अखेर जीवघेणी कॉस्मॅटिक सर्जरी आपण बायका करतोच का?

कॉस्मॅटिक सर्जरी
    • Author, अनघा पाठक
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

माझं नाक थोड सरळ असतं तर किती छान झालं असतं... माझी मान थोडी लांब असती, माझ्या चेहऱ्यावर सुरकुत्या नसत्या, मी थोडी बारीक असते, मी थोडी गोरी असते, माझ्या अंगावर कमी केस असते, माझ्या पोटऱ्या निमुळत्या असत्या तर... मी लोकांना आवडेल अशी असते तर...

अशी एकही बाई जगात नसेल जिला आरशात पाहिल्यानंतर स्वतःमधली काही कमतरता जाणवत नाही. प्रत्येकीलाच आपल्यात काहीतरी कमतरता जाणवते. आणि का जाणवू नये? आपण कुठे त्या परिपूर्ण सौंदर्याच्या व्याखेत बसतो? जगातली कोणतीही बाई बसत नसावी.

आफ्रिकेत सपाट छाती सुंदर समजली जाते म्हणून लहान मुलींचे स्तन जळत्या लाकडाने दाबतात, तरीही एखादीला असतोच नैसर्गिक उभार. युरोपियन स्त्रिया कंबर लहान आणि स्तन मोठे दिसावेत म्हणून स्वतःला कॉर्सेटमध्ये बांधून ठेवायच्या. कॉर्सेट एक प्रकारचं अंतर्वस्त्र असतं. आता झिरो फिगरसाठी उलट्या होणाऱ्या गोळ्या घेतात. आपण भारतात गोर दिसावं म्हणून कुठली कुठली क्रिम तोंडावर फासतो आणि ब्राझिलमध्ये नितंब गोल आणि मोठे दिसावेत म्हणून सर्जरी करतात.

समाजानं आखून दिलेली सौंदर्याची परिमाणं इतकी विचित्र आहेत तरी आजही जगभरातल्या 'शिकलेल्या' आणि 'स्वतंत्र' बायका त्या मापांमध्ये स्वतःला घट्ट बसवण्यासाठी वाट्टेल ते करायला तयार असतात. अगदी जीव गेला तरी चालेल.

मागच्या आठवड्यात बातमी आली. ब्राझिलच्या एका सेलिब्रेटी कॉस्मॅटिक सर्जननं घरच्या घरी बट (नितंब) इंप्लाटचं इंजेक्शन दिल्यामुळे एका महिलेचा मृत्यू झाला.

लिलियन

फोटो स्रोत, Facebook

फोटो कॅप्शन, लिलियन कॅलिक्स्टो

डेनिस फुर्टाडोचं टोपणनावच बमबम डॉक्टर होतं. त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर फक्त आणि फक्त बायकांच्या नितंबांचे फोटो आहेत. आधी आणि नंतर टाईपचे.

डेनिस ब्राझिलियन टीव्हीवर झळकला आहे आणि इंस्टाग्रामवर त्याचे तब्बल साडे सहा लाख फॉलोअर्स आहेत. त्याच्या याच प्रसिद्धीला भुलून 46 वर्षांची, दोन मुलांची आई असणारी आणि बँकेत काम करणारी लिलियन कॅलिक्स्टो त्याच्याकडे आली होती. आपले नितंब आणखी मोठे करून घ्यायला!

डेनिसपर्यंत पोहचण्यासाठी तिनं आपल्या घरापासून तब्बल 2000 किमीचा प्रवास केला होता आणि हा तिचा अखेरचा प्रवास ठरेल याची तिला पुसटशीही कल्पना नव्हती.

ब्राझिलच्या प्लास्टिक सर्जरी सोसायटीनं नंतर स्पष्ट केलं की डेनिस तज्ज्ञ सर्जन नव्हता आणि ज्या प्रकारचे उपचार त्याने लिलियनवर केले तशा प्रकारचे उपचार घरी करण्याची परवानगी नाही.

ज्या रसायनाचं इंजेक्शन लिलियनच्या नितंबात देण्यात आलं त्याला PMMA म्हणतात. हे रसायन एक प्रकारचं रेझिन आहे जे काचकामात वापरतात आणि ते शरीरासाठी हानिकारक आहे.

पण डेनिसनं मात्र PMMA ची भलामण करणारी पोस्ट लिहिली. त्यानं म्हटलं की याच्या वापराने लगेच फरक पडतो आणि या उपचारानं काही दुखत पण नाही.

म्हणून लिलियन त्याच्याकडे उपचार करायला गेली होती. इंजेक्शन दिल्यानंतर तीन तासातच तिचा मृत्यू झाला.

प्लॅस्टिक सर्जन

फोटो स्रोत, EPA

फोटो कॅप्शन, डेनिस फुर्टाडोचं टोपणनावच बमबम डॉक्टर होतं.

डेनिसला आता अटक झाली आहे. त्याच्यावर जी कायदेशीर कारवाई व्हायची ती होईल न होईल. पण एक बाई, साधं सुंदर आयुष्य असणारी दोन मुलांची आई, जीवानिशी गेली.

का? कशासाठी?

तिला वाटलं तिच्यात काहीतरी कमी आहे. रूढार्थाने ती सुंदर नाही. सेक्सी नाही. कदाचित ती कोणालाच आवडत नाही. सगळ्यांच बायकांना वाटतं तसं. आपल्याकडे नाही का सावळ्या मुलीला जगणं मुश्कील होतं?

अभिनेत्री आणि मॉडल असणाऱ्या केतकी नारायण यांनीही असाच काहीसा अनुभव सांगितला. "मी सावळी आहे आणि ज्यावेळी मी मॉडेलिंग करण्याचा निर्णय घेतला तेव्हा मला माझ्या रंगावरून बोलणारे कमी नव्हते. मी या क्षेत्रात यशस्वी होऊ शकत नाही असं त्यांचं म्हणणं होतं.

असे टोमणे आपल्या प्रत्येकीला ऐकावे लागतात. सामाजिक दडपण असतं की मुलीने असंच दिसावं, तसंच दिसावं. त्यातच मापदंडांमध्ये फिट बसण्यासाठी मुली काहीही करतात. बरं त्यांना घरचेही सपोर्ट करत नाहीत. उलट त्यांचीही अपेक्षा असते की मुलीने सुंदर दिसावं.

या दडपणाचे शारिरीक आणि मानसिक व्रण अनेक जणींना आयुष्यभर वागवावे लागतात. सुदैवाने मला माझ्या आईवडिलांनी पाठिंबा दिला म्हणून मी इथवर पोहचू शकले. नाहीतर अकोल्यासारख्या छोट्या शहरातली मी मॉडेलिंगच्या क्षेत्रात कधीच पुढे येऊ शकले नसते."

पण हा सौंदर्याचा अट्टहास कशासाठी? मुळच्या कोल्हापूरच्या पण सध्या लंडनमध्ये रिसर्चर आणि आर्टिस्ट असणाऱ्या मनाली जगताप बीबीसीशी बोलताना नमूद करतात, "सत्तेचा, अधिकाराचा आणि सौंदर्याचा जवळचा संबंध असतो असं आपल्या मनात ठसवलं आहे. अमुक एक प्रकारे दिसलात तरच तुम्हाला यश मिळेल, तुम्हाला अधिकार मिळतील असं शतकानूशतकं समजलं जातं."

सावळा रंग

फोटो स्रोत, Shibi Sivadas

फोटो कॅप्शन, मॉडेल केतकी नारायणलाही रंगावरून टोमणे ऐकावे लागले.

आणि ज्या रूढार्थाने सौंदर्याच्या व्याख्येत बसत नाहीत त्या कदाचित याला बळी पडतात. कारण त्यांनाच सगळ्यांत जास्त त्रास सहन करावा लागतो. मग आपणही सुंदर झालो तर आपलही कौतूक होईल या आशेपोटी ती काहीही तयार करायला होते.

मनाली यांनी भारत, आखाती देश आणि आफ्रिकेतल्या 'गोरं होण्याच्या अट्टहासाचा' अभ्यासही केला आहे. त्याच्या 'Bleaching Identities' या शोधनिबंधात त्यांनी याची उदाहरणं दिली आहेत. त्यांच्या शोधनिबंधातली काही निरीक्षणं त्यांनी आमच्याशी शेअर केली.

"तुम्ही भारतीय सौंदर्यप्रसाधानांच्या, विशषतः फेअरनेस क्रीमच्या जाहिराती पाहा, त्यातही हाच प्रपोगंडा असतो. ती बाई आधी सावळी असते. मग गोरी होते आणि अचानक तिला ऑफिसमध्ये प्रमोशन मिळतं.

तुमच्या अस्तित्वाचा संबंध तुमच्या दिसण्याशी, त्यातही जे पारंपारिक सौंदर्याचे मापदंड आहेत त्याच्याशी लावला जातो. तुमचं यश, समाजातलं स्थान, तुम्हाला मिळणारे अधिकार त्यावरच ठरतात."

म्हणूनच कदाचित एका विशिष्ट प्रकारे दिसण्यासाठी जीव धोक्यात घालण्याचीही बायकांची तयारी असते.

खरंच असं असतं का?

हो, मुंबईत राहाणारी राणी (नाव बदलंल आहे) तेच सांगते. तिने स्वतः तिच्या नाकाची सर्जरी केली आहे. "माझ्या दिसण्यावरून माझ्यावर अनेक जणांनी ताशेरे ओढले. अगदी माझ्या आईनेही. माझी आई छान दिसते असं सगळे म्हणतात. ती स्वतःची काळजीपण घेते. मी मात्र माझ्या वडिलांसारखी दिसते. पुरुषी!"

प्लॅस्टिक सर्जरी

फोटो स्रोत, Getty Images

राणीला लहानपणापासून न्युनगंड होता. "लोक म्हणायचे माझं नाक भज्यासारखं आहे. मी दिसायला चांगली नाही. मला चांगला जॉब मिळणार नाही, माझं लग्न होणार नाही. तरूणपणी हा दबाव अजून वाढला. शेवटी मी ठरवलं की मला नाकाची सर्जरी करायची.

काहीही झालं तरी मी कॉस्मॅटिक सर्जरी करणारच होते. काही कॉप्लिकेशन्स आले असते तर मी परत केली असती. आता माझं लग्न झालंय, मी एका चांगल्या कंपनीत जॉब करते आणि हे सगळं माझ्या दिसण्यामुळेच झालंय," ती मनापासून सांगते.

अर्थात तिच्या या दिसण्यासाठी तिने फार मोठा धोका पत्कारला आहे.

सेलिब्रिटीजपासून सर्वसामान्यांपर्यंत झिरपलेला ट्रेन्ड

सेलेब्रिटीजवर सुंदर दिसण्याचा प्रचंड दबाव असतो. आजकालच्या सोशल मीडियाच्या काळात तर जास्तच. रोज कोणत्या ना कोणत्या अभिनेत्रीनं कॉस्मॅटिक सर्जरी केल्याची बातमी येते. मग अशा सेलिब्रिटीजला आदर्श मानणाऱ्या तरुणींनी स्वतः अशा सर्जरीला प्राधान्य दिलं नाही तर नवलंच.

सेलिब्रिटीच्या फसलेल्या सर्जरीच्याही बातम्याही येतात. त्याने जीवाला धोका आहे हेही ओरडून ओरडून सांगितलं जातं, पण त्याकडे कोणी लक्ष देत नाही.

श्रीदेवींच्या मृत्यूनंतरदेखील कॉस्मॅटिक सर्जरी आणि वय वाढलं तरी तरूण दिसण्याचा बायकांवर असणारा दबाव याविषयी चर्चा झाली होती.

प्लॅस्टिक सर्जरी

फोटो स्रोत, Getty Images

दाक्षिणात्य अभिनेत्री अमला यांनीही आपलं मत मांडलं. "अनेक प्रोफेशनल आणि सोशल ग्रुपमध्ये महिला कशी दिसते याला प्रचंड महत्त्व दिलं जातं हे मी अनुभवलं आहे.

आर्थिकदृष्ट्या मागास वर्गातील महिलांना आपण सुंदर दिसावं अशी मनापासून इच्छा असते. त्यासाठी त्या खूप प्रत्न करतात. ठराविक सौंदर्याच्या व्याखेत बसणाऱ्या व्यक्तींचा त्यांच्यावर नेहमी प्रभाव असतो," असंही त्या सांगतात.

यूकेमध्ये झालेल्या एका सर्व्हेनुसार कॉस्मॅटिक सर्जरी करणाऱ्या व्यक्तीपैकी 85 टक्के बायका आहेत.

कॉस्मॅटिक सर्जरी करण्यातले धोके

आपण अजून आकर्षक दिसावं म्हणून वजन कमी करण्याची सर्जरी करण्याकडेही अनेकांचा कल असतो. याकडे लक्ष वेधताना दिल्लीतल्या मॅक्स इंस्टिट्यूटमधले बॅरिअॅट्रिक सर्जन प्रदीप चौबे म्हणतात, "वजन कमी करायची सर्जरी फक्त तेव्हाच करायची असते जेव्हा पेंशटच्या जीवाला वाढलेल्या वजनामुळे धोका असतो."

विचार न करता कॉस्मॅटिक सर्जरी केली तर कोणते धोके उद्भवू शकतात?

  • ब्रेस्ट इंप्लांटची किंवा फेसलिफ्ट सर्जरी केल्यानंतर सगळ्यांत जास्त दिसून येणारी समस्या म्हणजे रक्ताच्या गुठळ्या होणं. वेळीच उपचार नाही झाला तर याने अपंगत्वही येऊ शकतं.
  • कॉस्मॅटिक सर्जरीमुळे मज्जातंतूंना इजा होऊ शकते. खरंतर असं कोणत्याही सर्जरीमध्ये होऊ शकतं, पण इतरवेळेस हा धोका पत्कारणं गरजेचं असतं कारण त्यामुळे रुग्णाचा जीव वाचणार असतो. कॉस्मॅटिक सर्जरीमधे मात्र सुखाचा जीव दुःखात घालायचीच वेळ येते.
  • अशा प्रकारच्या सर्जरीमधून समोर आलेला सगळ्यांत मोठा धोका म्हणजे इन्फेक्शन. कधी कधी हे इन्फेक्शन लवकर दिसून येत नाही आणि जीवघेणं ठरू शकतं.
  • लायपोसक्शन म्हणजेच फॅट शोषून घ्यायच्या सर्जरीमध्ये आतड्यांना आणि जठराला जोडणाऱ्या ट्रॅकला भोक पडू शकतं जे फार घातक आहे. अंतर्गत अवयवांमध्ये यामुळे रक्तस्राव होऊ शकतो.
  • अशाप्रकारच्या सर्जरीमध्ये जो अनेस्थेशिया देतात त्यामुळे अर्धांगवायूचा झटका, हार्ट अॅटॅक किंवा मेंदूत स्ट्रोक येऊ शकतो.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)