रोहिंग्या मुस्लिमांना मारलं : म्यानमार लष्कराची प्रथमच कबुली
रखाइन प्रांतात उसळलेल्या हिंसाचारादरम्यान रोहिंग्या मुसलमानांच्या हत्याप्रकरणात सहभाग असल्याचं म्यानमारच्या लष्करानं पहिल्यांदाच मान्य केलं आहे.
तूर्तास म्यानमार लष्कराने एका विशिष्ट घटनेसंदर्भात हिंसाचारातला सहभाग मान्य केला आहे. म्यानमार सेनेने हाती घेतलेल्या चौकशीनुसार, म्यांगदो नजीकच्या इनदीन गावात दहा जणांच्या हत्येप्रकरणी सैन्याचे चार जवान सामील असल्याचं उघड झालं आहे.
प्रतिकार करताना बंगाली कट्टरवाद्यांवर करण्यात आलेल्या हल्ल्यात गावकऱ्यांना मदत केल्याचं या चार सैनिकांनी सांगितलं. लष्करातर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अहवालात हे नमूद करण्यात आलं आहे.
म्यानमारचं लष्कर रोहिंग्या जहालवाद्यांचा उल्लेख 'बंगाली कट्टरवादी' असा करतं.
लष्करावर जातीय शिरकाणाचा आरोप
रखाइन प्रांतात रोहिंग्या मुसलमानांची कत्तल केल्याचा म्यानमार लष्करावर आरोप आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात भडकलेल्या हिंसाचारानंतर साडेसहा लाख रोहिंग्या मुसलमानांनी रखाइन सोडून बांगलादेशात आश्रय घेतला. हिंसाचारादरम्यान सामूहिक हत्या, बलात्कार आणि अत्याचाराच्या घटना समोर आल्या आहेत.

फोटो स्रोत, AFP
सेना आणि स्थानिक बौद्ध नागरिकांनी मिळून आमची गावं जाळली, असा आरोप रोहिंग्या मुसलमानांनी केला होता. सामान्य नागरिकांना लक्ष्य केलं नसल्याचं सांगत लष्कराने या आरोपाचं खंडन केलं होतं. आमचं लक्ष्य रोहिंग्या जहालवादी होते, असं लष्करानं स्पष्ट केलं.
म्यानमार सरकारने पत्रकार आणि स्वतंत्र तपास यंत्रणांना रखाइन प्रांतात जाऊन वृत्तांकन करण्यावर प्रतिबंध लादला होता.
कबरीतून मिळाले दहा सांगाडे
इनदीन गावातल्या एका कब्रस्तानात दहा सांगाडे मिळाले होते. याप्रकरणाची चौकशी करू अशी घोषणा लष्कराने केली होती. यासंदर्भातील लष्कराचा अहवाल जाहीर झाला आहे. त्यानुसार गावकरी आणि लष्कराच्या सैनिकांनी मिळून दहा लोकांची हत्या केल्याची कबुली दिली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
रोहिंग्या जहालवाद्यांनी बौद्ध गावकऱ्यांना धमकावून त्यांना भडकावण्याचा प्रयत्न केला होता असंही लष्कराच्या अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे.
नोव्हेंरमध्ये केला होता आरोपांचा इन्कार
गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात हा हिंसाचार भडकला होता. त्यानंतर पहिल्यांदाच म्यानमार लष्कराने रोहिंग्या मुसलमानांच्या हत्या प्रकरणातल्या सहभागाची कबुली दिली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
हत्येच्या बरोबरीने गाव जाळणं, बलात्कार आणि लूटमारीचा आरोप लष्करावर आहे. मात्र नोव्हेंबर महिन्यात लष्करानं या सगळ्या आरोपांचं खंडन केलंह होतं.
रखाइन प्रांतात अत्याचाराचे पुरावे स्पष्टपणे उपलब्ध असतानाही म्यानमार सरकारला केवळ एकच सामूहिक कब्रस्तान मिळालं आहे. ....
प्रशासनाने यासाठी रोहिंग्या जहालवाद्यांना जबाबदार ठरवलं आहे.
डिसेंबरमध्ये रॉयटर्स वृत्तसंस्थेच्या दोन पत्रकारांना अटक करण्यात आली होती. दीन गावात झालेल्या संहारासंदर्भातली माहिती या दोन पत्रकारांना मिळाल्याची चर्चा होती. त्या पार्श्वभूमीवर या दोनजणांना अटक करण्यात आल्याचं समजतं.
तुम्ही हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)










