You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
भारत-पाकिस्तान मैत्रीत भाजपच्या व्होटबँकेचा अडसर - पाकिस्तानी मंत्री
- Author, शुमाइला जाफरी
- Role, बीबीसी प्रतिनिधी
बीबीसीला दिलेल्या एक्सक्लिझिव्ह मुलाखतीत पाकिस्तानचे माहिती मंत्री फवाद चौधरी यांनी भारत-पाकिस्तान संबंधांवर भाष्य केलं आहे.
"पाकिस्तानचे पंतप्रधान आणि लष्कर प्रमुख या दोघांचंही मत असं आहे की, जोवर इथे शांतता प्रस्थापित होत नाही, तोवर कोणत्याही देशाला प्रगती करणं शक्य होणार नाही," असं चौधरी म्हणाले.
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी शपथविधीसाठी तीन भारतीय खेळाडूंना आमंत्रण दिलं होतं. भाषणातही त्यांनी भारतानं एक पाऊल उचललं तर पाकिस्तान दोन पावलं उचलेलं असं पंतप्रधान म्हणाले होते. ते भारताच्या पंतप्रधानांशीही बोलले. मात्र, भारतानं त्यावर काहीच प्रतिक्रिया दिेलेली नसल्याचं चौधरी म्हणाले.
"भारताची अडचण अशी आहे की नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या प्रचाराचा सगळा रोख पाकिस्तान विरोधावर बेतलेला होता. आता पुन्हा निवडणुका आहेत. अशा परिस्थितीमध्ये भाजपला त्यांचा व्होट बँकेची काळजी आहे. पाकिस्तानकडे दोस्तीचा हात पुढे केला तर मतं गमावण्याची त्यांना भीती असू शकते," अस आरोप पाकिस्तानच्या माहिती मंत्र्यांनी लावला आहे.
PTI सरकारचं परराष्ट्र धोरण कसं आहे, या प्रश्नावर फवाद चौधरी म्हणाले, "पूर्वी हे धोरण नवाझ शरीफ आणि जिंदाल आणि मोदी असं होतं. आता ते पाकिस्तान आणि भारत असं थेट आहे."
भारतासह शेजारी राष्ट्रांशी संबंध सुधारण्याबाबत सरकारला लष्कराचा पूर्ण पाठिंबा आहे, असंही चौधरी यांनी म्हंटलं आहे.
या मुद्द्यावर बीबीसीनं भारतीय परराष्ट्र मंत्रालयाशी प्रतिक्रियेसाठी संपर्क केला. पण त्यांच्याकडून कुठलीही प्रतिक्रिया मिळाली नाही.
भारतातून करतारपूरच्या गुरूद्वारा साहेबमध्ये जाऊ इच्छिणाऱ्या शीख भक्तांना परवानगी दिली जाईल, असं पाकिस्तानचे माहिती मंत्री फवाद चौधरी यांनी म्हटलं आहे.
बीबीसीशी बोलताना फवाद चौधरी यांनी सांगितलं की, "करतारपूरची सीमा लवकरच खुली करण्यात येणार आहे. गुरूद्वारामध्ये येजा करण्यासाठी व्हीसाची आवश्यकता नसेल. तिथे जाण्यासाठी रस्ताही तयार करण्यात येईल. दर्शन घेऊ इच्छिणाऱ्यांना तिकिट घेउन जाता येईल. अशाप्रकारची यंत्रणा बनवण्याचा प्रयत्न सुरू आहे."
गुरुद्वारा श्री. करतारपूर साहेब भारतीय सीमेपासून पाकिस्तानात चार किलोमीटर दूर आहे. तिथं दर्शनासाठी रस्ता खुला करण्याची मागणी बऱ्याच काळापासून प्रलंबित आहे.
शीख धर्मियांमध्ये या गुरुद्वाराला विशेष महत्त्व आहे. रावी नदीच्या किनाऱ्यावर असलेला हा गुरूद्वारा डेरा दरबारसाहेब रेल्वे स्टेशनपासून चार किमी अंतरावर आहे.
पंजाबचे मंत्री नवज्योतसिंह सिद्धू पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या शपथविधीला उपस्थित राहिलेले तेव्हाही हा मुद्दा चर्चेत आला होता.
'भारतानंही पावलं उचलावीत'
चंदिगढ येथे या घडामोडीवर प्रतिक्रिया देताना सिद्धू म्हणाले की, "जे लोक यावर राजकारण करत होते आणि हे अशक्य आहे असं म्हणत होते त्यांना उत्तर मिळालं आहे."
"खान साहेबांचे मी आभार मानतो. आता भक्तांना व्हिसाशिवाय करतारपूरला जाता येईल. दोन देशांमधली नात्यांतील दरी यामुळे कमी होण्यास मदत होईल."
फवाद चौधरी म्हणाले की, "गुरुद्वारा करतारपूरसाठी लवकरच मार्ग तयार केला जाईल. इम्रान खान यांचं सरकार भारताबरोबर संवाद साधू इच्छित आहे. शांतता हाच दोन्ही देशांसाठी महत्त्वाचा मुद्दा आहे."
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)