सीरिया रासायनिक हल्ला : सायनाईडपेक्षा 20 पट घातक रसायनाचा वापर?

फोटो स्रोत, HAMZA AL-AJWEH/AFP/Getty Images
सीरियातील डोमा शहरात 8 एप्रिलला रासायनिक हल्ला झाला. यात मृतांची संख्या 70 इतकी झाली असल्याचं सांगितलं जात आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता असल्याचं अमेरिकेनं म्हटलं आहे. पण रासायनिक हल्ल्यात वापरण्यात आलेल रसायन कोणत होतं? ते किती विषारी असतं? ही रासायनिक शस्र बनवण्यासाठी सीरियाला मदत कोण करतं?
1. हल्ला कसा झाला?
डोमा शहरात झालेल्या या हल्ल्याबद्दल विरोधकांच्या गुटा मीडिया सेंटरने म्हटले आहे की हेलिकॉप्टरमधून हा बॅरल बाँब टाकण्यात आला.

फोटो स्रोत, Getty Images
यात 70 लोक गुदरमले आणि अनेकांवर त्याचा परिणाम झाल्याचे या सेंटरने म्हटले आहे. सध्या बंडखोरांच्या डोमा हे एकच शहर आहे.
2. आरोप-प्रत्यारोप
अमेरिकेच्या विदेश मंत्रालयाने म्हटलं आहे की यापूर्वीही इथल्या सरकारने स्वतःच्या नागरिकांच्या विरोधात रासायनिक हत्यारे वापरली आहेत, याबद्दल कोणतंच दूमत असू शकत नाही. रशिया हे सीरिया सरकारच्या बाजूने असल्याने या हल्ल्यासाठी रशियाला जबाबदार धरलं पाहिजे.
सीरियातील अनेक नागरिकांवर केलेल्या क्रूर रासायनिक हल्ल्यांची जबाबदारी रशियाला घ्यावी लागेल, असं अमेरिकेनं म्हटलं आहे. तर सीरिया सरकारने ही बातमी पूर्ण खोटी असल्याचं म्हटलं आहे.
2. कोणत्या रसायनांचा वापर?
गुटा मीडिया सेंटरने दिलेल्या माहितीनुसार या हल्ल्यासाठी सेरेन या रसायनाचा वापर करण्यात आला आहे. सेरेन नर्व्ह एजंट म्हणून काम करते. नर्व्ह एजंट प्रकारातील रसायनांचा परिणाम हा मज्जा संस्थेवर होत असतो.

फोटो स्रोत, HAMZA AL-AJWEH/AFP/Getty Images
रविवारच्या हल्ल्यात प्रभावित झालेल्या नागरिकांना फीट येणे, तोंडातून फेस येणे अशी लक्षणं दिसत आहेत. ही लक्षणं नर्व्ह एजंट आणि क्लोरिन गॅसच्या संपर्कात आल्याने दिसून येतात.
3. सेरेन आहे तरी काय?
सेरेन अत्यंत घातक रसायन मानलं जातं. सायनाईडपेक्षा 20 पट अधिक विषारी असणारं हे रसायन आहे. सेरेन अॅसेटीलकोलिनस्टेरिज या एन्झाइमवर परिणाम करते. त्यामुळे मज्जा संस्थेतील काही सिग्नलस थांबून मज्जा संस्थेतील पेशी नष्ट होऊ लागतात. त्यातून हृदय आणि श्वसनसंस्थेतील स्नायू जखडले जातात. हे रसायन पुरेशा प्रमाणात संपर्कात आलं तर काही मिनिटांत मृत्यू होऊ शकतो.
4. मृतांचा आकडा किती?
अमेरिकेतील सेवाभावी संस्था युनियन ऑफ मेडिकल रीलिफ सेंटरने बीबीसीला सांगितले की दमास्कस रुरल हॉस्पिटलने 70 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती दिली आहे. एका प्रवक्त्याने सांगितले की मृतांची संख्या 180पर्यंत असण्याची शक्यता आहे.
5. यापूर्वीचे रासायनिक हल्ले
ऑगस्ट 2013मध्ये पूर्व गुटावर रॉकेटने हल्ला करण्यात आला होता. या रॉकेटमध्ये सेरेन होते. या हल्ल्यात अनेकांचा बळी गेला होता. संयुक्त राष्ट्रांनी या हल्ल्यात सेरेनचा वापर झाल्याचं म्हटलं होतं. पण हल्ला कुणी केलं हे स्पष्ट केलं नव्हतं. पश्चिमी राष्ट्रांनी हा हल्ला करण्याची क्षमता फक्त सीरियाच्या सरकारी फौजांकडेच असल्याचं म्हटलं होतं.

फोटो स्रोत, Reuters
एप्रिल 2017मध्ये खान शैखून या शहरावर झालेल्या सेरेनच्या हल्ल्यात 80 लोक ठार झाले होते. संयुक्त राष्ट्रे आणि ऑर्गनायझेशन फॉर द प्रोहिबिशन ऑफ केमिकल वीपन्स यांनी केलेल्या संयुक्त चौकशीत या हल्ल्यासाठी सीरियाला जबाबदार धरण्यात आलं होतं.
6. उत्तर कोरियाची मदत?
यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात आलेल्या वृत्तांनुसार संयुक्त राष्ट्रांनी म्हटलं होतं की सीरियाला उत्तर कोरियातून काही वस्तू पाठवण्यात येतात, त्यांचा वापर रासायनिक शस्त्रांच्या निर्मितीसाठी होऊ शकतो. 2012 ते 2017 या काळात 40 शिपमेंट सीरियात आली होती, त्यात व्हॉल्व, पाईप आणि अॅसिड रोधक टाईल्स यांचा समावेश होता.
लीक झालेल्या या अहवालात उत्तर कोरियातील क्षेपणास्त्र तज्ज्ञ सीरियात शस्त्रनिर्मिती केंद्रांनजीक दिसले होते असं म्हटलं आहे. सीरियाच्यावतीने क्लोरिन वायूचा वापर केला जात असल्याचेही अहवाल आले होते. पण हे आरोप सीरियाने नाकारले होते.
हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








