जिन्नांच्या आणि आजच्या पाकिस्तानात किती भेद, किती साम्य?

जिन्नांचे संग्रहित छायाचित्र.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, जिन्नांचे संग्रहित छायाचित्र.
    • Author, शुमैला जाफरी
    • Role, बीबीसी प्रतिनिधी, इस्लामाबाद

25 डिसेंबरचं पाकिस्तानसाठी विशेष महत्त्व आहे. इतर अनेक देशांप्रमाणेच पाकिस्तानातही आजच्या दिवशी सुटी असते. पण ख्रिसमसनिमित्त नाही, तर जिन्नांचा जन्मदिवस म्हणून.

'कायदे आजम' म्हणून ओळखले जाणारे पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिन्ना यांचा आज 141वा जन्मदिवस.

सार्वजनिक क्षेत्रातल्या तसंच सत्तेत असलेल्या उजव्या विचारसरणीच्या घटकांना 'बिगर-इस्लामिक' किंवा 'पाश्चात्य' सणाला सुटी देण्याची कल्पना रुचत नसल्याने जिन्नांच्या स्मरणार्थ सार्वजनिक सुटी जाहीर करणं सोयीचं ठरतं.

आजच्या पाकिस्तानची ओळख सांगताना धर्म हा त्यातला महत्त्वाचा घटक आहे, हे लक्षात घ्यायला हवं. पण ही ओळख जिन्नांना अभिप्रेत असणाऱ्या पाकिस्तानच्या कल्पनेशी सुसंगत आहे का?

धार्मिक नीतिनियमांवर आधारलेलं राष्ट्र त्यांना हवं होतं का? की नागरिकांच्या धर्माचा विचार न करता त्यांना सामावून घेईल, असं राष्ट्र जिन्नांना उभं करायचं होतं? की त्यांना पूर्णतः धर्मनिरपेक्ष राष्ट्र हवं होतं?

नेहरू, माउंटबॅटन आणि जिन्ना.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, नेहरू, माउंटबॅटन आणि जिन्ना.

इतिहासकार यासीर लतिफ हमदानींच्या मते, "आपल्या 33 भाषणांमधून जिन्नांनी नागरी सत्तेचं वर्चस्व, लोकशाही आणि अल्पसंख्यांकांसाठी समान हक्क, यांचा उल्लेख केलेला दिसून येतो. इस्लामबद्दल बोलताना देखील त्यांनी इस्लामची तत्त्वं समानतेवर आधारित आहेत, असंच सांगितलं होतं."

"पण आज पाकिस्तानात जे काही होतं आहे, ते जिन्नांना अभिप्रेत नव्हतं," असंही हमदानी म्हणाले.

फैजाबाद इंटरचेंजजवळ झालेली निदर्शनं.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, फैजाबाद इंटरचेंजजवळ झालेली निदर्शनं.

'तहरीक-ए-लबैक या रसूल अल्लाह' या पक्षाने ईश्वरनिंदेच्या मुद्द्यावरून नुकत्याच इस्लामाबादजवळच्या फैजाबाद इंटरचेंज येथे केलेल्या निदर्शनांबद्दल बोलताना यासीर हमदानी म्हणतात, "जिन्नांना हव्या असलेल्या पाकिस्तानच्या पूर्णत: विरुद्ध असं हे चित्र होतं."

इतिहासकार मुबारक अलींच्या मते, पाकिस्तानी इतिहासकारांनी जिन्ना हे संत होते किंवा ते अत्यंत धार्मिक वृत्तीचे होते, अशी त्यांची प्रतिमा उभी केली आहे. सध्याच्या उजव्या विचारसरणीच्या कट्टर धर्मवादी शक्तींच्या विचारांना जिन्नांच्या विचारांशी सुसंगत ठरवता यावं, म्हणून हे हेतूपूर्वक केलं गेलं, असंही ते म्हणतात.

"जिन्ना धर्मनिरपेक्षता, भारतीय राष्ट्रवाद आणि ब्रिटीशविरोध ही मूल्यं मानत नव्हते, असा आभास निर्माण करण्याचे प्रयत्न हे कथित इतिहासकार करत आहेत," असं अली म्हणतात.

हे 'नवे जिन्ना' मूळ जिन्नांपेक्षा पूर्णतः वेगळे असून ते आपलं ऐतिहासिक महत्त्व गमावून बसले आहेत, असं अलींना वाटतं.

महात्मा गांधी आणि मोहम्मद अली जिन्ना.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, फाळणीत दोन राष्ट्रांची निर्मिती झाली. एकीकडे महात्मा गांधी राष्ट्रपिता झाले तर मोहम्मद अली जिन्ना पाकिस्तानचे संस्थापक झाले.

पण जिन्ना होते कोण?

मुबारक अलींना जिन्ना धर्मनिरपेक्ष विचारांचे होते, असं वाटतं. त्यांनी आपल्या राजकारणात धर्माचा वापर केला, पण धर्माला राजकारणावर वरचढ ठरू दिलं नाही, असं अली मानतात.

"पाकिस्तान हे धर्मसत्ताक राज्य होणार नाही, असं त्यांनी वारंवार स्पष्ट केलं होतं", अली आठवण करून देतात.

यासीर हमदानी त्यांच्याशी सहमत आहेत, "कायदे आजम यांच्या कल्पनांचा विपर्यास करून त्यांच्या विचारांशी विसंगत असणाऱ्या कल्पना त्यांच्याशी जोडल्या गेल्या आहेत," असं ते म्हणतात.

"1974 साली (ज्या वर्षी पाकिस्तानच्या संसदेने घटनादुरुस्ती करून अहमदी पंथाला बिगर-मुस्लिम घोषित केलं गेलं) पहिल्यांदा जिन्नांच्या पाकिस्तानच्या संकल्पनेला तिलांजली दिली गेली," असं यासीर हमदानींना वाटतं.

"त्यानंतर हुकुमशहा जनरल झिया उल हक यांनी त्या संकल्पनेची पायमल्ली केली आणि वर्तमान पाकिस्तान सरकारने फैजाबादच्या निदर्शकांबरोबर केलेल्या तडजोडीमुळे पाकिस्तान आता जिन्नांना अभिप्रेत नसलेलं एक धर्माधिष्ठित राष्ट्र झालं आहे," असंही हमदानी म्हणतात.

जिन्नांच्या अनेक गुणविशेषांकडे पाकिस्तानी नेत्यांनी हेतुपुरस्सर दुर्लक्ष केलं असं मुबारक अली म्हणतात.

"ते आपला शब्द पाळत असत, जिन्ना अत्यंत प्रामाणिक आणि समर्पित वृत्तीचे व्यक्ती आणि निष्णात वकील होते. पण त्यांच्या सडेतोडपणाबद्दल बोलणं राजकारण्यांना सोयीचं नव्हतं म्हणून जिन्ना स्वतः फार धार्मिक वृत्तीचे नसूनही, या राजकारण्यांनी त्यांच्या धार्मिक पैलूंवर भर दिला," अली सांगतात.

व्हाईसरॉय माउंटबॅटन, जिन्नाह आणि इडविना माउंटबॅटन.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, व्हाईसरॉय माउंटबॅटन, जिन्नाह आणि इडविना माउंटबॅटन.

"धर्म आणि विचारसरणीचा अडसर न होता जिथे सर्व नागरिकांना मुक्तपणे आणि समानतेने राहता येईल, असं एक आधुनिक लोकशाही राष्ट्र जिन्नांना पाकिस्तानात उभं करायचं होतं. पण पाकिस्तानची राज्यघटना मुस्लिमेतरांना राष्ट्रपती आणि पंतप्रधान होण्यापासून बंदी घालते," असं विश्लेषक हमदानी सांगतात.

"जिन्नांच्या पाकिस्तानात असं घडलं नसतं", असंही ते सांगतात.

जिन्नांच्या पाकिस्तानच्या संकल्पनेबद्दल खूप संभ्रम आहे, असं मुबारक अलींना वाटतं.

"पाकिस्तान धर्माधिष्ठीत राज्य होणार नाही असं जिन्ना म्हणाले होते पण ते धर्मनिरपेक्ष राज्य होईल की लोकशाही राष्ट्र होईल याबाबत ते बोलले नाहीत. त्याबाबत बराच गोंधळ आहे," अली पुढे सांगतात.

पण हमदानींना मात्र जिन्नांच्या पाकिस्तानबद्दलच्या संकल्पनेत कुठलाच गोंधळ दिसत नाही. पाकिस्तानचे पहिले कायदामंत्री हिंदू होते, स्वतः जिन्नांनीच त्यांची नियुक्ती केली होती.

जिन्ना आणि आजचा पाकिस्तान.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, जिन्ना आणि आजचा पाकिस्तान.

"फाळणीच्या दोन दिवस आधी जिन्नांनी जी मूलभूत अधिकारांविषयक समिती नेमली त्यात सहा हिंदूंचा समावेश होता. राष्ट्राचं मूलभूत तत्त्व समता असलं पाहिजे, असं त्यांचं मत होतं", हमदानींचं म्हणणं आहे.

मुबारक अली सांगतात की भूतकाळात जगण्यापेक्षा पाकिस्तानने आपल्या भविष्याचा मार्ग आखावा.

"पाकिस्तान ही काही जिन्नांची मालमत्ता नाही. हे लोकांचं राज्य आहे. जिन्नांना काय हवं होतं, यापेक्षा पाकिस्तानला सद्य स्थितीशी सुसंगत कसं करता येईल, यासाठी प्रयत्न करायला हवेत," असं मत ते मांडतात.

पण हमदानी यावर आक्षेप घेतात. "जिन्ना पाकिस्तानचे संस्थापक होते. पाकिस्तानसाठी ते नेहमीच सुसंगत होते आणि राहतील."

तुम्ही हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)