाढेल, असं त्यांचं म्हणणं आहे.

बीबीसीशी बोलताना डॉ. अॅन्ड्रू सिमियॉन म्हणाले, "कॅलिफोर्नियामधील वैज्ञानिक आणि इंजीनिअर्सचा छोटा गट सेतीचा शोध घेत आहे. मात्र आता आम्ही 'सेती'देखील खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकीचा अविभाज्य भाग बनल्याचं पाहू इच्छितो."

कुणी आहे का परग्रहावर? अमेरिकेचं सरकार हे उत्तर मिळवण्यासाठी पैसा द्यायला तयार नाही.

फोटो स्रोत, Allen Observatory

फोटो कॅप्शन, कुणी आहे का परग्रहावर? अमेरिकेचं सरकार हे उत्तर मिळवण्यासाठी पैसा द्यायला तयार नाही.

डॉ. अॅन्ड्रू सिमियॉन कॅलिफोर्निया विद्यापीठातील Breakthrough Listen या टीमचं नेतृत्त्व करतात. ही टीम बर्कलीमधल्या 'सेती' रिसर्च सेंटरमध्ये परग्रहावरील बुद्धीमान जीवसृष्टीच्या शोधासाठीचे प्रयत्न करत आहे.

Breakthrough Listen हा खासगी फंडावर सुरू असलेला कार्यक्रम आहे. 10 वर्षं कालावधीचा हा कार्यक्रम 2016 साली सुरू करण्यात आला. युरी मिलनर या अब्जाधीशाने या प्रयोगासाठी तब्बल 10 कोटी डॉलर्स दिले आहेत.

युकेचे अंतराळ वैज्ञानिक प्रा. लॉर्ड रिड्स यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की अब्जावधी रुपये खर्च करून तयार करण्यात आलेल्या लार्ज हायड्रॉन कोलाईडरला अजूनही सब-अॅटोमिक पार्टिकल (मूलकण) सापडलेला नाही. त्यामुळे सरकारने Seti प्रयोगासाठी सध्या काही मर्यादित रक्कमच द्यावी.

ते म्हणाले, "मूलकण शोधण्याच्या प्रयोगापेक्षा सेती प्रयोगाविषयी चर्चा करण्यात मला अधिक आत्मविश्वास वाटतो. सेतीच्या शोधात यश येण्यात बऱ्याच अडचणी असल्या तरीसुद्धा, यावर बराच पैसा लागला असल्याने हा प्रयोग पुढे नेणं अधिक श्रेयस्कर आहे."

'सेती'च्या शोधासाठी नासाने दरवर्षी एक कोटी डॉलर इतका निधी दिला होता. मात्र अमेरिकेच्या संसदेत एक विधेयक मंजूर झालं, ज्यात 'हा पैशाचा अपव्यय' असल्याचं म्हटल्याने 1993 पासून हा निधी थांबवण्यात आला.

परग्रहावर जीवसृष्टी म्हणजे अगदी एकपेशीय जीव शोधण्यासाठीचे जे प्रयोग सुरू आहेत, त्यासाठी बराच निधी दिला जातो. मात्र 'सेती' म्हणजेच बुद्धीमत्ता असलेली जीवसृष्टी शोधण्यासाठीच्या प्रयोगासाठी अमेरिका किंवा जगात कुठूनही फारसा निधी दिला जात नाही.

अंतराळात इतर ताऱ्यांभोवती फिरणाऱ्या काही ग्रहांचा शोध लावण्यात आला होता. मात्र, त्याची आपल्याला खात्री वाटत नव्हतं. आता मात्र हा योग्य मार्ग असल्याचं आपल्याला कळलं आहे. आजवर अशा चार हजार ग्रहांचा आपण शोध लावलेला आहे.

अशाप्रकारे ग्रह शोधण्यात येत असलेल्या यशामुळेच ब्रह्मांडात इतरही कुठे बुद्धिमत्ता असलेली सजीवसृष्टी आहे का, याचा गांभीर्याने शोध घेण्याची गरज खगोलवैज्ञानिकांना भासू लागल्याचं डॉ. सिमियॉन यांचं म्हणणं आहे.

ते म्हणतात, "जेव्हापासून माणूस रात्रीच्या आकाशाकडे बघत आला आहे त्याच्या मनात हा प्रश्न पडतो की तिथे कुणी आहे का? या प्रश्नाचं उत्तर देण्याची आज आपली क्षमता आहे आणि कदाचित असा शोध घेण्याचीही आपली क्षमता आहे जो मानवी इतिहासातल्या सर्वात महत्त्वाच्या शोधांपैकी एक मानला जाईल."

बीबीसी

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)