अफगाणिस्तान निवडणूक : आत्मघाती हल्ले, तांत्रिक अडचणींमुळे मतदान लांबलं
अफगाणिस्तानात शनिवारी मतदानाला सुरुवात झाली, पण हिंसक घटना आणि तांत्रिक अडचणींमुळे मतदान रविवारीही घेण्यात येणार आहे. मतदानानंतर निकालांची प्रक्रियाही लांबणार असून आता निकाल 10 नोव्हेंबरला जाहीर होण्याची शक्यता आहे.
संघर्षग्रस्त अफगाणिस्तानातील निवडणुकांकडे जगाचे लक्ष लागून राहिले आहे. तालिबान आणि इस्लामिक स्टेटच्या बंडखोरांनी निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केलं आहे. या निवडणुका म्हणजे बनाव असल्याचा दावा करत या संघटनांनी जणू निवडणुका होऊ न देण्याचा विडा उचलला आहे.
त्यामुळे मतदानाच्या दिवशी देशात विविध ठिकाणी हिंसक घटना घडल्या.

फोटो स्रोत, Getty Images
हिंसक घटना
1. काबूलमध्ये झालेल्या आत्मघाती हल्ल्यात 15 लोक ठार झाल्याची बातमी टोलो न्यूजने दिली आहे.
2. काबूलमध्ये झालेल्या दुसऱ्या एका हल्ल्यात 3 ठार तर 30 जण जखमी झाले आहेत. ही बातमी AFP वृत्तसंस्थेने दिली आहे.
3. काबूलमध्ये वायव्य भागात स्फोटकं निकामी करताना दोन पोलीस अधिकारी जखमी झाल्याची बातमी AP वृत्तसंस्थेने दिली आहे.
4. उत्तरेकडील कंडूज या शहरात झालेल्या स्फोटात 3 लोक ठार तर 50 जण जखमी झाले आहेत.
5. घोर प्रांतात पोलिसांवर हल्ला झाला असून या स्फोटात चार जण ठार झाले आहेत. काही वृत्तांत मृतांची संख्या 11 सांगण्यात आली आहे.
तांत्रिक अडचणी
1. निवडणुकीत मतदारांची पडताळणी करण्यासाठी बायोमेट्रिक्स पद्धती वापरली जात आहे. त्यात अडचणी आल्याने अनेक मतदान केंद्रावर मतदान होऊ शकले नाही. उरुझगान प्रातांत काही लोकांनी बायोमेट्रिक मशीनची मोडतोड केली.

फोटो स्रोत, Getty Images
2. मतदान प्रक्रियेची जबाबदारी शिक्षकांवर सोपवण्यात आली आहे, पण बऱ्याच केंद्रांवर शिक्षक उशिरा पोहोचल्याने मतदान केंद्रं उशिरा सुरू झाली.

निवडणूक आकड्यांमध्ये
1. 250 जागांसाठी 2500 उमेदवार मैदानात आहेत.
2. मतदारांची एकूण संख्या 90 लाख आहे.
3. 7,000 हजार मतदान केंद्रं सुरू करण्यात आली असली तरी सुरक्षेच्या कारणामुळे यांतील 5 हजार मतदान केंद्रावरच मतदान होऊ शकले.
4. मतदान सुरळीत होण्यासाठी 70 हजार सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

निवडणुका का महत्त्वाच्या?
जवळपास सर्व अफगाणी नागरिकांना तालिबान सोबतचे युद्ध संपून चांगलं जीवन, रोजगार आणि शिक्षण मिळावं, असं वाटतं. अफगाणिस्तानच्या मित्र राष्ट्रांनाही इथं लोकशाही बळकट व्हावी. असं वाटतं.
निवडणूक लढवत असलेले अनेक उमेदवार सुशिक्षित आणि तरुण आहेत, संघर्षाने ग्रासलेल्या देशात बदल घडवण्यासाठी ते मदत करू इच्छितात. पण सर्व राजकीय नेते भ्रष्ट आणि असक्षम आहेत, अशी एक भावना मतदारांमध्ये तयार झाल्याचं इथले पत्रकार सांगतात.

फोटो स्रोत, Getty Images
सध्याच्या विधिमंडळीची मुदत 2015ला संपल्यानंतर निवडणूक घेणं आवश्यक होतं. पण 2014ला झालेल्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीतील वादातून सगळ्यांना खीळ बसली आणि देशात गृहयुद्धाला सुरुवात झाली.
कायद्यातील बदलानंतरही अफगाणिस्तानातील खरी सत्ता राष्ट्राध्यक्षांकडेच आहे. राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक 2019ला होत आहे.
हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)









