सौदी अरामको IPO: जगात सर्वांत जास्त नफा कमावणाऱ्या कंपनीचे शेअर्स विक्रीसाठी उपलब्ध

फोटो स्रोत, Getty Images
सौदी अरामको कंपनीने रियाधच्या स्टॉक एक्सेंजमध्ये नोंदणी होत असल्याच्या बातमीला दुजोरा दिला आहे, यामुळे ही कंपनी जगातील सर्वांत मोठी इनिशिअल पब्लिक ऑफरिंग (IPO - प्रारंभिक सार्वजनिक अर्पण) करणारी कंपनी ठरणार आहे.
गुंतवणूकदारांनी रस दाखवल्याचं पाहून सरकारच्या मालकीच्या हा सर्वांत मोठा तेल समूह लवकरच IPO दर जाहीर करणार आहे.
कंपनी 1 ते 2 टक्के बाजारपेठेतील भाग जाहीर करेल असे व्यावसायिक सूत्रांकडून समजते. तसंच ही ऑफर कंपनी शेअर्ससाठी लागू होईल.
सौदी अरामको कंपनीचं बाजारपेठेत मूल्य सध्या 1.2 ट्रिलियन डॉलर्स म्हणजेच अंदाजे साडे आठ लाख कोटी रुपये इतकं आहे.
अरामको कंपनी या कंपनीचं नाव भारतात आणि त्यातही महाराष्ट्रात चर्चेला येण्याचं कारण म्हणजे नाणार प्रकल्प. गेल्या वर्षी रत्नागिरीमध्ये येऊ घातलेल्या तेल शुद्धीकरण प्रकल्पावरून मोठं आंदोलन पेटलं होतं. या प्रस्तावित तेल रिफायनरीच्या प्रकल्पात सौदी अरामकोची गुंतवणूक आहे.
या प्रकल्पाला बऱ्याच प्रतिकार झाला होता, त्यानंतर तो दुसरीकडे स्थलांतरित केला जाणार, अशी चर्चा होती. सध्या शिवसेना आणि भाजपमध्ये या मित्रपक्षांमध्ये फक्त सत्तेवरूनच नाही तर काही विषयांवरील भूमिकांवरूनही वाद आहेत, त्यापैकीच एक म्हणजे नाणार. यामुळेच आपल्यासाठीही या कंपनीमध्ये होणाऱ्या घडामोडींना महत्त्व आहे.
'ऐतिहासिक'
दीर्घकाळ चर्चिल्या गेलेल्या परकीय एक्सेंजवरील दोन स्तरीय आयपीओ योजना तूर्तास बाजूला ठेवण्यात आल्या असून, सध्या तरी त्या राबवणार नसल्याचे कंपनीतर्फे सांगण्यात आले आहे.
"नोंदणीकृत (आंतरराष्ट्रीय स्तरावर) करण्याविषयी आम्ही लवकरच माहिती देऊ. सध्यातरी आमची कंपनी टाडवुल (सौदी अरेबियामधील स्टॉक एक्सेंज) साठीच नोंदणी करणार आहे," असे अरामकोचे अध्यक्ष यासीम अल रमय्यान यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.

फोटो स्रोत, Getty Images
आयजी ग्रूपमधल्या व्यापाऱ्यांसाठीचे मार्केटचे प्रमुख विश्लेषक ख्रिस बीचंप म्हणाले की, "तेलाच्या किंमती वाढण्यासाठी अर्थात फार संघर्ष करावा लागणार आहे. अरामको कंपनीत गुंतवणूक जोखमीची असणार हे नक्की.
"याशिवाय प्रदेशात ऑपरेट करणाऱ्या कोणत्याही फर्मसाठी राजकीय आणि धोरणात्मक जोखीम मोठी असणार आहे. सौदीची महत्त्वाची कंपनी असलेल्या कंपनीलाही हा धोका असणार आहेच. याशिवाय अरामको कंपंनीला आउटपुट या सौदी अरेबियाच्या मुख्य व्यवस्थापन पॉलिसीमध्ये मर्यादित नियंत्रण आहे,'' असं बीचंप म्हणाले.
सौदी अरेबियातल्या अरामकोच्या अधिपत्याखालील अबाकिक ऑइल फॅसिलिटी आणि कुरैस ऑइल फिल्डवर सप्टेंबर महिन्यात झालेल्या ड्रोन हल्ल्यानंतर हा धोका अधोरेखित झाला आहे.
अरामको कंपनीचे प्रमुख अमिन नासिर यांनी मात्र ही नोंदणी ऐतिहासिक असणार आहे असं म्हटलं आहे, जागतिक स्तरावरील अद्याप सर्वांत विश्वासार्ह कंपनी म्हणून अरामको कंपनी असल्याचं वक्तव्य त्यांनी पत्रकार परिषदेत केलं.
या प्रसंगी अरामको कंपनीतर्फे "या हल्ल्यांचा व्यवसायावर, आर्थिक किंवा प्रक्रियांच्या निकालांवर वास्तविक परिणाम होणार नाही,'' असं सांगण्यात आलं आहे.
सौदी अरामको आहे तरी काय?
1933 साली सौदी अरेबिया आणि स्टँडर्ड ऑईल कंपनी ऑफ कॅलिफोर्निया यांच्यातील व्यवहार पणाला लागलेला असताना सौदी अरामको कंपनीनं आपले हातपाय पसरले. यानंतर ही कंपनी शेवरन बनली, सर्वेक्षण करणारी आणि ऑइल खणणारी नवी फर्म तयार करण्यात आली.

फोटो स्रोत, Getty Images
1973 आणि 1980 या कालावधीत सौदी अरेबिया सरकारनं संपूर्ण कंपनी विकत घेतली.
व्हेनेझुएलानंतर सौदी अरेबिया दुसऱ्या क्रमांकावरील सर्वांत मोठा तेलसाठा असणारा देश आहे, अशी माहिती ऊर्जा माहिती प्राधिकरणातर्फे देण्यात आली आहे. याशिवाय अमेरिकेनंतर दुसऱ्या क्रमांकावरील उत्पादन कंपनी आहे. परंतु सर्व तेल काढणाऱ्या देशांमध्ये वर्चस्व असल्यानं या देशाला प्राधान्य दिलं जातं, अर्थात या देशात सर्वांत स्वस्त तेल मिळतं.
"ही कंपनी सुरुवातीला स्टॉक एक्सेंजमध्ये नोंदणीकृत नव्हती; परंतु तरीही ही जागतिक स्तरावर सर्वात जास्त तेल उत्पादन करणारी कंपनी आहे. अरामको कंपनी सर्व तेल कंपन्या आणि गॅस कंपन्यांची मुख्य कंपनी आहे.'' असं स्कनिदर इलेक्ट्रिकच्या मार्केट स्टडीजचे संचालक डेव्हिड हंटर म्हणाले.
कंपनी इतक्या अवाढव्य किंमतीची का?
ब्लूमबर्गच्या फायनान्शिअल न्यूज सर्व्हिसच्या विश्लेषणानुसार सौदी अरामको 1.2 ट्रिलियन डॉलर्स किंमतीची आहे. तर रियाध या कंपनीची किंमत 2 ट्रिलियन डॉलर्स असल्याचं म्हणतं आहे. या फरकामुळेच कंपनीच्या शेअर्स विक्रीला वेळ लागला.
आयजी ग्रूपचे बीचंप म्हणाले की, "अरामको कंपनी टेक आयपीओमध्ये येण्यासाठी अद्याप कोसो दूर आहे. कंपनीनं मोठं रूप धारण केलेलं असलं तरीही सिलिकॉन व्हॅलीमधल्या कंपन्यांइतकाच या कंपनीचा मूल्यांकनाचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही.''
ते पुढे म्हणाले की, "जगभरात तेलाचा सर्वांत जास्त पुरवठा आणि अनिश्चित मागणी यामुळे 2 ट्रिलियन डॉलर्स इतकी किंमत ओलांडली असण्याची शक्यता आहे, परंतु सौदीसाठी 1.2 ट्रिलियन डॉलर्स ही इतक्या महत्त्वाच्या कंपनीसाठीची रक्कम अतिशय कमी आहे.''
विश्लेषण : केटी प्रेस्कॉटस, बीबीसी बिझनेस प्रतिनिधी.
अरामको कंपनीभोवती कधीकाळी गूढ वातावरण असलं, तरी गेल्या काही वर्षांमध्ये कंपनीनं चांगलेच परिवर्तन घडवून आणले आहे.
कंपनीतर्फे वित्तीय निकाल जाहीर करण्यात येतात, कंपनीबद्दल प्रश्नोत्तरांचे सत्र घेण्यात येते. याशिवाय अलीकडेच ड्रोन हल्ल्यांच्या ठिकाणी पत्रकारांनाही नेण्यात आले आहे.
इतकेच नाही, तर कंपनीने उच्च स्तरीय जॉबसाठी महिला कर्मचारी नियुक्त केले आहेत. शिवाय कंपनी आजच्या घडीला आंतरराष्ट्रीय प्रश्नांवरही बोलत आहे. याचाच अर्थ "कंपनी कच्च्या तेलाच्या दरचक्रावरून दीर्घकालीन मूल्यनिर्मिती'' करत आहे. याबरोबरच "तंत्रज्ञानाचा फायदा आणि हवामान बदलाचा परिणाम कमी करण्यासाठीची नावीन्यपूर्णता'' याद्वारे शाश्वतता वाढवण्यात येत आहे.
स्थानिक लोक अगदी 'घटस्फोटित महिलाही' कंपनीचे शेअर्स विकत घेऊ शकतात आणि त्यांना 10 वर्षांच्या होल्डनंतर बोनस भाग प्राप्त होतील.

फोटो स्रोत, Getty Images
हा व्यवहार अतिशय नफा देणाराच आहे. 2019 सालच्या पहिल्या टप्प्यात कंपनीने 46.9 अब्ज डॉलर्सचा निव्वळ नफा कमावला आहे, यापैकी बहुतांश लाभांश सौदी सरकारला देण्यात आलेला आहे.
कुठलीही नफेखोर कंपनी उच्च दर आकारते. त्या तुलनेत याच कालावधीत अॅपल या जगातील सर्वांत मोठ्या कंपनीने 21.6 अब्ज डॉलर्सचा नफा नोंदवला आहे आणि एक्सॉन मोबिल या नोंदणीकृत सर्वांत मोठ्या तेलकंपनीने 5.5 अब्ज डॉलर्सचा नफा मिळवला आहे.
याशिवाय उत्पादनासाठीचा खर्च हासुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा असतो. उत्तर समुद्रातील तेलाच्या विहिरी पाण्यापासून तब्बल 100 फुटांवर आहेत. इथून तेल काढण्याचा खर्च जास्त असतो. त्यामानाने सौदी अरेबियातील तेल विहिरी जमिनीपासून खूप जवळ आहेत.
सौदीमध्ये अनेक स्वस्त तेलक्षेत्रे आहेत. येथून साधारणपणे एक तेलाचे बॅरल 10 डॉलरला मिळते. तर ब्रेंट कच्चे तेल 60 डॉलर्स दराने मिळते. यातील फरक म्हणजे नफाच पकडला जातो, असं हंटर यांनी सांगितलं.
सौदीला शेअर्स का विकायचे आहेत?
तेलावरील अवलंबन कमी करण्यासाठी सौदी अरेबिया सरकारी तेल कंपन्यांना शेअर्स विकायला उत्सुक आहे.
सौदी अरेबियाचे राजकुमार मोहम्मद बिन सलमान यांना 2030 च्या व्हिजनअंतर्गत पुढील दशकात आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेत वैविध्य आणायचे आहे.

फोटो स्रोत, Reuters
यात जास्तीत जास्त सौर ऊर्जेचा वापर, देशातील सर्वांत मोठ्या विस्तृत वाळवंटाचा उपयोग करणार असल्याचंही, हंटर यांनी म्हटलं आहे.
विश्लेषण : एलन आर वाल्ड, सौदी इंकच्या लेखिका आणि ट्रान्सव्हर्सल कन्सल्टिंगच्या अध्यक्ष.
कंपनीचे पहिले सौदी सीईओ अली अल नैमी यांना अरामको कंपनी जागतिक स्तरावरील एकीकृत ऊर्जा असलेली कंपनी बनवायची आहे. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी अरामकोचा डाउनस्ट्रीम (रिफाइनिंग) आणि अमेरिका, दक्षिण कोरिया, चीन, इंडोनेशिया, जपान आणि युरोप येथील अन्य मालमत्तांचा विस्तार केला आहे.
त्यांनी आणि त्यांच्या अधिकाऱ्यांनी अरामकोचा सौदी अरेबियामध्ये बराच विस्तार केला आहे, कंपनीच्या संयुक्त कंपन्यांनी रिफाइनिंग आणि पेट्रोकेमिकल्समध्येही खूप विस्तार केला आहे. आजच्या घडीला सौदी अरेबिया सर्वांत मोठा तेल निर्यातदार आहे. याशिवाय सातत्याने एका दिवसात वीस लाख बॅरेल्स तेल काढणारा आणि तो साठवण्याची क्षमता असणारा, तसेच हा साठा तातडीनं बाजारात पोचवणारा हा एकमेव देश आहे.
ही एक राष्ट्रीय तेल कंपनी असून तिच्याकडे जगभरातील सर्वोत्तम आणि कमीत कमी खर्चिक तेल उत्पादनांचे स्रोत उपलब्ध आहेत. यामुळेच तिचे मूल्य अधिक आहे.
असं असलं तरी काही त्रुटीही जरूर आहेत. अन्य देशातल्या महत्त्वाच्या तेल कंपन्यांच्या अपस्ट्रीम मालमत्तांप्रमाणे सौदी अरेबियाकडे अपस्ट्रीम मालमत्ता नाहीत. म्हणजेच सौदी सरकारची या कंपनीत महत्त्वाची भूमिका राहणार आहे. सौदी अरेबियानं अरामकोला अशा प्रकारे स्वतंत्र प्रक्रिया राबवण्याची परवानगी देणं ही ऐतिहासिक घटना आहे. पंरतु प्रशासनाने कंपनीच्या धोरणांसाठी स्वतंत्र निर्णय घेण्याची अनुमती दिलेली नाही. पूर्वीपेक्षा जास्त प्रमाणात सरकार आता अधिक सक्रिय आणि परिणामकारक भूमिका बजावत आहे.

फोटो स्रोत, Getty Images
यामुळेच अरामको प्रत्यक्षात मार्केटमध्ये किती कामगिरी करेल ते पाहावे लागेल. बँकांनी त्यांचे मूल्यांकन केलेले आहे, परंतु मार्केटमध्ये अस्सल मूल्यांकन दिसून येईल. विविध स्रोतांनी 1.2 ट्रिलियन ते 2 ट्रिलियन डॉलर्स इतके मूल्यांकन केले आहे.
सध्यातरी 1.7 ट्रिलियन डॉलर्सपेक्षा 1.5 ट्रिलियन डॉलर्स हा आकडा वर दिसतो आहे. यावरून लोकांना हे दर जास्त असल्याचे दिसून येते आहे. पुढील तीस वर्षांमध्ये अरामको किती कामगिरी करेल ते कुणीही सांगू शकणार नाही. यापुढेही कुठले ऊर्जेचे तंत्र आकाराला येईल किंवा येणार नाही आणि अरामकोचा धोरणात्मक दृष्टिकोन तयार होईल की नाही ते कळेल.
सप्टेंबर महिन्यात पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय पर्यटकांसाठी दरवाजे खुले करण्यात आले आहेत. यासाठी 49 देशांमध्ये व्हिसा प्रक्रिया राबवण्यात आली आहे, तसंच महिला पर्यटकांसाठी कठोर वेशभूषेचे निर्बंधही शिथिल करण्यात आले आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
पर्यटन मंत्री अहमद अल खातिब यांनी हा देशासाठी `ऐतिहासिक क्षण' असल्याचं म्हटलं आहे. त्यांना 2030 सालापर्यंत पर्यटनात 3 टक्क्यांहून 10 टक्के इतकी वाढ करायची आहे.
ही विक्री वादग्रस्त का आहे?
गेल्या वर्षी पत्रकार जमाल खाशोग्जी यांचे खून प्रकरण उघडकीस आल्यानंतर सौदी अरामकोसाठी सध्या काही गोष्टी राजकीयदृष्ट्या गुंतागुंतीच्या आहेत.
सौदी अरेबियाच्या मानवाधिकारांबद्दल अनेक वाद असून, या देशाबरोबर काम करायचं असेल तर ही गोष्ट नेहमी आड येते.
राजकुमाराच्या योजनेत आणखी एक अडचण आहे, ती म्हणजे जगभरातून जीवाश्मविरोधी इंधनविरोधी लाट उसळली आहे. याशिवाय गेल्या वर्षीच्या तुलनेत तेलाच्या किंमतीतही कमालीची घट झाली आहे, गेल्या वर्षी 80 डॉलर इतके दर होते.
"मोठ्या प्रमाणावर जीवाश्म इंधन असल्याकारणाने स्टॉक एक्सेंजमधील कंपनी नोंदणीकरण विवादित असणार आहे.'' असंही हंटर म्हणाले.
"जीवाश्म इंधन मालमत्ता काढून टाकण्यासाठी अनेक नवीन आणि चालू निधींचे विभाजन होत आहे.''
मे महिन्यात नॉर्वेच्या 1 ट्रिलियन डॉलर्सच्या सार्वभौम संपत्ती फंड या सहकारी तेल उत्पादकातर्पे असे सांगण्यात आले आहे, की त्यांचे काही तेल व वायू होल्डिंगतर्फे विक्री होण्याची अपेक्षा आहे, परंतु वस्तूंच्या किंमतीवर अवलंबून राहावे लागणार आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








