'धुम्रपानाइतकाच लठ्ठपणाही धोकादायक ठरू शकतो'

लठ्ठपणा

फोटो स्रोत, kali9

युनायटेड किंगडममध्ये लठ्ठपणाची नवी समस्या निर्माण होतं आहे. 21व्या शतकात जे लोक प्रौढ झाले म्हणजेच ज्यांनी 18 वर्षांत पदार्पण केलं तो लोक त्यांच्या मध्यम वयात जास्त लठ्ठ असतील, असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.

याचाच अर्थ असा की यूकेमधल्या लोकसंख्येतील 1980च्या दशकात किंवा 90 च्या दशकात जन्मलेले लोक मध्यम वयात आल्यानंतर खूपच लठ्ठ होतील.

त्या तुलनेत दुसरं महायुद्ध झाल्यानंतर जी मुलं जन्माला आली तीसुद्धा मध्यमवयात लठ्ठ झाली होती.

संशोधन करणाऱ्या संस्थेच्या मते प्रौढ वयातील लठ्ठपणा 13 वेगवेगळ्या प्रकारचा कॅन्सरना कारणीभूत ठरू शकतो.

त्यात स्तन, गुदद्वार, किडनी या अवयवांच्या कॅन्सरचा समावेश आहे. पण यूकेतील फक्त 15 टक्के लोकांनाच याची कल्पना आहे, असं या संस्थेचं म्हणणं आहे.

लठ्ठ पिढी

पश्चिम युरोपात यूकेमध्ये लठ्ठपणाचं प्रमाण सर्वाधिक आहे. इतर विकसित देशांपेक्षा लठ्ठपणाचं हे प्रमाण यूकेमध्ये जास्त आहे. विशेष म्हणजे यूकेमध्ये लठ्ठपणाचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. 1993 साली 15 टक्के असलेलं हे प्रमाण 2015 साली 27 टक्क्यांपर्यंत पोहोचलं होतं.

2015 साली 55 ते 64 या वयोगटात लठ्ठपणाचं प्रमाण जास्त आहे. पण नव्या संशोधनामुळे सध्याची पिढीसुद्धा लठ्ठपणाच्या बाबतीत याच वळणावर जाते की काय, अशी भीती तज्ज्ञांना वाटत आहे.

कॅन्सर रिसर्च यूके या संस्थेला या धोक्याची कल्पना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी असं वाटते.

लठ्ठपणा

फोटो स्रोत, dcdp

या संस्थेच्या प्रवक्त्या प्रा. लिंडा बॉल्ड म्हणाल्या, "शरीरातलं अतिरिक्त फॅट तिथेच राहत नाहीत. ते शरीरातल्या पेशींना धोक्याचा संदेश देत राहतं."

"धुम्रपानामुळं जसं शरीराचं नुकसान होतं तसंच लठ्ठपणामुळेही होतं," असं त्या म्हणाल्या.

हे अनुमान अंधूक असले तरी ते प्रत्यक्षात येणं नक्की टाळता येईल, असं त्या म्हणाल्या.

उत्तम आहार आणि व्यायाम

मिलेनियल्स (21 व्या शतकाच प्रौढ झालेले लोक) लोक आरोग्यदायी आहार घेतात पण संतुलित आहाराला पर्याय नाही.

"भरपूर फळं, भाज्या, तंतूमय पदार्थ खावे. डाळींचा आहारात समावेश करावा तसंच जंक फूड पूर्णपणं टाळावं. त्यामुळे वजन नियंत्रणात राहतं," असं त्या सांगतात.

लठ्ठपणा

फोटो स्रोत, Getty Images

रॉयल कॉलेज ऑफ पेडिआट्रिक्स आणि चाईल्ड हेल्थचे प्रा. रसेल विनर म्हणाले, "लठ्ठ असणं आता नॉर्मल समजलं जातं. त्यांच्यात असलेला लठ्ठपणा ते ओळखू शकत नाही किंवा त्यांचं मूल मर्यादेपेक्षा जास्त वजनाचं आहे हे कळायला त्यांना जास्त वेळ लागतो."

धुम्रपान आणि कॅंसर यांच्यातला संबंध समजल्यावर धुम्रपानाचा दर कमी झाला आहे. लठ्ठपणाच्या धोक्याबद्दल अशीच सजगता हवी, असं ते सांगतात.

हे वाचलंत का ?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)