आधुनिक काळातला देशी कट्टा : काय आहे 3D बंदूक?

फोटो स्रोत, AFP/Getty
घरच्या घरी बंदूक बनवता आली तर? तुम्ही म्हणाल, 'अहो, तुम्हाला देशी कट्ट्याबद्दल ऐकलं नाहीये काय?'
बरोबर आहे तुमचं. पण हे जरा वेगळं प्रकरण आहे.
अमेरिकेत या देशी कट्ट्याप्रमाणेच अद्ययावत बंदूक 3D प्रिंटर तंत्रज्ञानाच्या मदतीने घरच्या घरी बनवणं शक्य झालं आहे. ही प्लास्टिकची बंदूक मेटल डिटेक्टरला चकवू शकते आणि ती कुणीही बनवू शकतं, म्हणून यावर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे.
Defense Distributed या बंदूक समर्थक गटाने एक ऑनलाईन सॉफ्टवेअर तयार केलं आहे, ज्याचा वापर करून एका 3D प्रिंटरमधून सहज प्लास्टिकच्या बंदुकी बनवता येतात. या बंदुकींना कुठलाही रजिस्ट्रेशन कोड नसतो, कुठलाही परवाना लागत नाही किंवा कुणीही कोणत्याही चौकशीविना त्या सहज बाळगू शकतात.
दरवर्षी अमेरिकेत 35,000हून अधिक लोक गोळीबारात आपले प्राण गमावतात. त्यातल्या त्यात अशा बंदुका सहज उपलब्ध झाल्या तर शाळा-कॉलेजांमध्ये वेळोवेळी होणाऱ्या गोळीबाराच्या घटनांमध्ये वाढ होऊ शकते, अशी भीती टीकाकारांनी व्यक्त केली आहे.
म्हणून अमेरिकेच्या डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबिया आणि इतर आठ राज्यांनी डोनाल्ड ट्रंप सरकारला यावर बंदी घालण्यासाठी याचिका दाखल केली आहे.
सध्या अमेरिकेतले जिल्हा न्यायाधीश रॉबर्ट लॅस्निक यांनी या सॉफ्टवेअरला वेबसाईटवरून लगेच काढून टाकण्याचा आदेश Defense Distributed ला दिला आहे.
"अनेक कॉलेजांमध्ये आणि सार्वजनिक ठिकाणी आजकाल 3D प्रिंटर उपलब्ध आहेत. हे सॉफ्टवेअर चुकीच्या हाती लागलं की अनर्थ होईल," अशी भीती न्यायाधीश लॅस्निक यांनी व्यक्त केली.
याप्रकरणी पुढची सुनावणी 10 ऑगस्टला होणार आहे.
काय आहे 3D गन?
3D प्रिंटिंग तंत्रज्ञानाने जगभरात नवनव्या गोष्टी प्लास्टिक आणि काही धातू वितळवून तयार केल्या जात आहेत, जसं की खेळणी, गाड्यांचे पार्ट्स, कृत्रिम मानवी अवयव आणि कुठे तर अख्खी अख्खी घरंसुद्धा.
एका काँप्युटरला 3D प्रिंटर जोडलं की एक विशिष्ट डिझाईननुसार मग हे प्रिंटर प्लास्टिक किंवा धातूचे थरावर थर जमा करतं. हे तंत्रज्ञान सुरुवातीला थोडं खर्चिक आणि वेळखाऊ असलं तरी ते तंतोतंत आणि उत्तम 3D वस्तू आकारास आणू शकतं.

फोटो स्रोत, Getty Images
असाच प्रयोग करून Defense Distributedचे संस्थापक कोडी विल्सन यांनी 2013 साली ही बंदूक जगासमोर आणली होती. लिबरेटर नावाची ही बंदूक अख्खी प्लास्टिकची होती, मात्र तिची फायरिंग पिन धातूची होती. या बंदुकीचा नेम अचूक नव्हता, पण ती तेवढीच घातकी होती. पण तिची एक अडचणही होती - तिच्यात एकावेळी एकच गोळी झाडता येई आणि रिलोड करणं वेळखाऊ आणि कठीण होतं.
काही सुरक्षातज्ञांच्या मते, ती मेटर डिटेक्टरमध्ये दिसत नाही, म्हणून तिला 'घोस्ट गन' असं नावही पडलं. 2013 मध्ये काही इस्रायली पत्रकारांनी अशीच एक बंदूक सुरक्षायंत्रणेला चकवून तिथल्या संसदेत नेली होती.
पण काही समर्थकांचा दावा आहे की या बंदुकीत इतकं धातू नक्कीच असेल जेणेकरून ती एअरपोर्टवर असणाऱ्या सर्वसाधारण मेटल डिटेक्टरमध्ये ओळखता येईल. जर या मेटल डिटेक्टरचा अलार्म वाजला नाही, तर अशा बंदुकींना अमेरिकेत बेकायदेशीर ठरवलं जातं.
आता विल्सन यांनी एक असं सॉफ्टवेअर तयार केलंय, ज्याचा वापर करून 3D प्रिंटरद्वारे बंदुकीचे पार्ट्स अॅल्युमिनियममध्ये सहज प्रिंट केले जाऊ शकतात. यासाठी कुठलाही अनुभव किंवा परवानगीची गरज नसते. फक्त एक काँप्युटर आणि एक 3D प्रिंटर.
आधी हे सॉफ्टवेअर 1 ऑगस्टला रिलीज होणार होतं, पण विल्सन यांनी आपल्या वेबसाईटवर हे गेल्या आठवड्यातच प्रसिद्ध केलं. त्यानंतर शुक्रवार ते रविवारदरम्यान हजारपेक्षा जास्त वेळा हे सॉफ्टवेअर डाऊनलोड करण्यात आलं. या सॉफ्टवेअरमध्ये त्याच AR-15 रायफलीचं ब्लुप्रिंट होतं, जी अमेरिकेत नेहेमी होणाऱ्या गोळीबारांमध्ये सर्वाधिक वापरली जाते.
बंदी का?
2013 साली जेव्हा या लिबरेटर बंदुकीचं पहिलं प्रोटोटाईप आलं, तेव्हा विल्सन यांनी त्या बंदुकीचे ब्लुप्रिंट आपल्या वेबसाईटवर टाकले. परिणामी, शेकडो लोकांनी ते डाऊनलोड करून ही बंदूक बनवण्याचा प्रयत्न केला.
त्याचा धोका लक्षात आणून देत US स्टेट डिपार्टमेंटने हे ब्लुप्रिंट वेबसाईटवरून काढून टाकण्यासाठी कोर्टाकडून तत्काळ आदेश मिळवले. त्यानंतर चार वर्षं कायदेशीर लढाई चालली.

फोटो स्रोत, AFP/Getty
Defense Distributedने Second Amendment Foundation या शस्त्र समर्थन करणाऱ्या संस्थेबरोबर ही लढाई लढली आणि जिंकलीसुद्धा.
अमेरिकेच्या कायदा मंत्रालयाने म्हटलं की लोकांना "या ब्लुप्रिंटची तांत्रिक माहिती जाणण्याचा, त्यावर चर्चा करण्याचा, वापरायचा आणि पुनर्प्रकाशित करण्याचा" हक्क आहे.
या विजयानंतर विल्सन म्हणाले की येणारा काळ हा "डाऊनलोडेबल बंदुकींचा काळ" असेल.
पण टीकाकार शांत बसणार नव्हते.

फोटो स्रोत, AFP / Getty
या 'घोस्ट गन्स'ना परवानगी मिळाली तर अनधिकृत शस्त्र बाजारात आणि समाजात धुमाकूळ घालतील, अशी त्यांना भीती होती. कारण या बंदुकी कुणीही बनवू शकतं, त्यांच्यावर कुठलंही नियमन किंवा नियंत्रण नसेल, असं ते म्हणाले.
आता विल्सन यांचं हे सॉफ्टवेअर रिलीज होण्याच्या पार्श्वभूमीवर ही लढाई अधिक तीव्र झाली आणि अखेर न्यायाधीश रॉबर्ट लॅस्निक यांनी या बंदुकीच्या वर तात्पुरती बंदी आणली आहे.
ट्रंप काय म्हणाले?
राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांनीही याप्रकरणी ट्वीट करून म्हणाले, "मी या 3D प्लास्टिक बंदूक प्रकरणात लक्ष घालतोय. NRA बरोबर आधीच बोललोय, या बंदुकींमध्ये काही अर्थ नाही."
NRA म्हणजेच National Rifle Association ही अमेरिकेतली शस्त्रास्त्रांविषयी काम करणारी प्रमुख संघटना आहे. बंदूक समर्थकांची प्रमुख संस्था म्हणून या संघटनेकडे पाहिलं जातं.
एका व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्यांनुसार कुठलीही बंदूक सध्याच्या कायद्यांच्या चौकटीत बसत नसेल तर ती अवैध असेल. पण लोकांनी स्वतः स्वतःच्या बंदुकी अशा तयार करणं ट्रंप सरकारला मान्य आहे का, यावर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली नाही.

दरम्यान, कोडी विल्सन यांनी या बंदीनंतर आपली बाजू बीबीसीशी बोलताना स्पष्ट केली. "मी आजवर या बंदुकीमुळे कुठलाही गुन्हा घडल्याचं एकलं नाही. आणि जिथवर मला माहिती आहे, फक्त एका माणसाला आजपर्यंत या बंदुकीमुळे अटक झाली आहे, तीसुद्धा जपानमध्ये. कारण काय तर त्याने कुतूहलापोटी ही बंदूक बनवून पाहिली."
हा वाद इतक्यात सुटेल असं काही दिसत नाही. कारण विल्सन यांच्या आधीचं ब्लुप्रिंट शेकडो लोकांनी डाऊनलोड करून आपल्या बंदुकी बनवल्याही असतील. शिवाय, Defense Distributed यांची 'लिबरेटर' बंदूक 'घोस्ट गनर' नावाने ऑनलाईन विक्रीला उपलब्ध आहे.
पण हे प्रकरण नक्कीच 3D प्रिटिंगच नव्हे तर शस्त्रास्त्रांच्या इतिहासात एक नवा मैलाचा दगड ठरणार आहे.
हे नक्की वाचा -
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)









