ख्रिसमसची अनोखी भेट: मृत्युपूर्वी आजोबांनी चिमुकलीला दिली 14 वर्षांसाठीची गिफ्ट्स

कॅडी विल्यम्स

फोटो स्रोत, OWEN WILLIAMS

ख्रिसमसच्या रात्री सँटा येऊन खूप साऱ्या भेटवतू देतो, ही गोष्ट लहान मुलांना नेहमी सांगितली जाते. पण ब्रिटनमधल्या बॅरी शहरात राहणाऱ्या दोन वर्षांच्या कॅडीच्या आयुष्यात शेजारी राहणाऱ्या आजोबांच्या रुपाने एक खराखुरा सँटा आला आणि तिचा ख्रिसमस अविस्मरणीय करून गेला.

त्यांनी तिला याच नाही तर पुढच्या चौदा वर्षांसाठीचे ख्रिसमस गिफ्ट दिले. मात्र ते मिळाल्यामुळे कॅडीला झालेला आनंद आजोबांना पाहता आला नाही. कारण त्यापूर्वीच या आजोबांनी जगाचा निरोप घेतला.

बॅरीमधल्या व्हेल ऑफ ग्लॅमोर्गनमध्ये राहणाऱ्या ओवेन आणि कॅरोलिन विल्यम्स यांची दोन वर्षांची मुलगी. शेजारीच राहणाऱ्या 80 वर्षीय केन आजोबांना तिचा लळा होता. काही दिवसांपूर्वीच या आजोबांचं निधन झालं.

भावी आयुष्यासाठीही भेटवस्तू

केन आजोबांची गिफ्ट्स

फोटो स्रोत, OWEN WILLIAMS

सोमवारी केन यांची मुलगी विल्यम्स दाम्पत्याच्या घरी आली. आपल्या वडिलांनी कॅडीसाठी आणलेली ख्रिसमस गिफ्टस तिने त्यांना दिले. केन यांनी कॅडीला केवळ या ख्रिसमससाठीच नाही तर पुढच्या चौदा ख्रिसमससाठी भेटी दिल्या होत्या. ओवेन आणि कॅरोलिनसाठीही हे ख्रिसमस प्रेझेंट्स 'सुखद धक्का' होतं.

"केन यांची मुलगी मोठमोठ्या पिशव्या घेऊन दारात उभी राहिली, तेव्हा मला वाटलं की वडिलांच्या घरातला कचरा फेकून द्यायची विनंती करायला ती आली आहे," असं ओवेन विल्यम्सनी म्हटलं.

"पण तिनं सांगितलं की हे सगळं तिच्या बाबांनी कॅडीसाठी ठेवलं आहे. हे त्यांनी तिच्यासाठी आणलेली ख्रिसमस गिफ्ट आहेत."

जगाचा निरोप घेण्यापूर्वी खरेदी केले गिफ्ट

"ती सगळी गिफ्ट पाहून आम्हाला काय बोलावं हेच कळत नव्हतं. किती दिवसांपासून केन यासाठी प्रयत्न करत असतील असा विचार नीटनेटकी पॅक केलेली गिफ्ट बघितल्यावर आला. गेल्या दोन वर्षांपासून ते गिफ्ट खरेदी करत होते की आपलं आयुष्य संपत असल्याची जाणीव झाल्यावर त्यांनी हे सुरु केलं असा प्रश्न आम्हाला पडला होता," ओवेन विल्य़म्स केन यांच्या प्रेमामुळे भावूक झाले होते.

विल्यम्स यांनी सध्या तरी एकच गिफ्ट उघडून पाहिले आहे.

काही वर्षांपासून ओवेन यांच्या शेजारी राहणारे केन हे निवृत्त व्यावसायिक सी डायव्हर होते. ते एकदम 'वल्ली' होते, असं ओवेन सांगतात.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)