रमजानमध्ये रोजा करणारे पाकिस्तानातले हिंदू

दर्ग्यात इफ्तारची तयारी सुरू असताना
फोटो कॅप्शन, दर्ग्यात इफ्तारची तयारी सुरू असताना.
    • Author, रियाज सोहैल
    • Role, मठ्ठी (पाकिस्तान), बीबीसी उर्दुसाठी

मोहनलाल मालही यांची लहानपणापासून कासीम शाह दर्गावर श्रद्धा आहे.मकाकांच्या निधनानंतर आता त्यांच्यावर या दर्ग्याच्या देखभालीची जबाबदारी आली आहे.

पाकिस्तानच्या थार वाळवंटातल्या मठ्ठी शहराच्या मध्यवस्तीमध्येच हा दर्गा आहे. रमजानच्या महिन्यात या दर्ग्यात रोजेदारांकरिता इफ्तारची सोय केली जाते.

दर्ग्याच्या आताच स्वयंपाकघर आहे. इथं हिंदूमधल्या मालही समाजाचे तरुण स्वतः बटाटे आणि हरभऱ्याची व्हेज बिर्याणी तयार करतात. मोहनलाल मालही हे स्वतः संपूर्ण रमजान महिन्यात रोजे ठेवतात.

तर त्यांच्या कुटुंबातले इतर सदस्य हजरत अली यांच्या बलिदानाच्यादिवशी म्हणजेच 21व्या आणि 27व्या दिवशी रोजा ठेवतात.

मोहनलाल यांनी तिसरीत असतानाच रोजे ठेवायला सुरुवात केली होती.

मालही समाजातले लोक कधीकाळी विहिरीतलं पाणी घड्यांमध्ये भरून मठ्ठी शहरातल्या लोकांपर्यंत पोहोचवत होते.

नंतर हळूहळू शहर विकसीत होत गेलं, आता त्यांच्या विहीरी शहराच्या मध्यभागी आल्या आणि त्यांच्या मालमत्तांच्या किंमतीही वाढल्या. कालांतराने हा समाज व्यापारीसुद्धा झाला.

इथला मालही समाज आनंदी

मठ्ठीच्या या दर्ग्याच्या जागी 30-35 वर्षांपूर्वी एक झाड आणि त्याखाली एक कबर होती. या कबरीवर येणाऱ्या श्रद्धाळूंचा नवस पूर्ण व्हायचा आणि ते मोठ्याप्रमाणावर इथं दानधर्म करून निघून जायचे असा दावा करण्यात येतो.

मठ्ठीच्या या दर्ग्याच्या जागी 30-35 वर्षांपूर्वी एक झाड आणि त्याखाली एक कबर होती.
फोटो कॅप्शन, मठ्ठीच्या या दर्ग्याच्या जागी 30-35 वर्षांपूर्वी एक झाड आणि त्याखाली एक कबर होती.

मोहनलाल म्हणतात, "त्याकाळात आमच्या समाजाकडे फार काही नव्हतं. पाच पैशांचं दानसुद्धा आम्ही देत होतो. आता आमचा समाज आनंदी आणि सुस्थितीत आल्यानं दानधर्मात कुठलीच कसर आम्ही ठेवत नाही. कोणी तांदूळ पाठवून देतं. कोणी पाण्याचा टँकर पाठवतं तर कोणी बर्फाचा बंदोबस्त करतं."

संध्याकाळपासूनच लहान मुलं या दर्ग्याच्या आजूबाजूला जमा व्हायला सुरू होतात आणि रात्री नऊ-दहा वाजेपर्यंत निर्भयपणे तिथंच थांबतात.

मोहनलाल यांच्या म्हणण्यानुसार कासीम शाह यांना लहान मुलं फार आवडायची. त्यामुळे त्याच परंपरेला इथं सुरू ठेवण्यात आलं आहे.

पारंपरिक साडी, घागरा-चोळी घातलेल्या महिला पण या कबरीवर येतात. इफ्तारच्या वेळेपर्यंत त्या तिथं हजर असतात.

थार परिसरातले हिंदू आणि मुस्लीम दोघंही ईदचा सण आनंदानं साजरा करतात आणि मोहर्रमच्या शोकसाठीसुद्धा एकत्र येतात. याचपद्धतीनं दिवाळी आणि होळी हे सणही हिंदू-मुस्लीम मोठ्या उत्साहात एकत्र साजरे करतात.

इथं धर्माच्या नावावर कुठलाच भेदभाव केला जात नसल्याचं मोहनलाल सांगतात.

ते म्हणतात, आई-वडिलांनी एक शिकवलं होतं. हा तुझा मामा आहे, हा तुझा काका आहे... हा मुस्लीम आहे किंवा हा हिंदू आहे किंवा ख्रिश्चन आहे असं कधी आम्हाला शिकवलं गेलं नाही. ती एक प्रेमाची शिकवण होती. आजही आम्ही सगळे बंधूभावानं इथं एकत्र राहतो.

थारमध्ये वादाला थारा नाही

स्थानिक लोकांच्या मदतीनं दर्ग्यात लंगर चालवला जातो. रमजानमध्ये मुस्लीम आणि हिंदू त्यांच्या घरच्या भाज्या, फळं आणि इतर वस्तू पाठवून देतात.

धारूमल हे लोकांना इफ्तार सोडण्यासाठी मदत करतात.
फोटो कॅप्शन, धारूमल हे लोकांना इफ्तारीसाठी मदत करतात.

दर्ग्याचं दैनंदिन काम पाहणारे धारूमल हे लोकांना जेऊ घालतात.

धारूमल मालही म्हणतात, "इथं हिंदू-मुस्लीम वादाला थारा दिला जात नाही. इथं मुस्लीम पण भाऊ आहे आणि हिंदू पण भाऊ आहे. इथं एकच नाव चालतं, आमचे गुरू कासीम शाह मुस्लीम आहेत. जेव्हा आम्ही त्यांना मानतो तर त्यांच्या धर्माच्या लोकांना का म्हणून मानायचं नाही."

मठ्ठी शहरात जवळपास डझनभर मुस्लीम दर्गा आहेत आणि त्यांची देखभाल हे हिंदू धर्माचे लोकच करतात.

बकरी ईदच्या दिवशी मुस्लीम हे हिंदू बांधवांच्या भावनांचा आदर करत त्यादिवशी गाईची कुर्बानी देत नाहीत.

काही कट्टरवादी संघटनांनी गाय कापण्याचा प्रयत्न केला होता. पण स्थानिक मुस्लिमांनीच हा प्रयत्न हाणून पाडला.

शहरात आजही गोमांसाची विक्री केली जात नाही.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)