पाकिस्तान संयुक्त राष्ट्रात: 'इम्रान खान यांनी जगाला दाखवला भारताचा खरा चेहरा'

युनोमध्ये भाषण बोलताना इम्रान खान

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, युनोमध्ये भाषण बोलताना इम्रान खान

काश्मीर मुद्द्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी भारत प्रयत्न करत आहे, असा आरोप पाकिस्ताननं संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत केला आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत भाषण केल्यानंतर भारतानं 'राईट टू रिप्लाय' अंतर्गत उत्तर दिलं होतं. त्यामध्ये इम्रान खान यांचा प्रत्येक मुद्दा खोटा असल्याचं भारतानं स्पष्ट केलं होतं.

भारताच्या उत्तरावर पाकिस्तानतर्फे काल उत्तर देण्यात आलं.

पाकिस्तानचे प्रतिनिधी झुल्करनैन चीना यांनी उत्तर दिलं. भारताचा खरा क्रूर चेहरा पंतप्रधान इम्रान खान यांनी जगाच्या समोर आणला, असं ते या उत्तरात म्हणाले. (काश्मीरच्या) वस्तुस्थितीकडे लक्ष जाऊ नये, यासाठी भारत प्रयत्न करत असल्याचं त्यांनी सांगितलं.

काश्मीरचा उल्लेख का नाही?

"भारतीय प्रतिनिधीने जाणूनबुजून काश्मीरच्या सद्यस्थितीचा उल्लेख केला नाही. तसेच त्यांनी निष्पाप काश्मिरींच्या वेदनांचा उल्लेखही केला नाही. गेल्या 53 दिवसांत अन्न आणि आवश्यक वस्तूंचा तुटवडा सहन करून ते जगत आहेत, याचा उल्लेख भारतीय प्रतिनिधीने केला नाही," असा आरोप पाकिस्तानने या उत्तरात केला आहे.

पाकिस्तान प्रतिनिधी

फोटो स्रोत, TWITTER/@PTIOFFICIAL

ते म्हणाले, "भारत सरकार काश्मिरी लोकांना त्यांच्या भावना मुक्तपणे व्यक्त करण्यासाठी का संधी देत नाही? भारत एवढा भयभीत का झाला आहे? पाकिस्तानकडे लपवण्यासारखं काहीच नाही. जम्मू-काश्मीरवर संयुक्त राष्ट्र मानवाधिकार उच्चायुक्तांच्या अहवालातील निष्कर्षांवर उत्तर देण्याचं नैतिक साहस भारताकडे आहे का?"

भारत सरकार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अजेंडा पुढे रेटण्यासाठी प्रयत्न करत आहे, असाही आरोप पाकिस्तानच्या प्रतिनिधीनीने केला.

"भाजपच्या विचारसरणीचं मूळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघात आहे. त्याच्या संस्थापकांपैकी एक मा. स. गोळवलकर होते. भारतात हिंदू नसणाऱ्यांनी एकतर हिंदू संस्कृती आणि भाषा स्वीकारावी किंवा कोणत्याही विशेषाधिकारांविना त्यांना हिंदू राष्ट्रात सामील व्हावं लागेल, असं गोळवलकर म्हणाले होते. अशा गोळवलकरांना नरेंद्र मोदी गुरूस्थानी मानतात," असं चीना म्हणाले.

भारतावर आरोप

"1948 मध्ये महात्मा गांधींची हत्या ज्यांनी केली, ते त्यांच्या धर्मनिरपेक्ष भारताच्या विचारांची हत्या करत आहेत. भारत स्वतःच्या चुकीच्या धोरणांकडे पाहत नाही आणि कोणाला पाहायलाही देत नाही," असा आरोप पाकिस्तानने भारतावर ठेवला आहे.

पाकिस्तानच्या प्रतिनिधीने हिंदुत्ववादी विचारधारा, गोरक्षणाच्या नावाखाली होणाऱ्या हत्या आणि 2002 साली झालेल्या गुजरात दंगलींचाही उल्लेख केला.

भारतानं काय उत्तर दिलं होतं?

भारताने संयुक्त राष्ट्रांत 'उत्तर देण्याचा अधिकारा'अंतर्गत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या भाषणाला उत्तर दिलं होतं.

विदिशा मैत्रा

फोटो स्रोत, UN

फोटो कॅप्शन, इम्रान खान यांच्या भाषणा

भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रथम सचिव विदिशा मैत्रा म्हणाल्या, "इम्रान खान यांचं भाषण प्रक्षोभक होतं आणि त्यांनी म्हटलेली प्रत्येक गोष्ट खोटी होती. इम्रान खान यांचा दावा आहे की पाकिस्तानात सध्या कुठलीच कट्टरतावादी संघटना अस्तित्वात नाही आणि हा दावा पडताळून पाहण्यासाठी त्यांनी संयुक्त राष्ट्रांच्या निरीक्षकांना आमंत्रित केलं आहे. त्यामुळे जगाने त्यांना त्यांचं आश्वासन पूर्ण करायला सांगावं, असं आम्हाला वाटतं."

पुढे मैत्र यांनी पाकिस्तानला काही प्रश्न विचारले, "ज्यांची उत्तरं पाकिस्तानने त्यांची आश्वासनं पूर्ण करण्याआधी द्यावीत". ते प्रश्न पुढीलप्रमाणे -

  • संयुक्त राष्ट्रांच्या यादीत समाविष्ट 130 अतिरेकी आणि 25 अतिरेकी संघटना त्यांच्या देशात आहेत की नाही, याचं पाकिस्तानला उत्तर देता येईल का?
  • पाकिस्तान हे मान्य करेल का की संपूर्ण जगात पाकिस्तान एकमेव असं राष्ट्र आहे जे संयुक्त राष्ट्रांनी निर्बंध घातलेल्या अल-कायदा या संघटनेशी संबंध ठेवणाऱ्या व्यक्तींना पेन्शन देते?
  • पाकिस्तान हे समजून सांगू शकेल का की त्यांना न्यूयॉर्कमधली त्यांची प्रतिष्ठित हबीब बँक का बंद करावी लागली? यामागे ही बँक अतिरेकी कारवायांसाठी लाखो रुपयांचा व्यवहार करायची, हे कारण आहे का?
  • पाकिस्तान हे नाकारू शकतो का की 'फायनान्शिएल अॅक्शन टास्क फोर्स'ने 27 पैकी 20 हून जास्त मानकांच्या उल्लंघनासाठी त्यांना नोटीस दिली आहे?
  • आणि शेवटचा प्रश्न हा की पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान या न्यूयॉर्क शहरासमोर हे नाकारू शकतात का की ते ओसामा बिन लादेनचं खुलेआम समर्थन करायचे?

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)