श्रीलंका बाँबस्फोट: ईस्टर संडेच्या स्फोटांचा दक्षिण भारताशी नेमका संबंध काय?

श्रीलंका स्फोट

फोटो स्रोत, Getty Images

राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) केरळमधील अनेक ठिकाणी धाडी टाकायला सुरुवात केली आहे. तीन जणांना ताब्यात घेण्यात आलं असून श्रीलंकेत झालेल्या स्फोटाशी त्यांचा संबंध आहे का, याचा तपास सुरू आहे.

NIAनं केरळच्या कासरगोडमधील दोन आणि पलक्कडमधील एका घरावर धाड टाकली. हे लोक श्रीलंकेत साखळी स्फोटांसाठी जबाबदार असलेल्या जाफरान हाशिमचे कथित अनुयायी आहेत, अशी NIAने माहिती दिली आहे.

21 एप्रिलला ईस्टर संडेच्या प्रार्थनेवेळी श्रीलंकेत झालेल्या साखळी स्फोटात 250 हून अधिक लोक मृत्युमुखी पडले आहेत. हाशिमच्या अनुयायांच्या सोशल मीडियावरील पोस्टची पडताळणी केल्यानतंर NIAला या लोकांवर संशय बळावला होता.

NIAचा दावा आहे की या लोकांचा हिंसक जिहादवर विश्वास आहे, तसंच त्यांच्यावर संशय घेण्याची आणखीही कारणं आहेत.

पहिलं म्हणजे केरळमध्ये हाशिमच्या अनेक ऑडिओ टेप्स सापडल्या होत्या, ज्यात हाशिम ज्यापद्धतीची भाषा किंवा विचार व्यक्त करत आहे, ते इस्लामच्या शिकवणीपेक्षा वेगळे असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

दुसरं म्हणजे ऑडिओ टेप्स अशा तरुणांकडून जप्त करण्यात आल्या होत्या, ज्यांना तामिळनाडूच्या कोईम्बतूर इस्लामिक स्टेट म्हणून प्रसिद्ध असलेल्या एका प्रकरणात अटक करण्यात आली होती.

जाफरान हाशिमची मशिद

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, जाफरान हाशिमनं स्थापन केलेल्या मशिदीत आधी बरेच लोक यायचे, आता हा परिसर रिकामा असतो

असं सांगितलं जातंय की कोईम्बतूर इस्लामिक स्टेट प्रकरणाच्या तपासादरम्यान NIAला असे पुरावे सापडले होते, ज्यांच्या आधारावर भारतानं श्रीलंकेला कट्टरतावादी हल्ल्याबद्दल आधीच सूचित केलं होतं. धोक्याचा इशाराही दिला होता.

तिसरं कारण म्हणजे 2016 मध्ये केरळच्या 21 तरुणांना श्रीलंकेहून सीरियाच्या मार्गे अफगाणिस्तानला पाठवल्याचाही त्यांच्यावर आरोप आहे.

किती मोठा आहे ग्रुप?

या धाडीत ज्यांना पकडण्यात आलंय, ते 2016च्या कोईम्बतूर इस्लामिक स्टेट केसमधील आरोपींशीही संबंधित असल्याचा आरोप आहे. तब्बल 21 तरुण इस्लामिक स्टेटमध्ये सामील होण्यासाठी भारत सोडून गेले होते, अशी माहिती या प्रकरणात पुढे आली होती.

असं सांगितलं जातं की हाशिमनं श्रीलंकेत नॅशनल तोहिद जमात (NTJ)ची स्थापना केली होती. शिवाय श्रीलंकेतील प्रमुख मुस्लिम संस्था असलेल्या श्रीलंका तोहिद जमातपेक्षा आणखी एक वेगळी संस्था हाशिमनं स्थापन केली, कारण STJजे अर्थात श्रीलंका तोहिद जमातने नॅशनल तोहिद जमातच्या हिंसक शिकवणीला आणि कारवायांना विरोध केला होता.

तामिळनाडूत जी तोहिद जमात संस्था आहे, ती केरळमध्ये कुठेही आढळून येत नाही. पण तज्ज्ञांच्या मते केरळमध्ये इतर तीन अशा संघटना आहेत, ज्या कट्टरतावादी इस्लामचं पालन करतात.

या संघटनेचे लोकही नॅशनल तोहिद जमातचीच भाषा बोलतात.

श्रीलंकेत झालेल्या साखळी स्फोटाप्रकरणी हाशिमला जबाबदार धरलं जातंय.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, श्रीलंकेत झालेल्या साखळी स्फोटाप्रकरणी हाशिमला जबाबदार धरलं जातंय.

NIAच्या एका अधिकाऱ्यानं नाव जाहीर न करण्याच्या अटीवर बीबीसीला सांगितलं की, "हा गट किती मोठा आहे हे सांगणं कठीण आहे, कारण आजकाल जास्तीत जास्त नेटवर्किंग किंवा संपर्क ऑनलाईन पद्धतीनं केला जातो."

अल-वल्ला आणि अल-बर्राचं पुस्तक

NIAच्या अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, "केरळमध्ये ज्या ऑडिओ टेप्स सापडल्या होत्या, त्यात हाशिमनं तामिळमध्ये दिलेली भाषणं होती. ज्यात हाशिम स्पष्टपणे हिंसेचं समर्थन करताना दिसतो."

केरळ विद्यापीठातील इस्लामिक स्टडीजचे प्रोफेसर अश्रफ कड्डाकल यांनी बीबीसीला सांगितलं की, "ऑडिओ टेप्समध्ये हाशिम सलफी स्कॉलर शेख फौजान यांच्या अल-वल्ला आणि अल बर्राचा उल्लेख करताना आढळतो."

प्रोफेसर कड्डाकल सांगतात की, "हाशिमच्या मतानुसार एका मुसलमानाने फक्त दुसऱ्या मुसलमान व्यक्तीशीच संबंध ठेवायला हवेत. गैरमुस्लीम माणसांशी त्यांनी संबंध ठेऊ नयेत. आणि जर तुम्ही गैरमुस्लीम भागात राहात असाल तर तुम्ही तातडीनं मुस्लीमबहुल भागात बस्तान हलवलं पाहिजे."

श्रीलंका स्फोट

फोटो स्रोत, Getty Images

तामिळनाडूच्या तोहिद जमात (NTJ) अधिकाऱ्यांच्या रडारवर यामुळे आली, कारण या संस्थेचं नाव श्रीलंकेतील नॅशनल तोहिद जमातशी मिळतं-जुळतं आहे. या संस्थेचं म्होरक्या हाशिम आहे.

मात्र NTJचे उपाध्यक्ष अब्दुर्रहमान यांनी बीबीसी हिंदीला सांगितलं की, "आमचं NTJशी काहीही देणं-घेणं नाही. आमचा हिंसाचारावर विश्वास नाही. याउलट आम्ही गावागावात फिरून शांततेचा संदेश देतो."

अब्दुर्रहमान म्हणतात की गेली 30 वर्षं आम्ही लोक सौहार्द, कायम राहावं यासाठी प्रयत्न करत आहोत. ते सांगतात, "आमच्या देशात हिंदू, मुस्लीम, ईसाई आणि नास्तिक अशा सगळ्या प्रकारची लोकं राहतात. आम्ही हुंडा आणि इतर चुकीच्या सामाजिक रुढी, प्रथांविरोधात संघर्ष करतो. भलेही आम्हाला दुसऱ्या धर्माच्या लोकांशी मैत्री करण्यात आपत्ती असो."

प्रोफेसर अश्रफर यांच्या मतानुसार, "केरळ पोलिसांनी कधीही या संघटनांना गांभीर्यानं घेतलं नाही. कारण या संघटनांचे कुणी समर्थक नाहीएत. पण मला वाटतं की हे सगळं सुरुवातीलाच मुळापासून संपवायला पाहिजे. कारण अशा प्रकारची लोकं समाजात कट्टरता पसरवण्याचा प्रयत्न करतात."

NIA अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की, "आम्ही निश्चितपणे दोषींवर कारवाई करू. पण चुकीच्या मार्गानं जाणाऱ्या तरुणांसाठी आम्ही लोक एक मोहीमही चालवत आहोत. त्यांना पुन्हा मुख्य प्रवाहात आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. मुंबईचा एक तरुण सीरियात जाण्यासाठी अरब देशात गेला होता. त्याची समजूत घालून त्याला पुन्हा योग्य मार्गावर आणण्यात आम्हाला यश आलं आहे."

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)