हुशार, कार्यक्षम कर्मचाऱ्यांना खूश ठेवण्यासाठी कंपन्या काय करतात?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, क्रिस स्टोकल-वॉकर
- Role, बीबीसी कैपिटल
कर्मचाऱ्यांना खूश ठेवण्यासाठी गिफ्ट्स देणं किंवा कॉर्पोरेट पर्क्स देणं हा एकमेव उपाय नाहीए. इतर छोट्यामोठ्या उपाययोजनाही महत्त्वाच्या ठरू शकतात. हुशार आणि कार्यक्षम कर्मचाऱ्यांना आपल्यासोबत ठेवण्यासाठी आणि अशाच नव्या लोकांना आकर्षित करण्यासाठी कंपन्या अनेक क्लृप्त्या लढवतात.
ज्यात कर्मचाऱ्यांना कार्यालयात मोफत स्नॅक्स, वीकेंडला बीयर तसंच कार्यालयात जिमची सुविधा देण्याशिवाय जगभरात फिरण्यासाठी मोठ्या सुट्ट्याही देऊ करतात. कार्यक्षम कर्मचाऱ्यांना आपल्यासोबत ठेवणं त्यांच्यासाठी महत्त्वाचं असतं.
लँचेस्टर युनिव्हर्सिटीतील मनोविज्ञान प्रोफेसर सुझैन कार्टराईट सांगतात की, जेव्हा जेव्हा नोकऱ्यांच्या मोठ्या संधी उपलब्ध होतात तेव्हा अशा गोष्टी वाढतात."
सध्याचं मार्केट हे कष्टकऱ्यांचं आहे. आधीच्या काळाच्या तुलनेत आता लोक वेगानं नोकऱ्या बदलतात.
अमेरिकेच्या श्रमिक सांख्यिकी विभागाच्या आकडेवारीनुसार 25 ते 34 वयोगटातील लोक केवळ 2.9 वर्षच एका नोकरीत टिकून राहतात. 1983मध्ये हे प्रमाण 3.2वर्ष इतकं होतं.
कर्मचाऱ्यांना आपल्यासोबत ठेवण्यासाठी कंपन्या अनेक प्रलोभनं देतात. काही कंपन्या कर्मचाऱ्यांना अधिकचे भत्तेही देतात.
पण यातला कुठला उपाय काम करतो आणि कुठला नाही? जर भत्ता देणं केवळ दिखावा असेल तर मग चांगला उपाय कुठला आहे?
मोठ्या सुट्ट्या
नेटफ्लिक्स आणि वर्जिन समुहासह काही कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना मोठ्या सुट्ट्यांचा पर्याय देतात.

फोटो स्रोत, STEVE STUART
या कंपनीतले कर्मचारी हवी तेवढी मोठी सुट्टी घेऊ शकतात. मोठ्या कंपन्यांची ही पद्धत बघून लहान कंपन्याही आता मागे राहिलेल्या नाही.
अमेरिकेतील मनुष्यबळ संघटना सोसायटी फॉर ह्युमन रिसोर्स (SHRM)नुसार 5 टक्के कंपन्या अमर्याद सुट्ट्या देण्याची तयारी दाखवतात.
2014मध्ये केवळ 1 टक्के कंपन्या अशा प्रकारचा पर्याय आपल्या कर्मचाऱ्यांना देत होत्या. अशा सुट्ट्या कर्मचार्यांचा आत्मविश्वास वाढवताना दिसतात.
SHRMच्या सुजैन गाऊल्डेन सांगतात की, " आपल्या सुट्ट्यांची गरज ठरवण्याचा अधिकार कर्मचाऱ्यांना दिला तर त्यांना ते आवडतं"
मात्र याचा वापर लोक कसा करतात हे संशयास्पद आहे. मँचेस्टर बिझनेस स्कूलमध्ये मनोविज्ञानाच्या प्रोफेसर असलेल्या कॅरी कूपर यांच्या मते पीआर किंवा प्रसिद्धीसाठी हे चांगलं आहे, पण लोक याचा वापर कसा करतात हे आम्हाला माहिती नाही.
कर्मचारी सुट्टी घेत नाहीत
सुट्टी घेणं हे व्यवसाय आणि कर्मचारी दोघांसाठीही फायदेशीर असतं.

फोटो स्रोत, Getty Images
2015 च्या एका अभ्यासानुसार जे कर्मचारी कंपनीनं दिलेल्या सगळ्या सुट्या घेतात त्यांना वर्षाला 6.5 टक्के वेतनवाढ मिळण्याची शक्यता असते.
जे कर्मचारी सुट्ट्या घेत नाहीत, त्यांना मात्र तशी वेतनवाढ मिळेलच असं नाही.
मात्र नियम जरी आपणाला मान्य असले तरी गरजेपेक्षा जास्त सुट्या घेतल्या की कर्मचारी बेचैन होतात.
कूपर सांगतात, "तुम्हाला जेव्हा 4 ते 5 आठवड्याची सुट्टी घ्यायला सांगितली जाते, तेव्हा काय होतं हे तुम्हाला माहिती आहे का?"
सुट्ट्यांबद्दल वेगवेगळ्या प्रबंधकांचा विचार वेगळा असतो. अर्थातच ते कर्मचाऱ्यांच्या लक्षात येत नाही.
ब्रिटनमध्ये केवळ 40 टक्के कर्मचारीच वर्षाला नेमून दिलेल्या पूर्ण सुट्या घेताना दिसतात. त्यामुळे नियम हटवणं थोडं अवघड जातं.
गरज असेल तर सुट्ट्या घ्या
कंपनीत एकाचवेळी सगळे कर्मचारी हजर आहेत आणि एखाद्यानं सुट्टी घेतली तर समस्या असणार नाही स्थिती चांगली आहे.

फोटो स्रोत, Alamy
काहीवेळा सुट्ट्या शिल्लक असतानाही त्या घेता येत नाहीत.
अमर्याद सुट्ट्यांचा पर्याय हळूहळू लागू करायला हवा. तसंच कंपनीतील सगळ्या स्तरातील कर्मचाऱ्यांनी तशा सुट्ट्या घ्याव्यात यासाठी त्यांना प्रोत्साहित करायला हवं.
गाऊल्डेन सांगतात, "अशा प्रकारच्या सुट्ट्यांची पद्धत सुरु करणाऱ्या कंपन्या वारंवार हे स्पष्ट करतात की ज्या कर्मचाऱ्यांना सुट्टीची गरज आहे, त्यांनी ती जरूर घ्यावी."
काही कंपन्यांना अमर्याद सुट्ट्यांच्या पद्धतीला औपचारीक स्वरूप देण्यात यश आलं आहे.
ब्रिटनमधील सुपरमार्केट कंपनी आस्दाने सगळ्या कर्मचाऱ्यांसाठी 'करिअर ब्रेक'ची योजना बनवली आहे.
ज्यात तरूण कर्मचाऱ्यांना फिरस्ती करण्यापासून ते अगदी साठीतल्या कर्मचाऱ्यांना आपल्या नातवंडांना खेळवण्यासाठीही सुट्टी मिळते.
सुविधा की दिखावा?
शुक्रवारी रात्री कर्मचाऱ्यांना मोफत बीअर देण्याचा ट्रेंडही आता वाढताना दिसतोय. मात्र तो कर्मचाऱ्यांना फारसा आवडत नी.

फोटो स्रोत, Getty Images
'पर्कबॉक्स' नावाच्या कंपनीनं 2300 लोकांचा सर्वे केला, ज्यात त्यांना काय पर्क अर्थात फायदे मिळतात आणि त्याविषयी ते काय विचार करतात हे विचारण्यात आलं.
पर्कबॉक्स चे सीईओ सौरव चोपड़ा सांगतात की,"ज्या गोष्टी आपल्याला ट्रेंडी वाटतात, त्या सगळ्याच गोष्टी सगळ्या कर्मचाऱ्यांच्या टॉप लिस्टमध्ये नसतात."
शुक्रवारी मोफत मद्य देण्याचा प्रकार पर्कबॉक्सच्या लिस्टमध्ये 38व्या स्थानावर आहे.
कार्टराइट सांगतात की, "यातले काही फायदे टिकणारे नाहीत. ते बनावटी आहेत. लोकांना अजिबात आवडत नाहीत."
कार्यालयात उशीरापर्यंत काम करणाऱ्यांना मोफत जेवण देण्याच्या योजनेबाबतही असंच आहे, ते फारसं रूचत नाही, असं प्रोफेसर कॅरी यांना वाटतं.
"कंपन्यांना वाटतं की त्या कर्मचाऱ्यांच्या भल्यासाठी सोय उपलब्ध करून देत आहेत, पण तसं नाही. कार्यालयात जास्त वेळ थांबण्यासाठी तुम्ही त्यांना प्रोत्साहन देता हे स्पष्ट आहे."
कार्यालय घर होऊ शकत नाही
ज्या कार्यालयात बोलणं आणि एकमेकांना भेटणं कमी असतं आणि टर्नओव्हर जास्त असतो तिथं कर्मचाऱ्यांची निष्ठा वाढवण्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचं ठरतं.

फोटो स्रोत, Getty Images
मात्र कार्टराइट सांतात की, कर्मचाऱ्यांना कार्यालयात घरासारखा फील देण्यापेक्षा त्यांना घरातून काम करण्याची सोय उपलब्ध करून दिली पाहिजे. ज्यांना अशी संधी मिळते ते लोक जास्त वेळ काम करतात आणि कंपनीवर खूश असतात.
कूपर सांगतात की, "जर तुम्हाला कार्यालय किंवा घरातून काम करण्याची मुभा असेल तर तुम्ही जास्त चांगलं काम करू शकता. आणि तुम्ही जास्त आनंदी राहता."
पण हे केवळ अशाच संघटनांमध्ये होतं ज्या पूर्णपणे या पद्धतीसाठी समर्पित आहेत. पण ज्या कंपन्या असा दिखावा करतात तिथं हे होत नाही.
कामाची आवड
जून 2014 मध्ये डेलॉयटनं "ऐजाइल वर्किंग" प्रोग्रामची सुरूवात केली आणि कर्मचाऱ्यांना हे ठरवण्याची मुभा दिली की ते कधी आणि कुठुन काम करणार आहेत.

फोटो स्रोत, Science Photo Library
कंपनीनं नुकतंच स्पष्ट केलं की ऑफिसची जागा आणि नव्या कर्मचाऱ्यांच्या ट्रेनिंगवर होणाऱ्या खर्चात तब्बल 20 कोटी पाऊंडांची बचत झाली.
आठवड्यात केवळ 4 दिवस काम करण्याचेही फायदे आहे. ब्रिटनमधील सायन्स रिसर्च फाऊंडेशन 'द वेलकम ट्रस्ट' या वर्षापासून त्याची ट्रायल करणार आहे.
2018मध्ये न्यूझीलंडमध्ये अशी एक ट्रायल झाली होती. ज्यात स्पष्ट झालं की आठवड्यातून कामाचा एक दिवस वजा केला तर कामाच्या गुणवत्तेत कुठलाही फरक पडलेला नाही. उलट कर्मचाऱ्यांवरील तणाव मात्र नक्कीच कमी झाला आहे.
2018 च्या SHRM च्या सर्वेत 12 टक्के लोकांनी आठवड्यातून 4 दिवस काम करण्याची इच्छा व्यक्त केली.
तंदुरूस्त राहा
कॉर्पोरेट वेलनेसमध्ये नेहमीच मेडिटेशन रूम, मसाज किंवा हेअर कटसारख्या सुविधा दिल्या जातात.

फोटो स्रोत, Getty Images
तज्ज्ञांचं म्हणणं आहे की अशा सुविधा कर्मचाऱ्यांना शारीरीकदृष्ट्या तंदुरूस्त ठेवण्यासाठी तितक्या महत्त्वाच्या नसतात.
कार्टराइट यांनी ब्रिटनच्या सरकारी विभागातील कर्मचाऱ्यांसाठी व्यायाम कार्यक्रम, तणावमुक्ती शिबिर आणि संज्ञान चिकित्स यातलं जास्त काय फायदेशीर आहे हे तपासण्यासाठी प्रयोग केला होता.
त्या सांगतात की, "इतर दोन पर्यायांपेक्षा व्यायामानं दीर्घकाळ फायदा होतो."
त्यामुळेच 38 टक्के कंपन्या 'फिटनेस स्पर्धा' का आयोजित करतात, हे समजणं सोपं गेलं.
गेल्या 5 वर्षात कर्मचाऱ्यांच्या स्वास्थ्य योजनांच्या प्रसारातही तब्बल 10 टक्क्यांची वाढ झाली आहे.
अर्थात चांगली प्रकृती म्हणजे केवळ हेल्थकेअर कव्हर होणं नसतं.
उत्तम प्रकृती आनंदाची चावी
कर्मचाऱ्यांना जिम उपलब्ध करून देणाऱ्या कंपन्यांना असं वाटतं की तंदुरुस्तीच कर्मचाऱ्यांच्या आनंदाची चावी आहे.

फोटो स्रोत, Getty Images
गाऊल्डेन सांगतात की, "गेल्या एक दशकापासून कंपन्या कर्मचाऱ्यांचा आनंद आणि त्यांच्या हितामध्ये जास्त रस घेताना दिसतात."
आता त्याकडे मुलभूत सेवा म्हणूनच पाहिलं जात आहे.
कंपन्या जेव्हा काम आणि वैयक्तिक आयुष्य यात बॅलन्स ठेवण्याचा प्रयत्न करतात तेव्हा कर्मचाऱ्यांची प्रकृतीही धडधाकट राहते.
अगदी लहान-लहान उपाययोजना करून हे साध्य करता येऊ शकतं. SHRMच्या आकड्यांनुसार गेल्या 5 वर्षात फिटनेस क्लासेसवर कर्मचाऱ्यांना सबसिडी देण्यात तब्बल तीन पटींनी वाढ झाली आहे.
दिवसभराच्या कामानंतर कर्मचाऱ्यांना व्यायामासाठी वेळ देणंही फायद्याचं ठरू शकतं.
कूपर यांच्या मते कर्मचाऱ्यांना जिमचं सदस्यत्व देणं किंवा आठवड्यातून 2-3 वेळा तिथं जाण्यासाठी प्रोत्साहित करणं हा एक चांगला पर्याय ठरू शकतो.
यामुळे ते केवळ फिट राहतात असं नाही, तर त्यांना कार्यालयातून बाहेर जाण्याची संधीही मिळते.
फिटनेसशिवाय इतर उपायही केले जाऊ शकतात. जसं की वीकेंडला केवळ ई-मेलवरूनच संपर्क साधण्याची मुभा देणंही थकवा कमी करणारं असतं.
त्यामुळे कर्मचाऱ्यांची खुशाली आणि आनंद टिकून राहण्याची शक्यता अधिक आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








