अमेरिका : दहशतवादाचा आरोप झालेले शीख महापौर

फोटो स्रोत, FACEBOOK/RAVI BHALLA
भारतीय वंशाचे अमेरिकेतील शीख नेते रवि भल्ला यांची नुकतीच न्यू जर्सी राज्यातल्या होबोकन शहराच्या महापौरपदी निवड झाली. रवि भल्ला यांना काही दिवसांपूर्वी दहशतवादी म्हणून बदनाम करण्यात आलं होतं.
रवि भल्ला अमेरिकेतल्या न्यू जर्सी या राज्यात राहतात. त्यांनी नुकतीच तेथील महापौरपदाची निवडणूक जिंकली.
त्यांच्याविरोधात प्रचार करताना 'Don't let TERRORISM take over our Town!' या आशयाची पत्रकं शहरभर वाटण्यात आली होती.
पण, या सर्व प्रकारच्या अपप्रचाराला बळी न पडता महापौर पदाची निवडणूक जिंकण्यात ते यशस्वी झाले आहेत.
कोण आहेत रवि भल्ला?
रवि भल्ला यांचा जन्म न्यू जर्सी येथे झाला. तेथेच ते लहानाचे मोठे झाले. 17 वर्षांपासून ते होबोकन या शहरात राहत आहेत.

फोटो स्रोत, FACEBOOK
त्यांनी इथून दोन वेळा सिटी काउन्सिलच्या अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली आहे. आता मात्र होबोकनचे महापौर म्हणून त्यांची निवड झाली आहे.
भल्ला यांनी बर्कले इथल्या कॅलिफोर्निया विद्यापीठातून 'पॉलिटिकल सायकॉलिजी' या विषयात पदवी घेतली आहे. तसंच 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मधून मास्टर्सची पदवी घेतली आहे.
त्यानंतर वयाच्या 26 व्या वर्षी त्यांनी न्यू जर्सी इथल्या एका कायदेविषयक कंपनीत काम करण्यास सुरुवात केली.
आपल्या अशिलाला भेटण्यासाठी एकदा तुरुंगात गेले असताना भल्ला यांना त्यांच्या घटनात्मक अधिकारांसाठी सर्वप्रथम लढावं लागलं. त्यामुळेच ते चर्चेत आले.
होबोकन शहराचा विकास
या घटनेनंतर त्यांनी सरकारच्या मुलाखती संबंधींच्या धोरणांमध्ये सुधारणा करण्यासाठी एक उपक्रम सुरू केला.

फोटो स्रोत, FACEBOOK
होबोकनच्या स्थानिक प्रशासनात अनेक अडचणी होत्या. सरकारी पातळीवर अनेक त्रुटी आहेत, असं भल्ला यांच्या लक्षात आलं.
होबोकनचं वार्षिक बजेट खूप जास्त होतं. तसंच एका वर्षाच्या आत तिथल्या सिटी काउन्सिलनं करात 70 टक्क्यांनी वाढ केली होती.
भल्ला यांनी होबोकनचे माजी मेयर जिम्मर यांच्यासोबत मिळून सरकारी यंत्रणा दुरुस्त करण्याचं काम सुरु केलं.
त्यांनी शहरातील नागरिकांना प्रामाणिक आणि प्रोफेशनल पर्यायांचा अवलंब करण्यासाठी प्रोत्साहित केलं. सिटी काउन्सिलच्या तीन मोठ्या पदांसाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीत भल्ला यांनी सर्वात जास्त मतं मिळवली.
यानंतर त्यांनी सिटी काउन्सिलचे कर कमी केले आणि होबोकन शहराची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी अनेक पावलं उचलली.
कट्टरपंथी असा विरोधकांचा आरोप
महापौर निवडणुकीच्या आधी भल्ला यांच्या विरोधकांनी भल्ला यांच्याबद्दल अपप्रचार केला.

फोटो स्रोत, FACEBOOK
त्यांच्या फोटोसोबत TERRORISM सारखे शब्द छापून ती पत्रकं शहरभर पसरवण्यात आली.
या अपप्रचाराला भल्ला यांनी खूप संयतपणे उत्तर दिलं. यासंबंधी लिहिलेल्या फेसबुक आणि ट्विटर पोस्टमध्ये ते म्हणतात,
"माझ्या फोटोवर TERRORIST शब्द लिहिलेलं पत्रक मी काल रात्री पाहिलं. यामुळं मला खूप त्रास झाला. पण कोणी कितीही प्रयत्न केले, तरी आम्ही होबोकनमध्ये द्वेषाला जिंकू देणार नाही."
"होबोकनमध्ये सर्व प्रकारच्या लोकांचं आनंदानं स्वागत केलं जातं. मी स्वत: माझी पत्नी आणि दोन मुलांसोबत इथं आनंदानं राहत आहे."
"तुमची जात काय, धर्म काय, लिंग कोणतं किंवा समुदाय कोणता यामुळं या शहराला कोणताही फरक पडत नाही," असं त्यांनी लिहिलं आहे.

फोटो स्रोत, FACEBOOK
ट्रंप यांच्यावर निशाणा साधताना भल्ला यांनी लिहिलं आहे की,
"सध्या आमच्या देशावर एक अशी व्यक्ती राज्य करत आहे, जी आम्हाला एकमेकांपासून तोडण्याचा प्रयत्न करत आहे. अशा परिस्थितीत आपण सर्वांनी एकत्र येऊन अमेरिकी मूल्यांसाठी लढावं लागणार आहे."
ट्विटरवर कौतुकाचा वर्षाव
महापौर पदाची निवडणूक जिंकल्यानंतर भल्ला यांच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. भल्ला यांनीसुद्धा ट्वीट करुन होबोकन शहरातील नागरिकांचे आभार मानले आहेत.

फोटो स्रोत, Twitter/RAVI BHALLA
जेसन शेल्टजर यांनी ट्वीटमध्ये लिहिलं आहे की,
"रिपब्लिकन पक्षानं ज्या उमेदवाराचा दहशतवादी असा प्रचार केला, तो उमेदवार निवडणूक जिंकला आहे. तसंच जैरी शी, फाल्गुनी पटेल, लॉरा कुरैन आणि हाला अलाया हे सर्व उमेदवारसुद्धा जिंकले आहेत. हे म्हणजे अमेरिकेच्या भविष्यातील आशेचा किरण आहे."

फोटो स्रोत, TWITTER/JASON SHELTZER
"अमेरिकी शीख असलेल्या रवि भल्ला यांनी होबोकनच्या महोपौरपदाची निवडणूक जिंकली आहे. त्यांचा विजय शानदार आहे," असं लिंडा सॅरसॉर यांनी ट्वीट केलं आहे.

फोटो स्रोत, TWITTER/LINDA SARSOUR
प्रमिला जयपाल यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलं आहे की,
"रवि भल्ला होबोकनचे पहिले शीख महापौर बनले आहेत, ही खूपच आनंदाची बाब आहे. सर्व शीख-अमेरिकन्सना शुभेच्छा."

फोटो स्रोत, TWITTER/PRAMILA JAYAPAL
त्या पुढे लिहितात, "नागरिकांमध्ये द्वेष पसरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या शक्तींचा हा पराभव आहे. प्रेमाचा नेहमीच विजय होतो."
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








