व्हेनेझुएला संकट सीमापार : हल्ले होऊनही व्हेनेझुएलातून अनेक नागरिक ब्राझीलमध्ये

फोटो स्रोत, AFP
व्हेनेझुएला सीमेनजीक ब्राझीलमधील पॅकरायमा शहरात स्थानिक आणि स्थलांतरितांमध्ये संघर्ष पेटला असतानाही व्हेनेझुएलातून ब्राझीलमध्ये स्थलांतर करणाऱ्यांची संख्या वाढतच आहे, असं अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. शनिवारी इथल्या सीमेवरील स्थलांतरितांच्या छावणीवर हल्ला झाल्यानंतरही ही संख्या वाढत आहे.
ब्राझीलच्या लष्कर प्रवक्त्याने रोरारिमा राज्यात 900 स्थलांतरित येण्याची शक्यता व्यक्त केली. ही संख्या फारच जास्त असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
व्हेनेझुएला मोठ्या आर्थिक संकटाला तोंड देत आहे. त्यामुळे तिथले नागरिक इतर देशांत जाऊ लागले आहेत. वाढती महागाई रोखण्यासाठी व्हेनेझुएलात नवं चालन लागू केलं आहे. तर विरोधी पक्षाने मंगळवारी संप आणि आंदोलन जाहीर केलं आहे.
महागाईने पेटलेल्या व्हेनेझुएलातून हजारो लोक शेजारी देशांच्या दिशेने रवाना झाले आहेत. ब्राझील हा व्हेनेझुएलाचा सख्खा शेजारी देश आहे. पण स्थानिकांबरोबर तणाव वाढल्याने वातावरण पेटलं.
शनिवारी सीमेवरच्या पॅकरायमा शहरातील एका हॉटेल मालकाला व्हेनेझुएलाच्या स्थलांतरितांनी मारहाण केल्याची घटना घडली. त्यातून सूड उगवण्यासाठी ब्राझीलच्या स्थानिकांनी दगड आणि काठ्यांसह या स्थलांतरितांच्या छावणीवर हल्ला केला. त्यांचे तंबू बेचिराख केले.
यामुळे हजारहून अधिक स्थलांतरित पुन्हा सीमा ओलांडून व्हेनेझुएलात परतले.
परिस्थिती नियंत्रणांत आणण्यासाठी प्रशासनाने अतिरिक्त पोलीस कुमक पॅकरायमा शहरात तैनात केली आहे.
दरम्यान या घटनेला प्रत्युत्तर म्हणून व्हेनेझुएलामध्येही ब्राझीलच्या काही गाड्यांवर हल्ले झाले.
रविवारी पॅकरइमा शहरात शांतता होती. पण परिस्थिती चिघळू नये म्हणून ब्राझीलचे अध्यक्ष मायकेल तेमर यांनी रविवारी एक आपात्कालीन बैठक बोलावली.
त्यानंतर आमच्या नागरिकांच्या सुरक्षेची काळजी घ्या, असं आवाहन व्हेनेझुएलाने शेजारी देशांना केलं आहे.
पण लोक व्हेनेझुएला सोडून का जात आहेत?
व्हेनेझुएलात सध्या महागाईने भयंकर उच्चांक गाठला आहे. अन्न आणि औषधांचा प्रचंड तुटवडा या देशातल्या नागरिकांना जाणवत आहे.

फोटो स्रोत, AFP
अन्नटंचाई असल्याने असंख्य लोकांची उपासमार होत असल्याचंही निदर्शनास आलं आहे. हे संकट संपुष्टात येण्याची चिन्ह दिसत नसल्याने व्हेनेझुएलाच्या असंख्य नागरिकांनी देश सोडून जाण्याचा निर्णय घेतला आहे.

फोटो स्रोत, Reuters
एकीकडे पायाभूत सोयीसुविधांसाठी नागरिकांचा संघर्ष सुरू असताना व्हेनेझुएलाला राजकीय अस्थिरतेनं ग्रासलं आहे.
सत्ताधारी सोशॅलिस्ट पार्टीची धोरणं देशातली स्थिती ढासळण्यास कारणीभूत असल्याचं विरोधी पक्षांचं म्हणणं आहे. सरकारविरोधी आंदोलनामध्ये गेल्या वर्षी अनेक आंदोलकांनी जीव गमावला होता.
राष्ट्राध्यक्ष निकोलस माड्युरो यांना पदावरून बाजूला करण्याकरता विरोधी पक्षांनी चंग बांधला होता. मात्र तरीही मे महिन्यात झालेल्या निवडणुकीत माड्युरो पुन्हा निवडून आले.
याच महिन्यात माड्युरो लष्कराच्या एका कार्यक्रमात लोकांना संबोधित करताना मंचापासून जवळच दोन ड्रोनचा स्फोट झाला होता. हा आपल्याला ठार करण्याचा विरोधकांचा कट होता, असा आरोप त्यांनी केला होता. मात्र यासाठी कुठलाही पुरावा त्यांनी दिला नाही.
एकंदरच या परिस्थितीमुळे देशातलं वातावरण तापलं आहे.
इक्वेडोरमध्ये काय स्थिती?
व्हेनेझुएलाचे नागरिक ब्राझीलच नव्हे तर इक्वेडोरमध्येही बेकायदेशीररीत्या प्रवेश करू पाहत होते. त्यामुळे इक्वेडोर प्रशासनाने देशात प्रवेशासाठी पासपोर्ट अनिवार्य केला होता. म्हणून शेकडो व्हेनेझुएलन लोकांची कोंडी झाली होती.
पण रविवारी अनेक लोक हे नियम झुगारून सीमा ओलांडायचा प्रयत्न करताना दिसले. दरम्यान, इक्वेडोरने रविवारी स्पष्ट केलं की लहान आणि किशोरवयीन मुलं आपल्या पालकांसमवेत असतील तर पासपोर्टविना सीमा ओलांडू शकतात.

बहुतांश लोक व्हेनेझुएलातून आपल्या कुटुंबांसोबत शेजारील पेरू आणि चिलीच्या वाटेवर दक्षिणेकडे जात आहेत. स्थलांतरितांचे तांडे वाढल्याने पेरूने सीमाप्रवेशासाठीचे नियम कडक केले आहेत आणि 25 ऑगस्टपासून व्हेनेझुएलाच्या लोकांना पासपोर्ट अनिवार्य असेल, असं जाहीर केलं आहे.
कोलंबियाचे राष्ट्राध्यक्ष जुआन मॅन्युअल सँटोस यांनी फेब्रुवारी महिन्यात सीमाप्रवेशासाठी कठोर निर्बंध लागू केले होते.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)










