अमृतसर : निरंकारी भवनावर बाँबहल्ल्यात 3 ठार, 19 जखमी

पंजाब

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, या स्फोटात 3 ठार झाले तर 19 जखमी आहेत.

पंजाबमध्ये अमृतसरजवळ झालेल्या ग्रेनेड हल्ल्यात तीन जण मृत्युमुखी पडले आहेत तर 19 जण जखमी झाले आहेत.

पंजाब पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमृतसरजवळच्या अडिलवाल येथील निरंकारी भवन येथे हा स्फोट झाला. अमृतसरपासून हे ठिकाण 20 किलोमीटर अंतरावर आहे.

अमृतसरचे डेप्युटी कमिश्नर K. S. संघा यांनी तीन जणांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार या निरंकारी भवनात साप्ताहिक सत्संगाचे आयोजन करण्यात आलं होतं. तेवढ्यात तिथे दोन हल्लेखोर पोहोचले. आधी त्यांनी बाहेर उभ्या एका मुलीला बंदुकीचा धाक दाखवला. त्यानंतर ते भवनाच्या आत गेले आणि व्यासपीठाजवळ जाऊन ग्रेनेड फेकला. या हल्ल्यानंतर परिसरात गोंधळ उडाला. याच दरम्यान हल्लेखोर तिथून पळण्यात यशस्वी झाले.

पंजाबमधील सामाजिक कार्यकर्ते हरजोत सिंग बैनस यांच्यानुसार "हा प्रकार म्हणजे या भागात धार्मिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न आहे".

Twitter

फोटो स्रोत, Twitter

पोलीस सध्या या हल्ल्याचा तपास करत आहेत आणि म्हणाले की या घटनेला सध्याच कट्टरतावादी हल्ला म्हणून घोषित करता येणार नाही. या घटनेनंतर सर्व निरंकारी भवनांतील सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी राज्यातील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला असून त्यांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे तर जखमींवरील सर्व उपचार मोफत केले जाणार आहेत.

कोण आहेत निरंकारी?

संत निरंकारी मिशन एक आध्यात्मिक संस्था आहे. त्यांचं मुख्यालय दिल्लीत आहे.

पण न ते स्वत:ला एक वेगळा असा धर्म असल्याचं मानतात, न सध्या अस्तित्वात असलेल्या कोणत्याच धर्माचा भाग मानतात. ते मानव जातीच्या कल्याणासाठी समर्पित एक आध्यात्मिक चळवळ असल्याचं स्वतःबद्दल सांगतात.

निरंकारी भवनाबाहेर पोलीस ताफा
फोटो कॅप्शन, निरंकारी भवनाबाहेर पोलीस ताफा

या मिशनचा पाया निरंकारी आंदोलनामुळे घातला गेला. त्याची सुरुवात बाबा दयाल सिंग यांनी केली खरी, पण ते फार काळ या आंदोलनाशी निगडित नव्हते.

1929 साली त्यांनी निरंकारी मिशनची स्थापना केली. रुढीवादी शीख समुदायाने त्याचा तीव्र विरोध केला होता.

राज्यात हाय अलर्ट

काही आठवड्यांपूर्वी अशाच स्वरूपाची घटना जालंधरमध्ये घडली होती. तिथे अज्ञात हल्लेखोरांनी पोलीस ठाण्यावर ग्रेनेड हल्ला केला होता.

PTIया वृत्तसंस्थेनुसार गुप्तचर विभागाच्या माहितीवरून पंजाबमध्ये आधीच हाय अलर्ट जारी करण्यात आला होता. पाकिस्तानच्या तान्जिम जैश-ए-मोहंमद या कट्टरतावादी संघटनेच्या 67 जणांना दिल्लीच्या दिशेने जायचं असल्याचा संशय आहे. हे सगळे दिल्लीच्या मार्गावर असताना फिरोझपूर येथे आश्रय घेण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती.

या हल्ल्यामागे सहा आत्मघातकी हल्लेखोर असल्याचा संशय आहे.

पंजाब

फोटो स्रोत, Getty Images

पठाणकोट येथे बंदुकीचा धाक दाखवून टॅक्सी पळवून नेल्यानंतर अलर्टसंदर्भात सूचना देण्यात आल्या होत्या. श्रीनगर इथून चार जणांनी ही टॅक्सी मिळवली. त्यानंतर ड्रायव्हरचं अपहरण करण्यात आलं. ड्रायव्हरने स्थानिकांच्या मदतीने पोलिसांना या घटनेची कल्पना दिली होती.

2016 मध्ये भारतीय लष्कराच्या पठाणकोट येथील तळावर अशाच स्वरूपाचा हल्ला झाला होता.

हे वाचलं का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)