डोनाल्ड ट्रंप यांची महाभियोगातून झालेली मुक्तता अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत त्याच्या पथ्यावर पडेल?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांची महाभियोगातून मुक्तता करण्यात आली आहे. सिनेटच्या निर्णयानंतर दोन आठवड्यांची ही सुनावणी संपुष्टात आली.

जो बायडेन यांची बदनामी करण्यासाठी ट्रंप यांनी युक्रेनवर दबाव आणला असा आरोप त्यांच्यावर होता. डेमोक्रॅटिक खासदारांनी हा आरोप केला होता.

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठीच्या निवडणुका नऊ महिन्यांवर आलेल्या असताना, या निर्णयाचा मोठा परिणाम पाहायला मिळेल.

आपल्या विरोधकांवर टीका करत डोनाल्ड ट्रंप यांनी स्वतःचा विजय साजरा केला.

"मी मान्य करतो की मी आयुष्यात काही चुका केलेल्या आहेत....पण निर्णय अखेर हे म्हणतो," हातातलं वर्तमानपत्रं उंचावत ट्रंप म्हणाले - "ट्रंप यांची मुक्तता."

"आम्हाला उगीचच त्रास सहन करावा लागला. आम्ही काहीही चूक केलेलं नाही. हे क्रूर होतं, भ्रष्टं होतं." व्हाईट हाऊसमध्ये बोलताना ट्रंप म्हणाले.

महाभियोगातून मुक्तता झाल्यानंतर ट्रंप यांची प्रतिक्रिया ही बिल क्लिंटन यांच्या प्रतिक्रियेच्या अगदी विरुद्ध होती. महाभियोगातून मुक्त झाल्यानंतर 1999मध्ये बिल क्लिंटन यांनी अमेरिकेच्या लोकांची माफी मागितली होती.

अध्यक्षपदाच्या निवडणुकीवर परिणाम?

ट्रंप यांची महाभियोगातून मुक्तता करण्यात आल्याचा फायदा रिपब्लिकन पक्षाला आणि खुद्द ट्रंप यांनाही होईल.

पुढच्या अध्यक्षपदासाठीच्या प्रचारादरम्यान ट्रंप अर्थातच या मुद्द्याचा वापर करून घेतील.

अमेरिकेतल्या जनमत चाचणीनुसार महाभियोगाची ही प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी जी राजकीय स्थिती होती, तशीच स्थिती अजूनही कायम आहे.

अमेरिकेमध्ये राज्याराज्यांमध्ये थेट पक्षीय कल आहेत. काही राज्य ही कायमच डेमॉक्रॅटिक पक्षाच्या ताब्यात होती तर काही राज्यांत कायमच रिपब्लिकन पक्षाचं वर्चस्व राहिलेलं आहे.

ट्रंप यांच्या राष्ट्राध्यक्ष असण्याला (Approval Ratings) साधारण 40 ते 45% जनतेचा पाठिंबा होता. ट्रंप यांच्या संपूर्ण कार्यकाळात जनमताचं हे प्रमाण कायम राहिलेलं आहे. त्यामुळेच त्यांची पुन्हा अध्यक्षपदी निवडून येण्याची शक्यता असली, तरी त्यांच्यासाठी हे सोपं नसेल.

ट्रंप यांच्यावर चालवण्यात आलेल्या महाभियोगाच्या सुनावणीदरम्यान साक्षीदारांची चौकशी करण्यात आली नाही.

खरंतर या सुनावणीदरम्यान साक्षीदारांचं मत लक्षात घेतलं जावं अशी सामान्य अमेरिकन माणसाची इच्छा होती. पण तसं झालं नाही.

शिवाय साक्षीदार नेमका कोण, याविषयी डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिकन खासदारांच्या कल्पनाही वेगवेगळ्या होत्या.

जो बायडेन यांची चौकशी करण्यासाठी दबाव आणल्याचा आरोप ट्रंप यांच्यावर होता.

पण बायडेन यांनी युक्रेनमध्ये चुकीचं वर्तन केलं वा नाही, हे या प्रक्रियेतून स्पष्ट झालेलं नाही.

आणि त्याचा फायदा घ्यायला रिपब्लिकन पक्षाने सुरुवात केली आहे.

त्यामुळे बायडेन यांची चौकशी करण्याचा ट्रंप यांचा प्रयत्न फसला असला तरी ही गोष्ट मात्र त्यांच्या पथ्यावर पडणार आहे.

अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्यासाठीचे उमेदवार म्हणून ट्रंप यांचीच निवड होण्याची शक्यता या निर्णयामुळे वाढली आहे.

ट्रंप यांच्यावरील महाभियोगाविषयी मतदान करताना रिपब्लिकन पक्षाच्या एक वगळता सगळ्या खासदारांनी ट्रंप यांच्या बाजूने मतदान केलं.

फक्त रिपब्लिकन पक्षाचे युथा (Utah)चे सिनेटर मिट रॉम्नी यांनी त्यांच्या रिपब्लिकन पक्षाच्या धोरणाच्या विरुद्ध जात ट्रंप यांच्या विरोधात मतदान केलं.

राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांनी महाभियोगातून मुक्त झाल्याच्या निकालानंतर ज्याप्रकारे भाषण केलं, त्यावरून नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या व्हाईट हाऊससाठीच्या निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पक्षाची उमेदवारी त्यांनाच मिळण्याची चिन्हं आहेत.

याविषयी बोलताना बीबीसीचे वॉशिंग्टनचे प्रतिनिधी गॅरी ओ'डोनोग्यू म्हणतात, "2016च्या निवडणुकीच्या वेळी ट्रंप 'आऊटसायडर' होते आणि आणि अध्यक्ष झाल्यास सगळी दलदल काढून टाकत सगळी ताकद पुन्हा एकदा लोकांच्या हाती देण्याचा दावा करत त्यांनी प्रचार केला होता. आता या महाभियोगातून मुक्त झाल्यामुळे ते पुन्हा एकदा राजकीय आघाडी मिळवण्याची शक्यता आहे. अध्यक्षांनी निकालानंतर केलेलं भाषण म्हणजे त्यावेळच्या भावनांना वाट मोकळी करून देणं असलं तरी ट्रंप यावरच थांबणार नाहीत. निवडणुकीच्या दृष्टीने हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे आणि अगदी निवडणुकीच्या दिवसापर्यंत ट्रंप हा मुद्दा आपल्या प्रतिस्पर्ध्यांच्या विरुद्ध वापरत राहतील."

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)