अमेरिकेने का ताब्यात घेतलं उत्तर कोरियाचं कोळशाचं जहाज?

उत्तर कोरियाचे जहाज द व्हाइस ऑनेस्ट

फोटो स्रोत, AFP

फोटो कॅप्शन, उत्तर कोरियाचे जहाज द व्हाइस ऑनेस्ट

अमेरिकेनं उत्तर कोरियाचं कोळसा घेऊन जाणारं एक मालवाहू जहाज जप्त केलं आहे.

आंतरराष्ट्रीय नियमांचं उल्लंघन केल्याच्या आरोपावरून अमेरिकेनं पहिल्यांदाच उत्तर कोरियाचं जहाज जप्त केलं आहे. यामुळे दोन्ही देशातला तणाव आणखी वाढू शकतो, असं जाणकार सागत आहेत.

'द व्हाइस ऑनेस्ट' हे उत्तर कोरियाचं मालवाहू जहाज आता अमेरिकेच्या ताब्यात आहे.

उत्तर कोरिया कोळशाचा मोठा निर्यातदार आहे. पण संयुक्त राष्ट्रानं त्यावर बंदी घातली आहे. याआधी एप्रिल 2018मध्ये तेच जहाज इंडोनेशियात जप्त केलं होतं.

"उत्तर कोरियाच्या योजनेविषयी आम्हाला माहिती मिळाली आहे. उत्तर कोरिया परदेशी ग्राहकांना मोठ्या प्रमाणात कोळसा विकत आहे," असं अमेरिकेचे अटर्नी ज्यॉफ्री एस. बर्मन यांनी सांगितलं.

उत्तर कोरिया फक्त त्यांच्यावरील आंतरराष्ट्रीय निर्बंधच तोडत नाहीये तर 'द व्हाइस ऑनेस्ट' या जहाजातून ते मोठ्या मशीनीही आयात करत आहे, असंही त्यांनी सांगिंतलं.

उत्तर कोरियानं त्यांचे अण्वस्त्र कार्यक्रम थांबवावेत, अशी अमेरिकेनं मागणी केली आहे. पण त्याआधी उत्तर कोरियावरची बंधनं हटवावीत, असं किम जाँग-उन यांचं म्हणणं आहे.

याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप आणि उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जाँग-उन यांच्यात व्हिएतनाममध्ये चर्चा झाली होती. तेव्हा दोन्ही देशांमध्ये या विषयावर काही तोडगा निघाला नव्हता.

कोरिया

फोटो स्रोत, EPA/KCNA

अण्वस्त्रासंबंधी वाटाघाटीतली कोंडी कशी फोडायची, याची चर्चा करण्यासाठी अमेरिकेचे वरिष्ठ राजदूत दक्षिण कोरियात असतानाच उत्तर कोरियानं एक अण्वस्त्र चाचणी घेतली आहे.

अण्वस्त्र कोंडी

उत्तर कोरिया आणि अमेरिकेमधली फेब्रुवारीतली चर्चा फिस्कटल्यानंतर अमेरिकेतले उत्तर कोरियाचे विशेष प्रतिनिधी स्टिफन बिगन अण्वस्त्राविषयीची चर्चा पुन्हा रुळावर आणण्यासाठी दक्षिण कोरियाची राजधानी सोलमध्ये दाखल झाले आहेत.

उत्तर कोरियामध्ये सध्या मोठा धान्य तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे मानवतेच्या दृष्टिकोनातून उत्तर कोरियाला कोणत्या मार्गाने धान्य पुरवठा करता येईल, यावरही ते चर्चा करणार आहेत.

आपण अण्वस्त्र चाचणी करणार नाही आणि आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्रही डागणार नसल्याचं किम जाँग-उन यांनी म्हटलं होतं.

मात्र उत्तर कोरियाचा अण्वस्त्र कार्यक्रम सुरूच असल्याचं उपग्रहाने टिपलेल्या छायाचित्रांवरून स्पष्ट होतं. त्यांनी लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रात बसू शकतील, असे छोटे अणूबाँब आणि अमेरिकेच्या भूमीपर्यंत मारा करू शकतील, असे आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्र तयार केल्याचा दावा दक्षिण कोरियाने केला आहे.

दरम्यान, अमेरिकेने 1950-53च्या कोरियन युद्धात मृत्युमुखी पडलेल्या त्यांच्या जवानांचे पार्थिव अमेरिकेत परत आणण्याचा कार्यक्रमही फेब्रुवारीमधली चर्चा फिस्कटल्यानंतर स्थगित केला आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)