झिम्बाब्वेत मतमोजणी सुरू, यंदातरी सत्तापालट होणार?

झिम्बाब्वे, मुगाबे

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, रॉबर्ट मुगाबे 37 वर्ष सत्तेत होते.

रॉबर्ट मुगाबे यांच्या 37 वर्षांच्या सत्तेनंतर झिम्बाब्वेत पहिल्यांदाच मतदान झालं. मतदानाचं प्रमाण 75 टक्के आहे. आता येत्या पाच दिवसात निकाल जाहीर होतील.

गेल्या वर्षी मुगाबे यांना राष्ट्राध्यक्षपदावरून दूर व्हावं लागलं होतं. लष्करानं केलेला सत्तापालट असं त्याचं वर्णन मुगाबेंनी केलं होतं.

झिम्बाब्वेत अधिकृत मतदारांची संख्या 5, 635,706 एवढी आहे. देशभरात 10, 985 मतदान केंद्रांवर मतदान झालं. तब्बल 16 वर्षांनंतर युरोपियन युनियन तसंच अमेरिकेच्या निरीक्षकांना झिम्बाब्वेतल्या निवडणुकांची पाहणी करण्याची परवानगी मिळाली.

मुगाबे बाजूला झाल्यानंतर त्यांचे निकटवर्तीय आणि माजी उपराष्ट्रपती इमरसन मंगाग्वा यांना राष्ट्राध्यक्ष होण्याची संधी मिळाली होती.

सत्ताधारी पक्षानं मंगाग्वा यांनाच उमेदवारी दिली आहे. विरोधी पक्ष एमडीसीतर्फे नेल्सन चमीसा रिंगणात आहेत. इथं संसदीय आणि स्थानिक निवडणुका एकाचवेळी होत आहेत.

झिम्बाब्वे, मुगाबे

फोटो स्रोत, AFP

फोटो कॅप्शन, झिम्बाब्वेत मतदानाचा उत्साह पाहायला मिळाला

दरम्यान 94 वर्षीय मुगाबे यांनी पदावरून पायउतार झाल्यानंतर पहिल्यांदाच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. एकेकाळी जवळचे सहकारी असणाऱ्या मंगाग्वा यांच्यावर मुगाबे यांनी टीका केली. मंगाग्वा यांना मत देणार नसल्याचंही त्यांनी सांगितलं होतं.

जुलमी प्रशासनाची सद्दी संपवण्याची संधी झिम्बाब्वेच्या नागरिकांना असल्याचं विदेशी निरीक्षकांचं म्हणणं आहे.

या निवडणुकीत पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या तरुण मतदारांची संख्या अधिक आहे. अधिकृत नोंदणी असणाऱ्या निम्याहून अधिक मतदारांचं वय 35 पेक्षा कमी आहे.

निपक्ष पद्धतीनं निवडणुका होण्यासाठी शेकडो आंतरराष्ट्रीय निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र त्याचवेळी मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे.

मतदान पत्रिकांची सुरक्षा आणि ग्रामीण भागातील मतदारांना धमकावण्याचा मुद्दा विरोधी पक्षांनी मांडला.

याआधीच्या सत्तेनं झिम्बाब्वेसमोर अनेक प्रश्न उभे राहिले. गुंतवणूक, शिक्षण तसंच आरोग्यविषयक सोयीसुविधा याबाबतीत हलाखीची परिस्थिती निर्माण झाली. या काळात बेरोजगारीचा दर 90 टक्के झाल्याचं स्पष्ट झालं आहे.

ओपनियन पोल्सनुसार मंगाग्वा यांच्याकडे निसटती आघाडी आहे.

झिम्बाब्वे, मुगाबे

फोटो स्रोत, AFP

फोटो कॅप्शन, राष्ट्राध्यक्षपदाच्या रिंगणात असलेले चमिसा मतदानासाठी आले तो क्षण

40 वर्षीय चमीसा यांनी हरारेत मतदान केल्यानंतर उपस्थित नागरिकांनी टाळ्यांच्या कडकडाटासह शिट्या वाजवत जल्लोष साजरा केला. विजय आमचाच होणार असं त्यांनी आत्मविश्वासानं सांगितलं.

दुसरीकडे 75 वर्षीय क्वेक्वे या ठिकाणी मतदान केलं. तिथलं वातावरण अगदीच शांत होतं. मतदान केल्यानंतर त्यांनी ट्वीट केलं. झिम्बाब्वेच्या नागरिकांनी विश्वासू, शांतता आणि देशाच्या एकतेसाठी काम करणाऱ्या सहिष्णु सरकारसाठी मतदान केलं आहे, असं मंगाग्वा यांनी म्हटलं आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त