'छोट्या मेस्सी'ने तालिबानच्या भीतीने सोडले घर

छोटा मेसी

फोटो स्रोत, AFP / UNICEF

फुटबॉल खेळाडू मेस्सीचा चाहता म्हणून चर्चेत आलेल्या अफगाणिस्तानचा 'छोटा मेस्सी' आणि त्याच्या कुटंबाला पुन्हा एकदा राहत्या घरातून पळ काढावा लागला आहे.

2016मध्ये 7 वर्षांच्या मुर्तजा अहमदीचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यामध्ये त्याने मेस्सीच्या जर्सीसारखी दिसणारी एक प्लास्टिक बॅग टी-शर्ट म्हणून घातली होती.

त्यानंतर कतारमध्ये मुर्तजाला त्याचा हिरो मेस्सीला भेटण्याची संधी मिळाली होती.

मुर्तजा आणि त्याचे आई-वडील हे गजनी प्रांताच्या दक्षिण-पूर्व भागात राहत होते. यावेळी तालिबानने हल्ला केल्यानंतर त्याच्या परिवाराला घर सोडून काबूल गाठावं लागलं होतं.

मुर्तजाने

फोटो स्रोत, UNICEF

फोटो कॅप्शन, 2016 मुर्तजाने मेस्सीच्या जर्सीसारखी दिसणारी एक प्लास्टिक बॅग टी-शर्ट म्हणून घातली होती.

2016ला पाकिस्तानात घेतला होता आश्रय

मुर्तजाच्या कुटुंबीयांचं म्हणणं आहे की त्यांना अफगाणिस्तानातील त्यांचं घर सोडावं लागलं आहे. त्याचं असं मत आहे की त्यांना तालिबानकडून सतत धमक्या येतात.

यापूर्वी 2016मध्ये मुर्तजा प्रकाशझोतात आल्यानंतर तालिबानने धमक्या द्यायला सुरुवात केली. त्यानंतर घर सोडून पाकिस्तानात आश्रय घ्यावा लागला होता.

मुर्तजा

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, 2016मध्ये तालिबानच्या धमक्यानंतर मुर्तजाला घर सोडून पाकिस्तानमध्ये जावं लागलं होतं.

पण, पुरेसे पैसे न उरल्यामुळे त्यांना काही दिवसातच परत मायदेशी परतावं लागलं, अशी माहिती AFP या वृत्तसंस्थेने दिली आहे.

प्लास्टिकच्या त्या जर्सीनं आयुष्य बदललं

मुर्तजा त्यावेळी केवळ 5 वर्षांचा होता. त्याने निळ्या-पांढऱ्या पट्ट्याची प्लास्टिकची पिशवी जर्सी म्हणून घालून फुटबॉल खेळत होता.

तो प्लास्टिकचा टी-शर्ट अर्जेंटीनाच्या नॅशनल फुटबॉल टीमच्या जर्सीसारखा दिसत होता. मेस्सी हा त्या टीमचा कॅप्टन आहे. त्या शर्टवर पुढच्या बाजूने मार्करने 10 नंबर लिहिलं होतं.

मुर्तजा

फोटो स्रोत, AFP

प्लास्टिकचा टी-शर्ट घातलेला मुर्तजाचा तो फोटो बघता-बघता सोशल मीडियावर व्हायरल झाला. मेस्सीने तो फोटो पाहिल्यावर मुर्तजासाठी एक गिफ्ट पाठवलं. त्यामध्ये मेस्सीने सही केलेली 10 नंबरची जर्सी होती.

पुढं मेस्सीला भेटण्याचं मुर्तजाला आमंत्रणही मिळालं. 2016मध्ये मेसी कतारची राजधानी दोहा येथे फुटबॉल मॅच खेळण्यासाठी आला होता.

मुर्तजाने मैदानात जाऊन त्याच्या हिरोची भेट घेतली. ती एक भावनिक क्षण होता.

तालिबानची भीती

जग भलंही मुर्तजाला 'छोटा मेस्सी' या नावाने ओळखत असेल पण या प्रसिद्धीनंतर त्याला अनेक अडचणींना सामोरं जावं लागत आहे, असं त्याच्या कुटुंबाचं म्हणणं आहे.

मुर्तजा

फोटो स्रोत, ARIF AHMADI

"स्थानिक गुंड आम्हाला सारखं बोलावतात. तुम्ही आता श्रीमंत झाला आहात असं म्हणत खंडणीची मागणी करतात. मुलाला पळवून नेण्याची धमकी देतात," असं मुर्तजाची आई शफिका यांनी AFPला सांगितलं.

घरातून पळ काढताना सोबत काहीच घेता आलेलं नाही, असं त्या सांगतात. मध्यरात्री बंदुकींच्या गोळ्यांचा आवाज एकू येताच घरातून पळून जावं लागलं. त्यावेळी मेस्सीने गिफ्ट केलेली जर्सीही घेता आली नाही असं त्या सांगतात.

मुर्तजाचं कुटुंब हे हजारा समुदायाशी निगडित आहे. त्यामुळे ते सुन्नी बहूल तालिबानच्या निशाण्यावर आहेत.

तालिबानच्या भीतीने मुर्तजाला गेल्या 2 वर्षांपासून शाळेला पाठवलेलं नाही, त्याला इतर मुलांसारखं बाहेर खेळायलाही पाठवता येत नाही, असं त्याचा मोठा भाऊ हुमायूने एका वृत्तसंस्थेला सांगितलं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)