नॉर्वे: हा सामान्य पांढरा देवमासा आहे की रशियाचा गुप्तहेर?

फोटो स्रोत, EPA
नॉर्वेच्या किनारपट्टीजवळ काही दिवसांपूर्वी एक पांढरा देवमासा आढळला. त्याच्या शरीरावर एक खास पट्टा होता. त्यामुळे या माशाला रशियाच्या नौदलाने प्रशिक्षित केलं असून तो रशियाचा हेर असू शकतो, अशी शंका नॉर्वेतल्या तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
सागरी प्राण्यांचे तज्ज्ञ प्राध्यापक ऑर्दुन रिचर्डसन सांगतात की या पांढरा देवमाशाच्या शरीरावर लावलेल्या पट्ट्यात एक गोप्रो कॅमेरा होल्डर आणि सेंट पीटर्सबर्गकडे इशारा करणारं एक लेबल होतं. नॉर्वेमधल्या एका मच्छीमाराने खूप मेहनतीने तो पट्टा देवमाशाच्या शरिरावरून काढला.
देवमाशाच्या शरीरावर जी कीट होती तशी कीट रशियाचे वैज्ञानिक वापरत तशी नाही, अशी माहिती रशियातल्या एका वैज्ञानिक मित्राने दिल्याचं रिचर्डसन यांनी सांगितलं. या क्षेत्रात रशियन नौदलाचं एक तळही आहे.
देवमाशाच्या शरीरावर कॅमेरा होल्डर
आर्क्टिकमधल्या इंगोय या बेटावर हा पांढरा देवमासा अनेकदा नॉर्वेच्या जहाजांजवळ आल्याचं कळतं. इथून 415 किमी दूर मर्नमास्कमध्ये रशियाचा उत्तरी नौदल तळ आहे.
पांढरा देवमासा आर्टिक्टमधल्या पाण्यातच आढळतो. नॉर्वेच्या NRK वाहिनीने या देवमाशाच्या शरीरावरून पट्टा काढत असल्याचा एक व्हीडियो प्रसिद्ध केला आहे.
मजकूर उपलब्ध नाही
Facebookवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.Facebook पोस्ट समाप्त
प्रा. रिचर्डसन यांनी बीबीसीला सांगितलं की हा पट्टा माशाच्या शरीराच्या समोरच्या भागात घट्ट बांधलेला होता. त्यांच्या माहितीप्रमाणे या पट्ट्यात गोप्रो कॅमेरा होल्डर होतं. मात्र, कॅमेरा नव्हता.
त्यांनी सांगितलं, "रशियाच्या एका सहकारी वैज्ञानिकानुसार त्यांच्याकडे अशाप्रकारचे प्रयोग होत नाहीत. मात्र रशियाच्या नौदलाने काही पांढऱ्या देवमाशांना काही वर्षं प्रशिक्षण दिल्याचंही त्या सहकाऱ्याने सांगितलं. हा देवमासा त्यातलाच एक असावा."
'युद्धात डॉल्फिनचा वापर'
सैन्यात सागरी प्राण्यांच्या वापराविषयी लिहिणारे रशियातले एक कर्नल आहेत. त्यांनी नॉर्वेच्या दाव्यावर प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र हा पांढरा देवमासा रशियाच्या नौदलातून बाहेर पडलेला असावा, याचा इनकारही केलेला नाही.
रशियाच्या गोवोरित या चॅनलला दिलेल्या प्रतिक्रियेत कर्नल विक्टर बॅरेंटस म्हणतात, "आम्ही या माशाचा हेर म्हणूव वापर केला असता तर त्याच्यावर 'आम्हाला या क्रमांकावर फोन करा' अशी चिठ्ठी लिहून त्याला सोडलं असतं, असं तुम्हाला वाटतं का?"
"आम्ही आमच्या सैन्यात युद्धासंबंधी कारवायांसाठी डॉल्फिनचा समावेश केला आहे आणि आम्ही हे लपवलेलं नाही."
"क्रिमियामध्ये आमचं मिलिट्री डॉल्फिन्स केंद्र आहे. तिथे त्यांना वेगवेगळ्या कामांसाठी प्रशिक्षित केलं जातं. यात समुद्राच्या पृष्ठभागाचं विश्लेषण इथपासून तर मर्यादित जलक्षेत्राचं संरक्षण, परदेशी खलाशांचा बंदोबस्त करणे आणि परदेशी जहाजांखाली स्फोटकं लावण्यासारख्या कामांचा समावेश आहे."

फोटो स्रोत, Getty Images
क्रिमियामधलं डॉल्फिन प्रशिक्षण केंद्र पूर्वी युक्रेनच्या ताब्यात होतं. मात्र 2014 साली रशियन नौदलाने ते आपल्या ताब्यात घेतलं.
ट्रोम्सो विद्यापीठातले प्राध्यापक रिचर्डसन सांगतात, "पांढरा देवमासा हा देखील डॉल्फिनप्रमाणेच हुशार असतो. त्याला कुत्र्याप्रमाणे प्रशिक्षित करता येऊ शकतं."
त्यांच्या मते, "हा मासा दोन-तीन दिवसात अनेकदा नॉर्वेच्या जहाजांच्या जवळ आला होता. तो अन्नाच्या शोधात होतो. त्याचं तोंड उघड होतं."
अमेरिकेची नेव्ही डॉल्फिन्स
युद्धात सागरी प्राण्यांचा वापर फार पूर्वीपासून होतोय. शीतयुद्धावेळी अमेरिकेच्या नौदलाने डॉल्फिन आणि सी लायनला प्रशिक्षित करण्याचं काम सुरू केलं होतं. या प्राण्यांना स्फोटकं आणि इतर धोकादायक वस्तूंचा शोध लावण्याचं प्रशिक्षण देण्यात आलं होतं.

फोटो स्रोत, Getty Images
पाण्याखाली बेकायदेशीरपणे प्रवेश करणाऱ्या लोकांना शोधून काढण्यासाठीदेखील या प्राण्यांचा वापर झाल्याची माहिती नौदलाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.
2003 सालच्या इराकविरोधातल्या युद्धातही अमेरिकेच्या सैन्याच्या स्फोटकं शोधून काढणाऱ्या पथकाने डॉल्फिनची मदत घेतली होती.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








