अख्खं जग एकटी फिरणारी ही आजी गाजवतेय चीनचा सोशल मीडिया!

फोटो स्रोत, PEAR VIDEO
- Author, केरी एलन
- Role, बीबीसी मॉनिटरिंगसाठी
चीनमधले आजी-आजोबा नोकरीनंतर नातवंडांमध्ये रमणं पसंत करतात. पण पिअर व्हीडिओ या वेबसाईटच्या व्हीडिओमधल्या एक 73 वर्षांच्या चायनीज आजी मात्र अपवाद आहेत. या आजी सोशल मीडियावर सध्या 'व्हायरल' झाल्यात.
या आजींचं नाव 'छिई' असं आहे. नातवंडांमध्ये रमण्याच्या काळात या आजी पाठीवर बॅग घेऊन जग हिंडायला निघाल्यात. त्यांचा व्हीडिओ सध्या चीनच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाला आहे.
म्हातारपणात मुलाच्या घरी राहण्याची परंपरा चीनमध्ये आहे. पण आजींच्या या वेगळ्या विचारांचं सोशल मीडियावर कौतुक होतंय आणि चर्चाही होत आहे.
पिअर व्हीडिओ या वेबसाईटशी बोलताना छिई आजी सांगतात, "आम्ही म्हाताऱ्या लोकांनी का म्हणून मुलाच्या घरचं काम करत राहायचं आणि नातवंडं सांभाळण्यात आयुष्य घालवायचं? आम्हालाही आमचं वेगळं आयुष्य आहे."
आठवणींची डायरी...
आयुष्यभर खूप प्रवास केला आहे. आतापर्यंत युरोप, अमेरिका, अशियातील देशांचा दौरा केला आहे, असं या व्हीडिओमध्ये छिई आजी यांनी सांगितलं. यावेळी चीनमधल्या चुआनजोऊ या ठिकाणी आजी फिरायला जात असताना पिअर व्हीडिओनेही त्यांच्या प्रवासाचा मागोवा घेतला.
त्या बहुतेकदा छोट्याशा धर्मशाळेत किंवा वसतीगृहात राहणं पसंत करतात. पैसे वाचवण्यासाठी विद्यार्थ्यांबरोबर प्रवास करतात, असं त्या व्हीडिओमध्ये सांगतात.

फोटो स्रोत, PEAR VIDEO
तरुणांशी बोलणं, त्यांच्याबरोबर राहणं हा आजींच्या प्रवासातला महत्त्वाचा भाग असतो. "त्यांच्याशी (तरुणांशी) गप्पा मारल्यावर नवीन गोष्टी शिकायला मिळतत," असं आजी सांगतात.
आजी आपल्या 92 वर्षांच्या आईला दररोज न चुकता व्हीडिओ कॉल करून दिवसभरातील घडामोडी सांगतात. एवढंच नव्हे तर नातवंडांसाठी सोशल मीडियावर प्रवासादरम्यानचे फोटो, व्हीडिओ शेअर करतात.
"माझं सोशल मीडियावर पब्लिक अकाउंट आहे. 5 महिन्यांपूर्वी ते उघडलं आहे. माझ्या आठवणी, प्रवासातील प्रेरणादायी घटना असं सर्व काही मी सोशल मीडियावर टाकते. माझ्या मुलांसाठी आणि नातवंडासांठी त्या माझ्या आठवणी असणार आहेत."

फोटो स्रोत, PEAR VIDEO
मिआओपाई वेबसाईटवरील 3 मिनिटांचा आजींचा व्हीडीओ 1.1 कोटी लोकांनी पाहिला आहे. हजारो लोक चीनच्या सिना वैईबो सहीत इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून आजींचं कौतुक झालंय.
"एकट्यानं आणि आनंदी जगणाऱ्या या आजींचं वय म्हणजे फक्त संख्या आहे," असं एका व्यक्तीनं कमेंट केली आहे. त्यांच्या या धडाडीच्या आणि उत्साही स्वभावातून चीनमधल्या खूप लोकांना प्रेरणा मिळाली आहे असं, सोशल मीडियावरील प्रतिक्रियांत लिहिलं जात आहे.
"चिनी आईवडील आधी आपल्या मुलांनी लग्न करावं म्हणून आणि नंतर मुलांना जन्म द्यावा म्हणून आग्रह का करत असतात?" असा एक प्रश्न विचारण्यात आला आहे.
"मला मनमोकळेपणानं राहायला आवडतं. म्हणूनच मला मुलं जन्माला घालणं आवडत नाही. माझ्या मनाप्रमाणं एकटं राहावंसं वाटतं," एका कमेंट मध्ये लिहिलं आहे.
'मलापण आजीसारखं राहायचं आहे'
छिई आजींच्या व्हीडिओनंतर कुटुंबातील वरिष्ठ लोकांची भूमिका काय असावी यावर चर्चा होत आहे. आपल्या आई-वडिलांची सेवा करणं ही चिनी समाजातील महत्त्वाची परंपरा आहे.

फोटो स्रोत, PEAR VIDEO
बहुतेक चिनी लोक दीर्घकाळ काम करतात किंवा कामासाठी दूर ठिकाणी जागतं. त्यामुळे घरातील आजी - आजोबांकडे नातवंडांना सांभाळायची जबाबदारी असते.
पण, आर्थिक सुधारणा, दीर्घायुमान, कमी जन्मदर या कारणांमुळे चीनमध्ये वृद्ध लोकांची संख्या वाढते आहे. 2050 नंतर चीनमध्ये 1.5 अब्ज लोकांचं वय हे 65 वर्षांपेक्षा जास्त असणार आहे.
चीन सरकारच्या 'एक कुटुंब, एक मूल' धोरणामुळे 40 कोटी अतिरिक्त लोकसंख्येवर आळा बसला आहे. पण 2016 मध्ये हे धोरण उठवल्यानंतरही इथली कुटुंबं दोन मुलांना जन्म देताना दिसत नाहीत. उलट अनेक तरुण मूल जन्माला घालतच नाहीत.
"मला म्हातारपणी या आजीसारखंच जगायचं आहे. असे लोक क्वचितच असतात", असं एकानं लिहिलं आहे.
छिई आजींनी वयोवृद्ध चिनी लोकांसमोर नवा आदर्श घालून दिला आहे.
हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








