स्थलांतरितांच्या मुद्द्यावर ट्रंप सहमतीस तयार

फोटो स्रोत, Getty Images
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी संसदेसमोर बोलताना स्थलांतरितांच्या मुद्द्यावर डेमोक्रॅट पक्षाशी चर्चेची तयारी दाखवली.
डोनाल्ड ट्रंप यांच्या कार्यकाळाला वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं त्यांनी अमेरिकन वेळेनुसार मंगळवारी रात्री संसदेत भाषण केलं.
'स्टेट ऑफ द युनियन स्पीच' या नावानं ओळखलं जाणारं हे भाषण 'House of Representatives' मध्ये होतं. अमेरिकन काँग्रेसच्या दोन्ही सदनाचे सदस्य यावेळी उपस्थित होते.
या संपूर्ण भाषणाचं बीबीसी प्रतिनिधी अँथोनी झर्केर यांनी केलेलं हे विश्लेषण.
मागच्या वर्षी काँग्रेसला संबोधित करताना त्यांनी अनेक महत्त्वाकांक्षी योजना मांडल्या. पण कररचना सोडली तर त्यांच्या अनेक मोठ्या योजनांचा मसुदा तयार न होताच बारगळल्या.
मंगळवारी रात्री त्यांना हे सगळं बदलण्याची संधी होती. या संधीचा त्यांनी कसा वापर केला ते बघुया.
भाषा बदलली
डोनाल्ड ट्रंप यांनी आज केलेल्या भाषणात सावध भूमिका घेतली आहे. त्यांचं भाषण हे अलंकारिक होतं. भाषा उच्चकोटीची होती पण भूमिका कठोर होती.
स्थलांतर, नियमांत बदल, कर आणि सांस्कृतिक मुद्दयांना हात घालताना त्यांनी धोरणांची चर्चा केली. ज्या गोष्टींमुळे त्यांची स्तुती झाली आणि त्यांच्या राजकीय विरोधकांनी टीका केली अशाही गोष्टींचा भाषणात उल्लेख केला.
स्थलांतरितांसाठी 'खुला हात'
ज्यांनी लहानपणी कागदपत्रांशिवाय अमेरिकेत प्रवेश केला अशा लोकांना सुरक्षा द्यावी ही डेमोक्रॅट पक्षाची मागणी आहे.
स्थलांतरण कायदेशीर करण्याच्या नियमात बदल करण्यासाठी, सीमेवर भिंत बांधण्यासाठी त्यांना मोठे बदल करण्याची इच्छा आहे.

फोटो स्रोत, Reuters
ट्रंप यांनी मंगळवारी केलेल्या भाषणात डेमोक्रॅटसमोर सहकार्याचा हात पुढे केला आहे.
काही आठवड्यांपूर्वी ते म्हणाले होते की, कोणत्याही प्रकारची सहमती झाली तरी ती प्रेमानं व्हायला हवी.
पण हे सगळं सुरू असताना 'शटडाऊन' सुरू झालं आणि एक प्रकारची कटूता निर्माण झाली. राष्ट्राध्यक्षांनी त्यांच्या विरोधकांचा निषेध केलाय तसेच सीमा खुल्या ठेवण्याबाबत आणि गुन्हेगारीचं प्रमाण वाढवल्याचा आरोप त्यांच्यावर केला.
भाषणाच्या आधी प्रसारमाध्यमांसमोर सहकार्याबाबतच वक्तव्य केलं ते वेगळं होतं.
प्रत्यक्षात जे बोलले त्यात स्थलांतरितांचे गुन्हे, गट हे मुद्दे होते आणि त्याच पार्श्वभूमीवर अमेरिकन्ससुद्धा ड्रीमर्स आहेत हे वक्तव्य आलं.
पण जेव्हा प्रकरण गळ्यापर्यंत येतं तेव्हा अडचणीतून मार्ग काढण्याची ही पद्धत असावी. परंतु त्यांचे मतदार एखाद्या लढ्यापासून मागे हटू देणार नाही. त्यामुळे फक्त सहकार्याची भाषा पुरेशी नाही.
दृष्टिकोन- 'खुला हात' हे सौम्यपणाचं लक्षण किंवा वादळापूर्वीची शांतता असू शकतो. दोन पक्षांमधली दरी आधीइतकीच आहे. कदाचित ती रुंदावली असेल.
सूर बदलला खरा पण...
अकरा महिन्यांपूर्वी नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्षांनी काँग्रेसला म्हणजे अमेरिकेच्या संबोधित केलं होतं. त्या भाषणाचं स्वागत झालं. अगदी डाव्या विचारसरणीच्या लोकांनीही या भाषणाची स्तुती केली. लहानसहान कुरबुरी विसरून जाण्याचाही निश्चय त्यांनी या भाषणात केला. पण प्रत्यक्षात तसं झालं नाही.
आता राष्ट्राध्यक्षांनी पुन्हा एकदा राष्ट्रीय एकात्मतेची हाक दिली आहे. अमेरिकेतील अर्ध्याधिक जनता राष्ट्राध्यक्षांना मानत नाही.या विभागलेल्या जनतेचं मतपरिवर्तन होईल का हे पाहणं महत्त्वाचं आहे.
अमेरिकेची नवी चळवळ किंवा मागच्या वर्षांत आम्ही सरकार आणि जनता यांच्यातलं नातं जास्त सक्षम करण्याचा प्रयत्न केला हे दावे ट्रंप यांचे चाहते सोडून कोणीही ऐकणार नाही.
राष्ट्रध्यक्षांनी काय केलं, काय करू शकतात याबदद्ल ते कायम बढाया मारत असतात. पण हे सगळं ते चाहत्यांना खूश करण्यासाठी करतात. त्यांची उद्दिष्टं ही सामान्य माणसांच्या कल्याणासाठी आहेत अशा प्रकारे मन वळवणं हे एका रात्रीचं काम नाही.
दृष्टिकोन- काँग्रेससमोर केलेल्या शेवटच्या भाषणानंतर ट्रंप यांनी बराक ओबामा यांनी त्यांच्या टेलिफोन लाईन्स टॅप केल्या होत्या, असा आरोप करणारं ट्विट केलं होतं. तेव्हा सौम्य, मवाळ अशी त्यांची प्रतिमा धुळीस मिळाली होती. मग आता हे कसं टिकणार?
पायाभूत सुविधा आठवडा!
ट्रंप यांच्या स्फोटक गटानं जर प्रशासनाला अनुकूल असणाऱ्या बातम्या आणल्या तर 'आता पायाभूत सुविधांचा आठवडा सुरू होणार' अशा प्रकारचा विनोद वॉशिंग्टनच्या वर्तुळात फिरतो.
पायाभूत सुविधांच्या विकासाच्या अनेक योजना व्हाईट हाऊसतर्फे जाहीर केल्या जातात आणि त्या बारगळतात.
आता हा मुद्दा पुन्हा नियम बदलण्याच्या निमित्तानं ऐरणीवर आला आहे. 1.5 ट्रिलियन डॉलर्स (1.5 लाख कोटी रुपये) खर्च करण्याच्या घोषणेमुळे ट्रंप यांच्यावर सर्व पक्षांनी स्तुतीसुमनं उधळली. पण ही अनुदानित खासगी गुंतवणूक असल्याचं कळल्यावर डेमोक्रॅटिक पक्ष हातावर हात ठेवून बसले. तसेच लालफितशाही कमी करून प्रकल्प पूर्ण होतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
"आम्ही एम्पायर स्टेट बिल्डिंग एका वर्षांत बांधली," असं ट्रंप म्हणाले.
"अशा वेळी एका साध्या रस्त्यासाठी परवाना घ्यायला 10 वर्षं लागतात हे अतिशय अपमानास्पद नाही का?"
दृष्टिकोन- रस्ते आणि पुलांवर पैसा खर्च करणं लोकप्रिय आहे. यामुळे नोकऱ्या निर्माण होतात आणि मतदार खूश होतात. डेमोक्रॅट्स खूश होतात आणि रिपब्लिकन पण खूश होतात. राष्ट्रध्यक्ष खूश होतात. नियमांमध्ये बदल हा एक अडथळा असला तरी हे प्रकरण तडीस नेणं अत्यावश्यक आहे.

ट्रंप यांच्या भाषणातले महत्त्वाचे मुद्दे
- भाषणाच्या सुरुवातीला त्यांनी व्हर्जिनिया हल्ल्यात बचावलेले खासदार स्टीव्ह स्कालाईस यांचं ट्रंप यांच्यासह संपूर्ण सभागृहाने त्यांना टाळ्यांच्या कडकडाटात अभिनंदन केलं.
- आपापसातले मतभेद विसरून एका समान उद्दिष्ट ठरवायला हवं, तसंच ज्या लोकांनी आपल्याला निवडून दिलं, त्यांच्या कल्याणासाठी एकत्र येण्याचं आवाहन त्यांनी केलं.
- अमेरिकेत गेल्या वर्षांत 24 लाख नोकऱ्यांची निर्मिती झाली आहे. बेरोजगारीचा दर हा अमेरिकेच्या इतिहासातला सगळ्यात कमी असल्याचं त्यांनी सांगितलं.
- अमेरिकेच्या इतिहासात आम्ही सगळ्यात जास्त कर कपात केली असल्याचं ट्रंप यांनी सांगितलं.
- ही आपल्यासाठी एक नवी अमेरिकन चळवळ आहे. अमेरिकेच्या स्वप्नाप्रती जगण्यासाठी यापेक्षा कोणतीही योग्य वेळ असू शकत नाही. त्यामुळे कुठूनही आले असाल किंवा तुम्ही जिथे कुठे असाल, लक्षात घ्या हा क्षण तुमचा आहे. जर तुम्ही कष्ट घेतले, स्वत:वर, अमेरिकेवर विश्वास ठेवला तर तुम्ही कोणतंही मोठं स्वप्न बघू शकता, आपण एकत्र आलो तर कोणतीच गोष्ट असाध्य नाही.
- वॉशिंग्टनला आणखी उत्तरदायित्व वाढवण्यसाठी आम्ही अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच अनेक नियमांचा जाच कमी केला. उर्जा क्षेत्रात असलेलं युद्ध आम्ही संपवलं. आता आम्ही जगाला कोळशाची निर्यात करत असल्याचं त्यांनी सांगितलं.
- आफ्रिकन अमेरिकन लोकांच्या बेरोजगारीनं नीचांक गाठला आहे, असं वक्तव्य जेव्हा ट्रंप यांनी केलं तेव्हा सदनात उपस्थित असलेल्या अमेरिकन आफ्रिकन सदस्यांनी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही.
- ड्रेट्रॉईट येथे अमेरिकेतील ऑटोमोबाईल क्षेत्रातील कामगारांना जाचक ठरणाऱ्या आदेशांना स्थगिती दिल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळे आता या उद्योगाला चालना मिळेल असंही ते म्हणाले. तसंच त्यांनी अमेरिकेतील मंदावलेल्या मोटार उद्योगाची पुन्हा उभारणी करण्याचा निश्चय केला.
- ड्रग्समुळे होणाऱ्या व्यसनाधीनतेबाबत आपल्याला काहीतरी करावं लागेल. ड्रग डीलर्सविषयी आपल्याला कठोर व्हावं लागेल असं ट्रंप म्हणाले.
- प्रत्येक वर्णाच्या, धर्माच्या आणि जातीच्या लोकांचं संरक्षण करण्यासाठी आज मी डेमोक्रॅट आणि रिपब्लिक अशा दोन्ही पक्षांपुढे एकत्र काम करण्यासाठी हात पुढे करत आहे. अमेरिकेच्या नागरिकांचे संरक्षण करण्याची जबाबदारी माझी आणि इथे निवड झालेल्या प्रत्येक सदस्याची आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








