World Parkinsons Awareness Day : या बाई फक्त शरीराचा वास घेऊन पार्किनसन्सचं निदान करतात

पाक्रिसन्स
    • Author, एलिझाबेथ क्विगले
    • Role, बीबीसी प्रतिनिधी, स्कॉटलंड

ऑस्ट्रेलियाच्या पर्थ शहरातल्या एका महिलेकडे एक अनोखा गुण आहे. त्या फक्त वासाच्या सहाय्यानं पार्किनसन्स (कंपवात) झाला की नाही हे ओळखू शकतात. जोय मिलने यांच्या पतीचा याच आजारानं मागच्या वर्षी जूनमध्ये मृत्यू झाला. ते 65 वर्षांचे होते.

ते भूलतज्ज्ञ होते. त्यांना 45 व्या वर्षी या आजाराचं निदान झालं होतं.

यूके मध्ये 500 पैकी एका जणाला हा आजार होतो. म्हणजे ब्रिटनमध्ये 1,27,000 लोकांना हा आजार आहे.

या आजारामुळे लोकांना बोलायला, चालायला, आणि झोपायला त्रास होतो. हा आजार बरा होऊ शकत नाही आणि या आजाराचं निदान करण्यासाठी कोणतीही चाचणी नाही.

या आजाराचं निदान होण्याच्या सहा वर्षांआधीच नवऱ्यात काही बदल झाल्याचं जोय यांना जाणवलं होतं.

त्या सांगतात, "त्याच्या अंगाला येणारा वास बदलला. या वासाचं वर्णन करणं कठीण आहे. हे अचानक नव्हतं. पण हा बदल अतिशय सुक्ष्म होता, तो वास कस्तुरीसारखा होता."

"मला अनेकदा हा वास यायचा," त्या पुढे सांगत होत्या.

आशेचा किरण

चॅरिटी पार्किनसन्स यूके नावाच्या एका स्वयंसेवी संस्थेत काम करताना जोय यांना इतर पार्किनसन्सच्या रुग्णांचासुद्धा असाच वास यायचा. तेव्हा त्यांना हे लक्षात आलं. त्यांनी ही गोष्ट वैज्ञानिकांना सांगितली. त्यांचीसुद्धा उत्सुकता वाढली.

एडिनबर्ग विद्यापीठानं जोय यांची चाचणी घेण्याचा निर्णय घेतला. या चाचणीत त्या यशस्वी झाल्या.

एडिनबर्ग विद्यापीठातल्या स्कूल ऑफ बायलॉजिकल सायन्सचे पार्किनसन्स विभागातले फेलो डॉ. टिलो कुना यांच्याशी जोय पहिल्यांदा बोलल्या.

डॉक्टर
फोटो कॅप्शन, डॉक्टरांनी जोय यांचीच परीक्षा घेतली आणि त्या यशस्वी ठरल्या.

कुना म्हणतात, "पहिल्यांदा जेव्हा आम्ही जोय यांची चाचणी घेतली, तेव्हा सहा लोक पार्किनसन्स झालेले आणि पार्किनसन्स न झालेले होते."

"आम्ही त्यांना एक टीशर्ट दिवसभर घालायला दिला. नंतर आम्ही ते टी शर्ट गोळा केले, आणि त्यांना कोड दिले."

"कोणाला पार्किनसन्स झाला आणि नाही हे सांगणं त्यांचं काम होतं."

"12 पैकी 11 लोकांचं त्यांनी योग्य निदान केलं. आम्ही ते बघून फारच प्रभावित झालो."

डॉ.कुना म्हणाले, "सहा लोकांना पार्किनसन्स झाल्याचं त्यांनी निदान केलं खरं पण आणखी एका व्यक्तीला हा आजार झाला आहे असं त्यांचं म्हणणं होतं"

ही व्यक्ती आमच्या कंट्रोल ग्रुपमध्ये होती. (कंट्रोल ग्रुप म्हणजे असा एक रुग्ण ज्याची संशोधक चाचणी घेत होते आणि त्यांच्या मते त्या व्यक्तीला हा आजार नव्हता.) वैज्ञानिकांच्या मते आणि त्या व्यक्तीच्या मते त्याला हा आजार नव्हता.

डॉ कुना
फोटो कॅप्शन, डॉ. कुना हे जोय यांच्या कौशल्यामुळे खूष झाले आहेत.

पण आठ महिन्यानंतर त्यानं आम्हाला पार्किनसन्स झाल्याचं सांगितलं. याचाच अर्थ जोय यांचा 11 नव्हे तर 12 लोकांबद्दल अंदाज खरा ठरला.

"या घटनेमुळे मग आम्ही फारच इंप्रेस झालो आणि या संकल्पनेच्या खोलात शिरायला आम्ही सुरुवात केली," डॉ. कुना सांगतात.

वैज्ञानिक आज नेमकं हेच करत आहेत. पार्किनसन्सच्या सुरुवातीच्या काळात त्वचेवर एक प्रकारचा गंध तयार होतो असं वैज्ञानिकांचं मत आहे.

वैज्ञानिक आता हा गंध निर्माण करणाऱ्या एका मॉलिक्युलर सिग्नेचरच्या शोधात आहेत. या चाचणीदरम्यान ते कपाळावर एक स्वॅब (निर्जंतूकीकरण केलेला कापसाचा बोळा) पुसून काढतात. नंतर त्यावर संशोधन करतात.

चॅरिटी पार्किनसन्स यूके आता मँचेस्टर, एडिनबर्ग आणि लंडनमधल्या संशोधकांना यासाठी निधी पुरवत आहेत. संशोधक सध्या पार्किनसन्स असणाऱ्या आणि नसणाऱ्या 200 लोकांची चाचणी घेणार आहेत.

मोठ्या बदलाची नांदी

"हे संशोधन या रुग्णांसाठी एका मोठ्या बदलाची नांदी असेल," असं कॅथरिन क्रॉफर्ड म्हणाल्या.

कॅथरिन या चॅरिटी पार्किनसन्स यूकेच्या संचालक आहेत. या आजाराचं निदान करणं अतिशय कठीण असतं असंही त्या म्हणाल्या.

कॅथरिन क्रॉफर्ड
फोटो कॅप्शन, कॅथरिन क्रॉफर्ड यांच्यामते पार्किनसन्सचं निदान करणं अत्यंत कठीण आहे.

"डॉ. जेम्स पार्किनसन्स यांनी 1817 पासून ज्या पद्धतीनं या आजाराचं निदान केलं त्याचप्रकारे आजही निदान केलं जातं. रुग्णाच्या हालचाली बघून या आजाराचं निदान केलं जातं. पण या गंधाच्या चाचणीमुळे हे सगळं टाळता येऊ शकतं आणि या आजाराचं निदान सोपं होऊ शकतं," क्रॉफर्ड पुढे सांगत होत्या.

जोय आणि त्यांचे सहकारी या आजाराच्या निदानाचे योग्य कार्यक्रम राबवू शकतात, या आजाराची तीव्रता कशी वाढते किंवा कमी होते हे तपासू शकतात. त्यामुळे उपचारपद्धतीत सुधारणा होऊ शकेल आणि रुग्णांना देखील या संशोधनात सहभागी होण्याची संधी मिळेल असंही त्या म्हणाल्या.

हा शोध अपघाती असला तरी जोय यांना आशा वाटते की ज्यांना पार्किनसन्स झाला त्यांच्यासाठी हे संशोधन आशेचा किरण ठरेल.

हेही पाहिलंत का?

व्हीडिओ कॅप्शन, पाहा व्हीडिओ - पार्किंनसन्स या आजाराविषयी तुम्हाला माहिती आहे का?
YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)