शहराच्या मधोमध 2000 मेंढ्या रास्ता रोको करतात तेव्हा...

फोटो स्रोत, AFP
रविवारी स्पेनची राजधानी माद्रीदच्या रस्त्यांवर एक अभूतपूर्व ट्रॅफिक जॅम झाला होता. शहरातल्या मध्यवर्ती रस्त्यांवरून दाटीवाटीने प्रवास करत होत्या तब्बल 2000 मेंढ्या.
दरवर्षी माद्रीद शहरात होणाऱ्या एका खास कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी या मेंढ्या चालल्या होत्या.
पूर्वीच्या काळी थंडी आल्यावर मेंढपाळ आपली गुरं - पाळीव प्राणी उत्तरेकडून दक्षिणेकडे घेऊन जात. स्पेनची राजधानी असणारं माद्रीद शहर याच प्राचीन स्थलांतर मार्गात येतं. आणि याच निमित्ताने शहरात दरवर्षी एक समारंभ होतो.
याला - फिएस्ता दे ला ट्राशुमेन्सिया (Fiesta de la Trashumancia) म्हणजेच ट्राशुमेन्स फेस्टिव्हल म्हटलं जातं. स्थानिक पर्यटन विभाग या फेस्टिव्हलचं आयोजन करतो.
या भूभागाच्या इतिहासाला उजाळा देण्यासाठी 1994पासून दरवर्षी या महोत्सवाचं आयोजन करण्यात येतं.

फोटो स्रोत, EPA
मध्ययुगामध्ये मेंढपाळांना आपले कळप घेऊन या शहरातून जाण्याची परवानगी होती. याच नियमाचा आधार घेत ही प्रथा आजही पाळली जाते.
1418मध्ये मेंढपाळ आणि शहराच्या काऊन्सिल दरम्यान एक करार झाला होता. यामध्ये दर हजार मेंढ्यांमागे 50 नाणी कर देण्याचं निश्चित करण्यात आलं होतं.
दरवर्षी एका समारंभामध्ये या मेंढपाळांचे प्रमुख सिटी हॉलमध्ये शहराच्या महापौरांना काही नाममात्र फी देतात. याच्या बदल्यात मेंढपाळांना शहरातून कळप सुरक्षितपणे नेण्याची परवानगी मिळते.
मेंढ्यांच्या या कळपासोबतचे काही मेंढपाळ खास पारंपरिक वेशभूषेत असतात.
या फेस्टिव्हलमुळे रविवारी पर्यटकांना माद्रीदच्या रस्त्यांवर एक वेगळंच दृश्यं पहायला मिळालं. कारण रस्त्यांवर गाड्यांचा ट्रॅफिक नव्हता तर हजारो मेढ्यांनीच रास्ता रोको केला होता.

फोटो स्रोत, AFP
"आम्हाला याबद्दल माहिती नव्हतं पण सुदैवाने आम्हाला हे पाहता आलं," एका पर्यटकाने रॉयटर्स वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं.
"आम्ही कालच इथे आलो आहोत आणि आज हा महोत्सव असल्याचं कळलं. वर्षातून एकदाच होणारी ही घटना आम्हाला पहायला मिळतेय."

फोटो स्रोत, AFP
माद्रीदच्या रस्त्यांवर त्या दिवशी ट्रॅफिकच्या गजबटापेक्षा या मेंढ्यांच्या गळ्यातल्या घंटांचा किणकिणाट ऐकू येत होता.
शहारतल्या सर्वात मोठ्या बागेपासून - कासा डे कॅम्पोपासून सकाळी साडेदहा वाजता या कार्यक्रमाला सुरुवात झाली.

फोटो स्रोत, EPA
तिथून या मेंढ्या 'कर भरण्याच्या' समारंभासाठी सिटी हॉलपर्यंत आणण्यात आल्या आणि त्यानंतर दुपारी 2 वाजेपर्यंत सगळे कळप शहरातून पुन्हा बाहेर पडले.
या समारंभात सुमारे 2000 मरीनो प्रजातीच्या मेंढ्या आणि 100 बकऱ्या सहभागी झाल्याचं रॉयटर्सने म्हटलंय.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








