नासाचं यान पोहोचलं सर्वांत दूर : सूर्यमालेच्या निर्मितीची उत्तरं मिळणार?

फोटो स्रोत, Jim Bridenstine / Twitter
- Author, जॉनथन अॅमास
- Role, बीबीसी सायन्स प्रतिनिधी
अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था'नासा'च्या न्यू हॉरायझन्सनं हे यानसूर्यमालेच्या बाहेरच्या भागाजवळून यशस्वीपणे प्रवास करत बर्फाळ पट्टा अल्टिमा टूलजवळ पोहोचलं आहे. या यशानंतर न्यू हॉरायझन्सनं पृथ्वीशी संपर्कही साधला आहे.
हा संपर्क झाला तेव्हा न्यू हॉरायझन्सचं पृथ्वीपासूनचं अंतर 6.5 अब्ज किलोमीटर होतं. त्यामुळे पृथ्वीपासून सर्वाधिक अंतरावर सुरू असलेली ही मोहीम ठरली.
अल्टिमा टूलच्या जवळून प्रवास करत असताना न्यू हॉरायझन्स या रोबोटिक अंतराळ यानानं या भागाची असंख्य छायाचित्रं घेतली तसंच अन्य माहितीही मिळवली. येत्या काही महिन्यात न्यू हॉरायझन्सकडून ही माहिती पृथ्वीवर पाठवली जाईल.
न्यू हॉरायझन्सनं पाठवलेला रेडिओ संदेश स्पेनमधल्या माद्रिद येथील अँटेनाद्वारे टिपण्यात आला. माद्रिद इथला अँटेना नासाच्या सर्वांत मोठ्या अँटेनापैकी एक आहे. अल्टिमा आणि पृथ्वीदरम्यानचं अंतर पार करून हा संदेश पोहोचण्यासाठी तब्बल सहा तास आणि आठ मिनिटं इतका वेळ लागला.
सर्वाधिक अंतराचं 'फ्लायबाय'
न्यू हॉरायझन्सकडून संदेश आल्यानंतर मेरीलँड इथल्या जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटी अप्लाइड फिजिक्स लॅबोरेटरीमधल्या शास्त्रज्ञांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं. टाळ्यांच्या कडकडात त्यांनी हे यश साजरं केलं.

फोटो स्रोत, NASA HQ
"आमचं अंतराळ यान पूर्णपणे सुरक्षित आहे," या मोहिमेच्या व्यवस्थापक अॅलिस बोमन यांनी सांगितले. "आम्ही सर्वाधिक अंतरांचं एक 'फ्लायबाय' नुकतंच पूर्ण केलं आहे," अशी घोषणाही त्यांनी केली.
फ्लायबायचा अर्थ हा एखाद्या बिंदू किंवा स्थानाच्या अगदी जवळून जाणं.
फोटोंमधून उलगडणार अनेक रहस्य
न्यू हॉरायझन्सनं पाठवलेल्या पहिल्या रेडिओ संदेशामध्ये अंतराळयानाच्या आभियांत्रिकी स्थितीबद्दलच माहिती देण्यात आली. अर्थात, यामध्ये यानानं सूचनांप्रमाणे फ्लायबाय दरम्यानची निरीक्षणंही नोंदवली असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय. नोंदवलेली निरीक्षणं आणि फोटो यांमुळे हॉरायझन्सची ऑनबोर्ड मेमरी फुल झाली आहे.
मंगळवारी या अंतराळयानाकडून जे ठराविक फोटो पाठवले जातील, त्यावरून शास्त्रज्ञ आणि सामान्यांनाही न्यू हॉरायझन्सनं आपल्या कॅमेऱ्यात नेमकं काय साठवलं आहे याची झलक पहायला मिळेल.
मात्र हे फोटो घेतानाची वेळ आणि अंतराळयानाची स्थिती या दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. जर यामध्ये कोणतीही गडबड झाली असेल तर मात्र केवळ अंतराळाच्या पोकळीचेच फोटो घेतले गेले असतील. त्यामुळे जोपर्यंत फोटो आणि माहिती हातात येत नाही, तोपर्यंत शास्त्रज्ञांच्या मनात धाकधूक राहणार आहे.

फोटो स्रोत, NASA/JHU-APL/SWR
अगदी जवळून घेण्यात आलेल्या हाय रिझोल्युशन फोटोंसाठी यानाची स्थिती अचूक असणं आवश्यक आहे, असं या प्रकल्पातील शास्त्रज्ञ हाल व्हीवर यांनी म्हटलं. आतापर्यंत आम्ही जे निरीक्षण केलं आहे त्यारून तरी फोटोंसाठी यानाची स्थिती योग्य असल्याचंही दिसून आलं आहे, असं ते म्हणाले.
सूर्यमालेचा कायपर बेल्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भागात अल्टिमाचा समावेश होतो. कायपर बेल्ट हा पट्टा गोठलेल्या द्रव्यांनी बनला आहे. हा पट्टा नेप्च्युन या ग्रहापासून 2 अब्ज किलोमीटर अंतरावर आहे. तर प्लुटोपासून कायपर बेल्टचं अंतर आहे 1.5 अब्ज किलोमीटर.
माहिती हाती येण्यासाठी पहावी लागणार वाट

फोटो स्रोत, NASA, Twitter
कायपर बेल्टमध्ये हजारो अल्टिमा असल्याचा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे. 4.6 अब्ज वर्षांपूर्वी सूर्यमालेची निर्मिती नेमकी कशी झाली असेल, हे स्पष्ट करण्यासाठी या बर्फाळ पट्ट्याचा अभ्यास महत्त्वाचा ठरू शकतो. न्यू हॉरायझन्स आणि पृथ्वीच्या दरम्यानचं अंतर प्रचंड आहे. या अंतराळ यानामध्ये 15 वॅटचे ट्रान्समिटर आहेत. याचाच अर्थ हे अंतर पार करून सर्व माहिती शास्त्रज्ञांच्या हाती पडायला वेळ लागेल.
न्यू हॉरायझन्सवरून पाठवण्यात येणारी माहिती 1 किलोबिट प्रति सेकंद या वेगाने पृथ्वीवर पोहोचणार आहे. याचाच अर्थ यानावरील सर्व माहिती आणि फोटो शास्त्रज्ञांना मिळण्यासाठी सप्टेंबर 2020 उजाडावं लागेल.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
सर्वाधिक रिझोल्युशनचे सुरुवातीचे काही फोटो पृथ्वीवर फेब्रुवारी महिन्यात पोहोचतील. अर्थात, यामुळे संशोधनाच्या गतीवर फरक पडणार नसल्याचं प्रमुख संशोधक अॅलन स्टर्न यांनी स्पष्ट केलं.
अल्टिमाची मुलभूत रचना आणि जडणघडण याबद्दलची माहिती या आठवड्यांत येणाऱ्या कमी रिझोल्युनच्या फोटोंमुळे समजायला मदत होईल. त्याच्याच आधारे आम्ही आमचा पहिला वैज्ञानिक निबंध लिहायला सुरुवात करू, असं अॅलन स्टर्न यांनी म्हटलं.
जेव्हा हे अंतराळयान अल्टिमाच्या जवळून जात होतं, तेव्हा त्यानं एक फोटो काढला होता. या फोटोमध्ये अल्टिमा धूसर, अस्पष्ट दिसत आहे. मात्र या फोटोवरून अल्टिमाचा आकार 35 x 15 किलोमीटर असू शकतो, असा अंदाज शास्त्रज्ञांनी लावला आहे.
कायपर बेल्टचं संशोधन इतकं महत्त्वाचं का?
अल्टिमा टूल आणि ज्या परिघात ते भ्रमण करतं ती जागा शास्त्रज्ञांसाठी कुतूहलाचा विषय आहे.
त्यांतील सर्वांत पहिलं कारण म्हणजे या भागात सूर्याचा प्रकाश प्रचंड मंद असतो. इथलं तापमानही शून्य अंशाच्या खाली 30 ते 40 डिग्रीपर्यंत असतं. याचाच परिणाम म्हणून इथे रासायनिक प्रक्रियांचा वेग अत्यंत कमी किंवा जवळपास थांबलेलाच असतो. याचाच अर्थ असा की अल्टिमा जवळपास त्याची निर्मिती झाल्यापासूनच गोठलेल्या अवस्थेतच आहे.
दुसरं कारण म्हणजे अल्टिमा हे लहान आहे. (30 किलोमीटरच्या परिसरात पसरलेलं) त्यामुळेही निर्मितीपासून आजपर्यंत त्याच्या रचनेत फारसा बदल होण्याची शक्यताही कमी आहे.

फोटो स्रोत, NASA, Twitter
तिसरा महत्त्वाचा भाग म्हणजे इथल्या पर्यावरणाचं स्वरूप. कायपर बेल्टमधलं त्याचं अस्तित्व अतिशय स्थिर आहे. सूर्यमालेच्याअंतर्गत भागात घटकद्रव्यं सतत एकमेकांसोबत धडकत असतात. मात्र कायपर बेल्ट आणि अल्टिमा तुलनेनं स्थिर आहेत.
अॅलन स्टर्न सांगतात, "अल्टिमाची रचना, त्याची भौगोलिक जडणघडण, सुरुवातीला अल्टिमाची झालेली निर्मिती, त्याला उपग्रह आहेत का आणि तिथलं वातावरण याबद्दल आम्हाला जी काही माहिती मिळेल त्याचा उपयोग हा अंतिमतः सूर्यमालेच्या निर्मितीचं कोडं सोडवण्यामध्ये होईल. सूर्यमालेच्या इतर घटकांकडून ही माहिती मिळू शकली नाही कारण त्यांचा आकार मोठा होता, त्यांचं तापमान अधिक होतं किंवा ते विकसित होत होते. अल्टिमा या सर्वांपेक्षा पूर्णपणे वेगळा आहे."
न्यू हॉरायझन्सचा पुढील टप्पा
सर्वांत आधी तर शास्त्रज्ञ न्यू हॉरायझन्सकडून आलेल्या माहितीचं विश्लेषण करायला सुरुवात करतील. पण त्यासोबतच नासाकडून या मोहिमेला मुदतवाढ आणि निधी मिळावा, यासाठीदेखील प्रयत्न करतील.
या मोहिमेच्या माध्यमातून पुढील दहा वर्षांत कायपर बेल्टमधील अन्य एखाद्या गोष्टीबद्दलही संशोधन करता येईल असा शास्त्रज्ञांचा विश्वास आहे.
हे करण्यासाठी न्यू हॉरायझन्सकडे पुरेसा इंधनसाठा असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर हे यान 2030 पर्यंत सुरू ठेवण्यासाठी आवश्यक इलेक्ट्रॉनिक उपकरणांचीही गरज आहे. न्यू हॉरायझन्सच्या प्लुटोनियम बॅटरी दीर्घकाळ टिकली तर सूर्यमालेत परतीचा प्रवासही या यानाला नोंदवता येईल.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता








