कोण होणार ब्रिटनचा पंतप्रधान: बोरिस जॉन्सन की जेरेमी हंट?

बोरिस जॉन्सन आणि जेरेमी हंट

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, बोरिस जॉन्सन आणि जेरेमी हंट

ब्रिटनमध्ये जो कन्झर्व्हेटिव्ह पार्टीचा (हुजूर पक्ष) अध्यक्ष होईल तोच नवा पंतप्रधान असणार आहे.

थेरेसा मे पंतप्रधानपदावरून पायउतार झाल्यामुळे आता नवीन पंतप्रधानाची निवड करण्यात येत आहे. पण त्यासाठी संपूर्ण देशात सार्वत्रिक निवडणुका होत नसून हुजूर पक्षांतर्गत याचा निर्णय घेण्यात येणार आहे.

त्यासाठी कन्झर्व्हेटिव पार्टीमध्ये म्हणजे हुजूर पक्षात अंतर्गत निवडणुका आणि मतदान सुरू आहे आणि यामध्ये आपण बोरिस जॉन्सन यांना कडवी लढत देऊ असं जेरेमी हंट यांनी म्हटलंय.

पक्षाचं अध्यक्षपद आणि पंतप्रधानपदासाठीचे आता हे दोनच उमेदवार शर्यतीत उरले आहेत.

पक्षाच्या खासदारांच्या शेवटच्या मतदानामध्ये आपल्याला निम्म्याहून अधिक म्हणजे 160 खासदारांची मतं मिळाली, इतक्या खासदारांचा पाठिंबा मिळणं हे आपल्यासाठी सन्मान असल्याचं जॉन्ससन यांनी म्हटलंय.

जेरेमी हंट यांना 77 मतं मिळाली.

तिसऱ्या क्रमांकावर आलेले उमेदवार मायकल गोव्ह यांना 75 मतं मिळाली.

1,60,000 टोरी मतदार आता जॉन्सन आणि हंट यांचं भवितव्य मतदानाने ठरवतील. याचा निकाल जुलैमध्ये उशिरा जाहीर होईल.

'टोरी लीडरशिप' या नावाने आता ही निवडणूक ओळखली जातेय. 10 जून रोजी पक्षाध्यक्ष निवडीची ही प्रक्रिया सुरू झाली आणि त्यावेळी या स्पर्धेत 10 उमेदवार होते.

'टोरिझम' या राजकीय विचारसरणीने प्रेरित व्यक्तीला 'टोरी' म्हटलं जातं.

गोव्ह आणि जॉन्सन

फोटो स्रोत, PA

त्यापूर्वी हुजूर पक्षाच्या सर्व 313 खासदार शेवटच्या मतदानात सहभागी झाले. यातलं एक मत फुकट गेलं.

मतदानाच्या या फेरीतला जॉन्सन यांचा विजय बहुतेकांना अपेक्षित होता.

पण दुसऱ्या स्थानासाठी पर्यावरण सचिव (Environment Secretary) गोव्ह आणि परराष्ट्र सचिव (Foreign Secretary) असणारे हंट यांच्यामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून लढत सुरू होती.

गुरुवारी झालेल्या खासदारांच्या मतदानामध्ये जेरेमी हंट यांनी दुसरं स्थान पटकावलं.

तर बोरिस जॉन्सन यांनी ट्वीट करत आपल्याला मिळालेला हा पाठिंबा हा आपला 'बहुमान' असल्याचं म्हटलं.

दरम्यान पक्षाध्यक्षपदासाठी आणि पंतप्रधानपदासाठीच्या या स्पर्धेमध्ये जॉन्सन आघाडीवर असल्याचं जेरेमी हंट यांनी मान्य केलं. आपण 'अंडरडॉग' असलो तरी राजकारणात आश्चर्यकारक गोष्टी घडतात, असं त्यांनी ट्वीट केलंय.

याशिवाय गोव्ह हे हुजूर पक्षामधल्या तडफदार लोकांपैकी एक असल्याचं म्हणत हंट यांनी त्यांचं कौतुक केलंय. बोरिस जॉन्सन यांना आपण प्राणपणाने लढत देणार असल्याचंही त्यांनी म्हटलं.

प्रातिनिधक फोटे

फोटो स्रोत, Getty Images

आपल्या प्रतिस्पर्ध्याचं अभिनंदन करत गोव्ह यांनी म्हटलंय की "मी साहजिकच निराश झालो असलो तरी निवडणुकीच्या या मोहीमेचा मला अभिमान आहे."

1990च्या दशकामध्ये आपण कोकेनचं सेवन केल्याची कबुली गोव्ह यांनी दिली होती. याचा फटका त्यांच्या प्रचार मोहीमेला बसल्याचं त्यांचे कॅम्पेन मॅनेजर मेल स्ट्राईड यांचं म्हणणं आहे. "याचा फटका आम्हाला बसला आणि तिथेच प्रचार मोहीम मागे पडली. "

आताच बोरिस जॉन्सन यांचं स्थान पाहता (अजूनही बरीच प्रक्रिया व्हायची असली तरी) तेच 10 डाऊनिंग स्ट्रीटमध्ये जाणार अशी चिन्हं दिसत आहेत.

पण दुसऱ्या स्थानासाठीच्या निकालामुळे जॉन्सन यांच्या समर्थकांना मोठा दिलासा मिळालाय. कारण जेरेमी हंट हे दुर्बल प्रतिस्पर्धी असल्याचं ते मानतात.

या दोन दावेदारांची राजकीय स्टाईल आणि त्यांची कौशल्य बाजूला ठेवायची ठरवली, तरी एक गोष्ट ठळकपणे समोर येतच राहते.

प्रातिनिधक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

ती म्हणजे ब्रेक्झिटसाठीचा निर्णय घेण्यासाठी झालेल्या मतदानामध्ये जेरेमी हंट यांनी 'रिमेन' म्हणजेच युरोपियन युनियनमध्ये ब्रिटनने रहावं असं मतदान केलं होतं.

कंझर्व्हेटिव्ह पार्टी ही युरोपियन युनियनमधून ब्रिटनने बाहेर पडावं या मताची आहे आणि हंट नुकतेच या मतप्रवाहामध्ये सामील झालेले असले तरी आपला भावी नेता हा पूर्णपणे या मताचा असावा असं अनेक टोरी सदस्यांना वाटतंय.

बोरिस जॉन्सन यांनी ब्रिटनने युरोपियन युनियनमधून बाहेर पडावं यासाठीच्या 'व्होट लीव्ह कॅम्पेन'चं नेतृत्व केलं होतं.

जॉन्सन आणि हंट आता देशभरातल्या पक्ष सदस्यांसमोर विविध बैठकींमध्ये आपले मुद्दे मांडतील. त्यानंतर मतदान होईल.

प्रातिनिधक फोटो

फोटो स्रोत, AFP

22 जुलैच्या आठवड्यामध्ये याचे निकाल जाहीर करण्यात येतील. 9 जुलैला आयटीव्ही (ITV)वर होणाऱ्या आमने-सामने चर्चेमध्येही ते सामील होतील.

यापूर्वी चॅनल 4 (Channel 4) आणि बीबीसीवर अशा चर्चा झाल्या आहेत.

जेरेमी हंट हे 2010पासून कॅबिनेटमध्ये आहेत. परराष्ट्र सचिव होण्याआधी ते युनाटेड किंग्डमचे सगळ्यांत जास्त काळ पदभार सांभाळणारे आरोग्य सचिव होते.

बोरिस जॉन्सन हे माजी परराष्ट्र सचिव आहेत. ब्रेक्झिटविषयीची थेरेसा मे यांची धोरणं न पटल्याने ते कॅबिनेटमधून बाहेर पडले होते.

2008 ते 2016 या काळात ते लंडनचे महापौर होते.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)