कडाक्याच्या थंडीनं युरोप गोठलं, पारा उणे 30 अंशांच्या खाली

फोटो स्रोत, Getty Images
युरोपात दक्षिणेकडे भूमध्य सागराच्या किनाऱ्यापर्यंत शीतलहर पसरल्यामुळे बहुतांश प्रदेशात बर्फाची चादर पसरली आहे.
या शीतलहरीला यूकेत पूर्वेचा बर्फराक्षस असं नाव दिलं आहे. या शीतलहरीमुळे तापमान उणे 30 अंशांपर्यंत गेलं आहे.
सोमवारपासून आतापर्यंत सात लोकांचा मृत्यू झाला आहे. पोलंडमधल्या 5 आणि रोमानियातल्या दोन लोकांचा मृतांमध्ये समावेश आहे.
रेड क्रॉसच्या आंतरराष्ट्रीय समितीनं लोकांना अडचणीत असलेल्या लोकांची विचारपूस करण्याचं आवाहन केलं आहे.
"फक्त शेजारच्यांचा दरवाजा ठोठावून सगळं काही ठीक आहे की नाही इतकं विचारलं तरी खूप फरक पडू शकतो. हा जीवनमरणाचा प्रश्न असू शकतो," असं या समितीचे युरोपचे संचालक सिमसन मिसिरी म्हणाले आहेत.

फोटो स्रोत, EPA
रेड क्रॉसच्या आपात्कालीन गटाच्या सदस्यांनी काही निवारे सुरू केले आहेत. तिथं युरोप खंडातल्या हजारो लोकांना अन्न आणि ब्लँकेटचा पुरवठा केला जात आहे, असं त्यांनी सांगितलं.
सोमवारी तापमानात घट झाल्यानंतर आतापर्यंत पाच लोकांचा मृत्यू झाल्याचं पोलिश पोलिसांनी सांगितलं आहे. बर्फात अडकलेल्या लोकांना मदत करण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे.

फोटो स्रोत, PA
मंगळवारी रोमानियामध्ये दोन लोकांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 83 वर्षांच्या वृद्धेचा समावेश आहे. बर्फात कोसळलेल्या अवस्थेत त्या सापडल्या. तसंच 65 वर्षीय एक वृद्ध देखील मृतावस्थेत आढळल्याचं रॉयटर्स वृत्तसंस्थेनं सांगितलं आहे.
रोमानियाच्या पोलिसांनी अनेक रस्ते बंद केल्याचं सांगितलं, तसंच 100हून अधिक रेल्वेच्या फेऱ्या रद्द झाल्याचं सांगितलं.
मंगळवारी दक्षिण इटलीच्या नेपल्सजवळ पॉम्पी या शहरात बर्फ बघायला मिळाला. फेब्रुवारी महिन्यात तिथलं तापमान 6 ते 14 डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान असतं. नेपल्समध्ये गेल्या काही दशकांतली सगळ्यात जास्त बर्फवृष्टी पहायला मिळाली.

फोटो स्रोत, AFP
सोमवारी या शीतलहरीचा फटका रोमला सुद्धा बसला. इथली ही गेल्या सहा वर्षांतली पहिली बर्फवृष्टी आहे.
जर्मनीच्या हवामानविषयक वेबसाईटनं झुगपित्शी या शहराचं तापमान उणे 30 इतकं नोंदवलं आहे. देशाच्या बहुतांश भागातलं तापमान उणे 10 डिग्रीपेक्षा कमी नोंदवलं गेलं आहे.
गेल्या चार दिवसांत कमीत कमी 24 लोकांचा मृत्यू झाल्याचं वृत्त AFP या संस्थेनं दिलं आहे. शहरांमध्ये रस्त्यावर झोपले असताना अनेकांचा मृत्यू झाल्याचंही सांगण्यात आलं.

फोटो स्रोत, PA
अशाच प्रकारे फ्रान्समध्ये तीन, चेक प्रजासत्ताक मध्ये तीन आणि इटलीत एका व्यक्तीचा मृत्यू झाला असल्याचंही वृत्त या संस्थेनं दिलं आहे.
बेघर लोकांसाठी प्रशासनानं निवाऱ्याची व्यवस्था केली आहे.

फोटो स्रोत, AFP
या आठवड्याच्या शेवटपर्यंत असंच हवामान राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
उत्तर अटलांटिक महासागरात कमी दाबाच्या पट्ट्यामुळे युरोपात जोरदार बर्फवृष्टीची शक्यता आहे, तसंच फ्रान्स आणि उत्तर स्पेनमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
उत्तर युरोपात बोचरे वारे वाहतच राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे, तसंच यूके आणि आयर्लंडमध्ये गुरुवारपर्यंत बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे.
तुम्ही ही क्विझ सोडवलीत का?
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








