काश्मीर कलम 370 मुद्द्यावरून पाकिस्तानी आणि भारतीय जेव्हा लंडनमध्ये समोरासमोर आले....

फोटो स्रोत, Dan Kitwood/getty images
भारत सरकारने कलम 370 हटवल्यानंतर या निर्णयाचे पडसाद लंडनमध्ये देखील उमटले. त्यामुळे लंडनमधील भारतीय उच्चायुक्तासमोर 15 ऑगस्ट रोजी तणावाची स्थिती निर्माण झाली होती.
गुरूवारी देशासह परदेशातही भारतीय स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. इंग्लंडमध्ये राहणाऱ्या भारतीय नागरिकांनी स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी भारतीय उच्चायुक्त कार्यालयासमोर कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. त्याचवेळी भारताच्या स्वातंत्र्यदिनी कलम 370 हटवण्याच्या भारत सरकारच्या निर्णयाचा निषेध करण्यासाठी पाकिस्तानी, काश्मिरी तसंच खलिस्तानवाद्यांनी निषेध आंदोलन करण्याचा निर्णय घेतला.
हळुहळू भारतीय उच्चायुक्त कार्यालयासमोर भारतीय समर्थक आणि आंदोलकांची गर्दी वाढायला सुरू झाली. भारत आणि पाकिस्तानचे समर्थक यावेळी समोरासमोर आले. भारतीय स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी आलेल्या समर्थकांच्या तुलनेत निषेध आंदोलन करण्यासाठी आलेल्या लोकांची संख्या जास्त होती.
भारत आणि पाकिस्तानचे समर्थक समोरासमोर आल्यामुळे भारतीय उच्चायुक्त कार्यालयाबाहेरची परिस्थिती अतिशय तणावपूर्ण बनली होती. लंडन पोलिसांची कुमक तुलनेने कमी होती. काही वेळात आंदोलकांनी भारताच्या समर्थकांना घेरल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. पण उच्चायुक्त कार्यालय आणि नंतर दाखल झालेल्या पोलिसांनी दाखवलेल्या चपळाईमुळे मोठा अनर्थ टळला.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
समर्थकांना काहीवेळ इंडिया हाऊसमध्ये घेऊन जाण्यात आलं. परिस्थिती निवळल्यानंतर भारतीय समर्थकांना हळुहळू घरी पाठवण्यात आलं.
15 ऑगस्टला नेमकं काय झालं?
लंडनमध्ये राहणारे 61 वर्षीय भरत सचानिया भारतीय स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी लंडनच्या भारतीय उच्चायुक्त कार्यालयाच्या इमारतीसमोर आयोजित कार्यक्रमात गेले होते. यावेळी निषेध करणाऱ्यांची संख्या समर्थकांच्या तुलनेत जास्त होती, असं त्यांनी सांगितलं. भारतीय उच्चायुक्त हे सगळं आतून पाहत होत्या.
समोरची दृश्यं पाहून त्या चिंताग्रस्त झाल्या. त्यांनी पोलिसांची अतिरिक्त कुमक मागवली. आंदोलकांनी समर्थकांना दोन्ही बाजूंनी घेरलं होतं. त्यांनी टॉमॅटो, अंडे आणि पाण्याच्या बाटल्या समर्थकांच्या दिशेने भिरकावण्यास सुरूवात केली. उच्चायुक्तांनी पोलिसांच्या मदतीने समर्थकांना सुरक्षितपणे बाहेर काढलं आणि इंडिया हाऊसच्या आतमध्ये नेलं. तिथं त्यांच्यासाठी जेवण तसंच पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली होती.
'डोळ्यांत अंडी गेले'
भरत सचानिया इंडिया हाऊसमध्ये सुमारे अर्धा तास होते. दरम्यान, एका व्यक्तीने डोळ्यांत अंडी आणि टोमॅटो गेल्याची तक्रार केली. काही वेळानंतर भारतीय समर्थकांनी इंडिया हाऊसमधून परतण्यास सुरूवात केली. भरत निघून जात असतानाही अनेक आंदोलक रस्त्त्यात तसेच मेट्रो स्टेशनवर होते. दोन जणांना पोलिसांनी अटक केल्याची माहिती त्यांच्या कानावर आली मात्र याबाबत अधिकृतपणे काहीच स्पष्ट होऊ शकलं नाही. त्यांनी कोणलाही जखमी झाल्याचं पाहिलं नाही. मदतीसाठी भरत यांनी भारतीय उच्चायुक्त कार्यालयाचे आभार मानले.

40 वर्षीय सुशील रापतवार आणि त्यांची 8 वर्षांची मुलगीसुद्धा घटनास्थळी होते. सुशील यांनी त्यांच्या पत्नीला घडलेला घटनाक्रम सांगितला. भारतीय उच्चायुक्त कार्यालयासमोर सुरूवातीला पोलीस खूपच कमी संख्येने होते. आंदोलकांची संख्याही कमी होती. पण हळुहळू आंदोलकांची संख्या वाढत गेली. पाहता पाहता हजारोंच्या संख्येने आंदोलक जमा झाले. भारतीय उच्चायुक्त कार्यालयाच्या चारही बाजूंना आंदोलक जमले होते. त्यांनी महिला, मुले आणि ज्येष्ठ नागरिकांवरही टोमॅटो, अंडे आणि पाण्याच्या बाटल्या फेकून मारल्या, असं सुधा यांनी सांगितलं.
उच्चायुक्ताचे कर्मचारी आतमध्येच अडकले
पोलीस यंत्रणा आंदोलकांवर नियंत्रण ठेवण्यात कमी पडत होती. आंदोलनाचा आवाका लक्षात घेता जास्त संख्येने पोलीस तैनात करण्याची गरज होती. पण त्या संख्येने पोलीस उपस्थित नव्हते. पोलिसांनी भारतीय उच्चायुक्त कार्यालयासमोर जमलेल्या लोकांच्या सुरक्षेबाबत हलगर्जीपणा का केला, असा प्रश्न सुधा यांनी विचारलं. त्या पुढे म्हणाल्या, यापेक्षाही गंभीर काहीतरी घडलं असतं तर कोण जबाबदार होतं, हे आंदोलन हलक्याने घेण्यात आलं का हा प्रश्न पडतो. एखाद्याने जमलेल्या लोकांवर अॅसिड फेकलं असतं किंवा चाकूने हल्ला केला असता तर भयानक परिस्थिती निर्माण झाली असती.
घटनास्थली गर्दी खूपच जास्त होती. उच्चायुक्त कार्यालयाचे कर्मचारीही बाहेर पडू शकत नव्हते. नंतर त्यांनी दंगल नियंत्रक पोलिसांना पाचारण केलं आणि भारताच्या समर्थकांना तिथून सुरक्षित ठिकाणी हलवलं. इंडिया हाऊसमध्ये समर्थकांसाठी खाण्यापिण्याची व्यवस्था करण्यात आली होती, अशी माहिती सुधा यांनी दिली.

ओवैस राजपूत हे निषेध निदर्शनात सहभागी होण्यासाठी ब्रॅडफोर्डमधून आले होते. ते स्वतः काश्मिरी आहेत. भारतीय उच्चायुक्त कार्यालयाच्या बाहेर करण्यात येत असलेल्या निषेध आंदोलनात हजारोंच्या संख्येने लोक सहभागी झाले होते. जमलेले लोक मोठ्याने घोषणा देत होते. त्यांच्याकडे बॅनर होते. काश्मिरी, पाकिस्तानी आणि खलिस्तानवादी लोक आंदोलनात सहभागी झाले होते, असं राजपूत यांनी सांगितलं.
ते सांगतात, त्यावेळी भारतीय समर्थक जास्त संख्येने उपस्थित नव्हते. जमलेल्या लोकांपैकी 90 टक्के काश्मिरी ब्रिटीश नागरिक होते. ब्रॅडफोर्डहून आलेल्या मेट्रोमध्ये दहा डबे आंदोलकांनीच भरलेले होते.
'आंदोलकांनी हिंसा केली नाही'
आंदोलन शांततापूर्ण होतं, अंडी किंवा पाण्याच्या बाटल्या कुणीच फेकल्या नसल्याचं राजपूत सांगतात. कोणीतरी त्यांना लोक अंडी फेकत असल्याचं सांगितलं, पण त्यांना असं काहीच आढळलं नाही. जमलेले लोक मोदीविरोधी घोषणा देत होते. मोदींच्या फोटोला बुटांनी मारत होते. त्यांच्याकडे मोदीविरोधी बॅनरसुद्धा होते. परिसरात मोठ्या संख्येने पोलीस उपस्थित होते. सुमारे 20 हजाराहून जास्त लोक आंदोलनात सहभागी असल्याचं ते सांगतात.
त्या ठिकाणचं वातावरण तणावपूर्ण होतं. ज्येष्ठ नागरिक तसंच अपंग व्यक्तीसुद्धा आंदोलनात सहभागी झाले होते. माझ्या मते, हे एक शांततापूर्ण आंदोलन होतं. लोक फक्त घोषणाबाजी करत होते. लोकांकडे संयुक्त राष्ट्रसंघाचे शांतता संदेश देणारे बॅनर होते. स्कॉटलंड यार्ड पोलिसांचं कामही कौतुकास्पद होतं, पण रोड बंद केल्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी वाढली आणि काही प्रमाणात अडचणी निर्माण झाल्या होत्या. लंडन प्रशासनाने गर्दीचा अंदाज ठेवून व्यवस्थापन करणं आवश्यक होतं. त्यांनी कमी गर्दीची अपेक्षा ठेवली होती पण प्रमाणापेक्षा जास्त लोक आंदोलनासाठी आले होते, असं राजपूत यांनी सांगितलं.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








