हाँगकाँग आंदोलनाची चीन सरकारला भीती वाटत आहे का?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, स्टुअर्ट लाऊ
- Role, बीबीसी मॉनिटरिंग
हाँगकाँगमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात सुरू असलेलं सरकार विरोधी आंदोलन तिसऱ्या महिन्यातही सुरूच आहे. ब्रिटिशांची जुनी वसाहत असलेल्या हाँगकाँगमधल्या विविध वर्गांमध्ये आता पसरलेलं हे आंदोलन बिजिंगच्या सत्ताधाऱ्यांना धोकादायक वाटत आहे.
फायनान्स क्षेत्रातले कर्मचारी, एअरपोर्ट स्टाफ आणि सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे प्रशासकीय कर्मचारीही आता आंदोलनांमध्ये सहभागी होत आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये या लोकांनी पुकारलेल्या संपामुळे आशियातील सर्वांत मोठ्या उद्योग केंद्रांपैकी एक असणाऱ्या हाँगकाँगच्या कामकाजावर परिणाम झालेला आहे.
एरवी राजकीयदृष्ट्या निष्क्रिय असणारे हे गट सक्रिय झाल्याने आंदोलकांना बळ मिळालं असून आंदोलकांच्या मागण्यांना उत्तर देण्यासाठीचा हाँगकाँग सरकारवरचा दबाव वाढत चाललाय.
बहुचर्चित प्रत्यार्पण विधेयक हे तात्पुरतं स्थगित करण्यात आलं असलं तरी अजूनही रद्द करण्यात आलेलं नाही आणि हाँगकाँगच्या चीफ एक्झिक्युटिव्ह कॅरी लाम यांनी विधेयक रद्द करण्याची अधिकृतपणे घोषणा करण्यास नकार दिला आहे.
विमानतळ कर्मचाऱ्यांचं आंदोलन
5 ऑगस्ट रोजी हाँगकाँगच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरील कर्मचारी संपावर गेले आणि 250 पेक्षा जास्त उड्डाणं रद्द करावी लागली.
या विमानतळावरून दररोज होणाऱ्या एकूण उड्डाणांच्या जवळपास 25% उड्डाणं रद्द करण्यात आली.
विमानतळावरील कर्मचाऱ्यांपैकी अनेक जण संपात सहभागी झाल्याची माहिती प्रो-डेमॉक्रसी कॉन्फेडरेशन ऑफ ट्रेड युनियनच्या अध्यक्ष कॅरोल नग यांनी दिली.

फोटो स्रोत, EPA
कॅरोल यांनी दिलेल्या माहितीनुसार कॅथे पॅसिफिककडे एकूण 3000 तर कॅथे ड्रॅगनचे 900 कर्मचारी आहेत. त्यापैकी कॅथे पॅसिफिकचे 1500 तर कॅथे ड्रॅगनचे 500 कर्मचारी 5 ऑगस्टला कामावर आले नाहीत.
तर हवाई वाहतूक मंत्रालयाचे एअर ट्रॅफिक कन्ट्रोलर्सही अगदी 'नियमांपुरते' काम करत होते. म्हणजे त्यांनी फक्त आवश्यक तेवढ्याच सेवा पुरवल्या.
पायलट आणि लोकशाहीच्या बाजूने असणारे विधीमंडळ सदस्य जेरेमी टाम यांच्यामते आंदोलकांच्या मागण्यांकडे सरकारने दुर्लक्ष केलं तर एकूण एअर ट्राफिक कन्ट्रोलर्सपैकी एक तृतीयांश लोकांनी संपावर जाण्याचा इशारा दिला आहे.
आंदोलनांमध्ये सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांना रोखणार नाही अशी भूमिका सुरुवातीला कॅथे पॅसिफिकने घेतली होती. पण नंतरच्या आठवड्यात त्यांनी आपली भूमिका बदलली. चीनी सरकारकडून टाकण्यात आलेला दबाव आणि चीनी सोशल मीडियावर टीका झाल्यानंतर कॅथे पॅसिफिकने संपात सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याची ताकीद दिली.
हाँगकाँगची विमान सेवा म्हणून ओळखली जाणारी कॅथे पॅसिफिक ही मोठ्या प्रमाणात चायनीज मार्केटवर अवलंबून आहे. त्यांच्या सुरुवातीच्या भूमिकेनंतर चायनीज सोशल मीडियावर #BoycottCathayPacific हॅशटॅग ट्रेंड झाला. त्यानंतर कंपनीने आपली भूमिका बदलली.
बँक कर्मचारी आणि फायनान्स कर्मचारी
बँक कर्मचाऱ्यांनी एअरलाईन कर्मचाऱ्यांसारखी उघडपणे भूमिका घेतली नसली तरी काही बँक कर्मचाऱ्यांनी अगदी वेगळेपणाने आपलं म्हणणं मांडलं. हे बँक कर्मचारी 1 ऑगस्टला एका फ्लॅश मॉबमध्ये सहभागी झाले.
हाँगकाँगच्या राजकीय परिस्थितीचा एकूणच फायदा खरंतर वित्त क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांना होतो. पण तरूण आंदोलकांना साथ देत त्यांनीही आंदोलनात सहभागी होणं ही मोठी गोष्ट आहे.

फोटो स्रोत, Getty Images
आंदोलकांच्या कृत्यांमुळे वातावरण बदलत असून याचा परिणाम शहराच्या अर्थव्यवस्थेवर होईल आणि जगात ट्रेड वॉर सुरू असतानाच अर्थव्यवस्थेत मंदी येईल आणि त्याने रस्त्यावरचा असंतोष वाढेल असं हाँगकाँगचे फायनान्स सेक्रेटरी पॉल चान यांनी म्हटलंय.
आंदोलनाच्या दिवशी 300 मिलियन ते 2.6 बिलियन हाँगकाँग डॉलर्सपर्यंतचं नुकसान होत असल्याचा अंदाज अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केला असल्याचं दक्षिण चीनमधल्या मॉर्निंग पोस्ट वर्तमानपत्राने म्हटलं आहे.
हाच आर्थिक तोटा सांगत हाँगकाँग सरकार हे आंदोलन आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत आहे.
प्रशासकीय कर्मचारी
हाँगकाँग आणि बीजिंग सरकारला चकित करणारी गोष्ट म्हणजे स्थानिक प्रशासनातील कर्मचाऱ्यांमधली अस्वस्थता.
ब्रिटिशांच्या वसाहतीच्या काळापासून हाँगकाँगमध्ये असणारी प्रशासकीय यंत्रणा ही राजकीय मतांपासून दूर आहे. हस्तांतरण होण्याआधी ही यंत्रणा राणीच्या बाजूने होती आणि हस्तांतरणानंतर चीफ एक्झिक्युटिव्हच्या बाजूने आहे.
पण 2 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आलेल्या प्रशासकीय कर्मचाऱ्यांसाठीच्या निदर्शनांमध्ये हजारो कर्मचारी सहभागी झाले. ही घटना सरकारसाठी 'लाजिरवाणी' असल्याचं वर्णन 'साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट'ने केलं आहे.

फोटो स्रोत, Reuters
आंदोलनामध्ये 40,000 लोक सहभागी झाल्याचं आयोजकांचं म्हणणं आहे तर या रॅलीत फक्त 13,000 लोक होते असं पोलीस म्हणताहेत.
प्रशासकीय सेवांमध्ये अगदी सर्वोच्च पदांवर असणाऱ्या अधिकाऱ्यांनी एक निनावी संयुक्त पत्र जारी करत लोकांच्या मागण्यांचं उत्तर देण्याची मागणी कॅरी लाम यांच्याकडे केली आहे.
यामुळे खळबळ उडाली. हाँगकाँगच्या प्रशासकीय सेवांमध्ये असलेले 1,60,000 कर्मचारी हे चीफ एक्झिक्युटिव्हच्या बाजूने असल्याचं सरकारचं म्हणणं आहे.
तर आम्ही शांत रहायचं ठरवलं तर तो आमच्या कामाचा आणि लोकांच्या आमच्यावरच्या विश्वासाचा अपमान असेल असं आयोजकांपैकी एक असणाऱ्या चेऊंग का-पो यांनी मॉर्निंग पोस्टशी बोलताना सांगितलं.
बीजिंगची प्रतिक्रिया
हाँगकाँगमध्ये निदर्शनं सुरूच आहेत आणि या आंदोलनांचं वर्णन 'चीन विरोधी' आणि फुटीरतावादी करण्यात येतंय.
'Revolution of our time' म्हणजेच आमच्याकाळातली क्रांती अशी घोषणा आता दर आंदोलनात ऐकू येते.
त्सिम शा त्सुईमध्ये एका ठिकाणी चीनचा झेंडा उतरवून व्हिक्टोरिया हार्बरमध्ये फेकून देण्यात आल्याने चीन खवळलेला आहे.

फोटो स्रोत, Getty Images
शहरातली परिस्थिती हाताबाहेर गेली तर हस्तक्षेप करण्याची चीनच्या मुख्यभूमीतल्या सरकारची तयारी असल्याचे संकेत हाँगकाँगच्या एका अधिकाऱ्याने 7 ऑगस्टला दिले होते.
"हिंसक घडामोडी वाढत आहेत आणि समाजावर होणारा परिणामही दूरवर पसरतोय. असं म्हणू शकतो की हस्तांतरणापासूनच्या सर्वांत वाईट परिस्थितीला हाँगकाँग सामोरं जात आहे." असं हाँगकाँगच्या स्टेट काऊन्सिलचे संचालक झँग शिओमिंग म्हणाल्याचं हाँगकाँग इकॉनॉमिक जर्नलने म्हटलंय. स्टेट काऊन्सिल ही चीनची कॅबिनेट आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








