रॉस टेलर : सेंच्युरी झाल्यावर जीभ बाहेर काढणारा शतकवीर

फोटो स्रोत, Getty Images
न्यूझीलंडचा माजी कर्णधार आणि अनुभवी रॉस टेलरच्या शतकी खेळीच्या बळावर न्यूझीलंडने भारताविरुद्धची पहिली वनडे जिंकली.
शतक झळकावल्यानंतर रॉसने नेहमीच्या शैलीत म्हणजे जीभ बाहेर काढून शतक साजरं केलं. वयाच्या पस्तिशीतही रॉस असं सेलिब्रेशन का करतो? तुम्हाला माहिती आहे का?
बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर
शतक झळकावल्यानंतर बॅट्समन बॅट उंचावून प्रेक्षकांना तसंच संघसहकाऱ्यांना अभिवादन करतात. काहीजण आपल्या आप्तस्वकीयांना उद्देशून प्रेम व्यक्त करतात.
काहीजण हवेत उंच उडी मारून आनंद साजरा करतात. रॉस टेलर मात्र शतकी खेळी झाल्या झाल्या अख्खी जीभ बाहेर काढतो. त्याचवेळी बॅट उंचावून प्रेक्षक आणि ड्रेसिंगरुमला उद्देशून अभिवादन करतो.
रॉसने कारकीर्दीत पहिल्यांदा असं सेलिब्रेशन 2007 मध्ये इडन पार्क, ऑकलंडध्ये झालेल्या मॅचमध्ये केलं होतं. रॉसने त्या मॅचमध्ये शतक झळकावलं. 2006 मध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी न्यूझीलंडच्या संघातून वगळल्याबद्दल रॉसने निवडसमितीप्रती नाराजी म्हणून जीभ दर्शवत शतक साजरं केलं.

फोटो स्रोत, Getty Images
निवडसमितीप्रती नाराजीतून सुरू झालेलं हे अनोखं सेलिब्रेशन रॉसची मुलगी मॅकेन्झीला अगदीच भावलं. शतकानंतर बाबा असं करून दाखवतात याची मॅकेन्झीला सवय झाली. सातत्यपूर्ण कामगिरीच्या बळावर रॉसने संघातील स्थान पक्कं केलं. काही वर्षांत तो न्यूझीलंडचा कर्णधारदेखील झाला. त्यामुळे निवडसमितीप्रती नाराजी होण्याचं कारण उरलं नाही मात्र आपल्या मुलीला आणि काही वर्षांनंतर मुलाला हे सेलिब्रेशन आवडत असल्याने रॉसने शतकानंतर असं करायचं थांबवलं नाही.
रॉस सोशल मीडिया हँडल्सवर अनोख्या सेलिब्रेशनचे फोटो शेअर करतो. त्यामुळे चाहत्यांनाही त्याच्या शतकानंतर हे पाहण्याची सवय लागली आहे.
न्यूझीलंडमध्ये माओरी नावाचा स्थानिक समाज आहे. त्यांच्या प्रथा परंपरेनुसार एकमेकांशी भेटताना हाका पद्धतीने अभिवादन केलं जातं. जीभ लांब बाहेर काढून आणि डोळे मोठे करून एकमेकांना अभिवादन केलं जातं.
आजही वयाच्या पस्तिशीत भारताविरुद्ध शतकी खेळी साकारल्यानंतर रॉसने जीभ बाहेर काढली आणि वेगवान शतक साजरं केलं. रॉसने या लढतीत 84 चेंडूत 10 चौकार आणि 4 षटकारांसह 109 धावांची तडाखेबंद खेळी केली. रॉसला मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने गौरवण्यात आलं.

फोटो स्रोत, Getty Images
रॉसला टॉम लॅथमची साथ मिळाली. टॉमने 8 चौकार आणि 2 षटकारांसह 78 धावांची खेळी साकारली. हेन्री निकोल्सने 11 चौकारांसह 78 धावांची खेळी करत संघाच्या विजयाचा पाया रचला. या तिघांच्या दमदार खेळींच्या जोरावर न्यूझीलंडने 6 विकेट्स आणि 11 चेंडू राखून विजय मिळवला.
तत्पूर्वी टीम इंडियाने 347 धावांचा डोंगर उभारला होता. श्रेयस अय्यरने कारकीर्दीतील पहिलीवहिली शतकी खेळी साकारली. त्याने 11 चौकार आणि एका षटकारासह 103 धावांची खेळी केली. लोकेश राहुलने 88 तर विराट कोहलीने 51 धावा करत त्याला चांगली साथ दिली.
या विजयासह न्यूझीलंडने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. भारताने पाच सामन्यांच्या ट्वेन्टी-20 मालिकेत निर्विवाद वर्चस्व गाजवलं होतं.
रॉस टेलरने 99 टेस्ट, 228 वनडे आणि 100 ट्वेन्टी-20 सामन्यात न्यूझीलंडचं प्रतिनिधित्व केलं आहे. न्यूझीलंडतर्फे सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत रॉस अग्रस्थानी आहे. रॉसने न्यूझीलंडच्या कर्णधारपदाची धुराही सांभाळली आहे. आक्रमक फलंदाजीबरोबरच अफलातून फिल्डिंग ही रॉसची ओळख आहे.
आयपीएलच्या निमित्ताने रॉस दरवर्षी भारतात असतो. रॉस आतापर्यंत दिल्ली डेअरडेव्हिल्स, पुणे वॉरियर्स, राजस्थान रॉयल्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू या संघांकडून खेळला आहे. याव्यतिरिक्त जगभरातल्या विविध ट्वेन्टी-20 लीग स्पर्धांमध्ये रॉस नियमितपणे खेळतो.

हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)









