काबूल हल्ला : 'त्यांनी विदेशी नागरिकांना टिपून मारलं'

फोटो स्रोत, Reuters
काबूलमध्ये इंटरकाँटिनेंटल हॉटेलमध्ये शनिवारी झालेल्या हल्ल्यातील मृतांचा आकडा 18 वर गेला आहे. या घटनेच्या एका प्रत्यक्षदर्शीनं बीबीसीला या हल्ल्याचा थरारक वृत्तांत सांगितला.
हॉटेलवर केलेल्या गोळीबारात 14 विदेशी नागरिक ठार झाले. तर मृतांमध्ये 4 जण अफगाणिस्तानचे नागरिक होते, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
"हल्लेखोर हॉटेलमध्ये घुसले आणि मोठ्याने ओरडले, विदेशी नागरिक कुठे आहेत?" असं एका प्रत्यक्षदर्शीनं बीबीसीला सांगितलं. सुरक्षेच्या कारणास्तव त्याचं नाव जाहीर करता येणार नाही.
"हल्लेखोरांनी विदेशी नागरिकांना टिपून मारलं. ज्या वेळी हल्लेखोर आले त्यावेळी मी माझ्या मुलासोबत जेवण करत होतो. त्यांनी एका माणसावर बंदूक रोखली, त्या माणसानं म्हटलं की अफगाणिस्तानचा रहिवासी आहे. तेव्हा त्याला सोडून देण्यात आलं," असं प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं.
शनिवारी रात्री 9 वाजता काही बंदूकधाऱ्यांनी या हॉटेलमध्ये प्रवेश करत गोळीबार सुरू केला. तब्बल 12 तासांच्या चकमकीनंतर हॉटेलवर सुरक्षारक्षकांनी पुन्हा ताबा मिळवला. सुरक्षारक्षकांनी 150 जणांचे प्राण वाचवले.
या हल्ल्याची जबाबदारी कोणत्याही गटानं घेतलेली नाही. अंतर्गत मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी बीबीसीला या संदर्भातील माहिती दिली. ते म्हणाले की जवळपास 150 लोकांना या हॉटेलमधून सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं आहे.
या हॉटेलमध्ये माहिती तंत्रज्ञानाशी संबधित एक परिषद आयोजित करण्यात आली होती.

फोटो स्रोत, Reuters
हा हल्ला होण्यापूर्वी दोन दिवस आधीच इथल्या अमेरिकेतील दूतावासानं हॉटेल्सवर हल्ले होण्याची शक्यता व्यक्त केली होती.
गुरुवारी या दूतावासाने धोक्याचा इशारा देताना, 'काही जहालवादी गट काबूलमधल्या हॉटेल्सवर हल्ला करण्याचं नियोजन करत आहेत, याची आम्हाला पूर्ण कल्पना आहे,' असं म्हटलं होतं. हे गट सार्वजनिक कार्यक्रम, आंदोलनं, सरकारी कार्यालयं, वाहतुकींची साधनं, बाजाराची ठिकाणं आणि परदेशी नागरिक येण्याची शक्यता असलेले कार्यक्रम यांना लक्ष्य करू शकतील, असंही या इशाऱ्यात म्हटलं होतं.
हे हल्लेखोर हॉटेलमध्ये मागच्या दरवाजाने आले असावेत, असा संशय आहे.

फोटो स्रोत, Reuters
हे हॉटेल सरकारी मालकीचं आहे. या हॉटेलमध्ये लग्न कार्यक्रम, सभा, राजकीय कार्यक्रम होत असतात.
यापूर्वी तालिबानने या हॉटेलवर 2011मध्ये हल्ला केला होता. त्यात 21 लोक ठार झाले होते.
गेल्या वर्षी मे महिन्यात काबूलमध्ये झालेल्या हल्ल्यात 150 लोक ठार झाल्यानंतर काबुलमध्ये मोठी सुरक्षा ठेवण्यात येते. पण गेल्या काही महिन्यांत काबुलमध्ये हल्ल्यांची संख्या वाढलेली आहे. गेल्याच महिन्यात एका शिया सांस्कृतिक केंद्रावर झालेल्या हल्ल्यात 40 लोक ठार झाले होते.
हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








