कॅनडा : न्यू डेमोक्रॅटिक पक्षाच्या नेतेपदी जगमित सिंग यांची निवड

फोटो स्रोत, JAGMEET SINGH/FACEBOOK
कॅनडाच्या फेडरल न्यू डेमोक्रॅट्सने भारतीय वंशाच्या जगमित सिंग यांची येत्या निवडणुकीसाठी पक्षाच्या नेतेपदी निवड केली आहे. शीख समुदायाचे 38 वर्षीय जगमित सिंग या देशाच्या बड्या फेडरल पार्टीचे पहिले वांशिक अल्पसंख्याक नेते आहेत.
या निवडीमुळे कॅनडात वांशिक अल्पसंख्याकांचा एक नवा राजकीय प्रवाह निर्माण होण्याची शक्यता आहे.
डाव्या विचारसरणीच्या पक्षाच्या तीन उमेदवारांना पराभूत करून चुरशीच्या लढतीत जगमित सिंग यांनी ही 'फर्स्ट बॅलट व्हिक्टरी' संपादन केली आहे.

फोटो स्रोत, JAGMEET SIGH/FACEBOOK
न्यू डेमोक्रॅटिक पार्टी हा कॅनडामधील तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे. 338 जागांपैकी 44 जागा त्यांच्या पक्षाच्या आहे. डाव्या विचारसरणीचा हा पक्ष अद्याप कधीही सत्तेवर आलेला नाही.
गेल्या रविवारी झालेल्या पक्षांतर्गत निवडणुकीत सिंग यांना 53.6 टक्के मतं मिळाली. 2015 साली 59 जागा गमावलेल्या या पक्षाचं पुनर्निर्माण करण्याचं मोठं आव्हान त्यांच्यासमोर आहे.
"या स्पर्धेमुळे आमच्या पक्षात उत्साहाचं वातावरण तयार झालं आहे," असं सिंग म्हणाले. नेतेपदी निवड हा अतिशय महत्त्वाचा सन्मान असल्याचं त्यांनी सांगितलं.
प्रचारादरम्यान त्यांनी एका पत्रकाराला दिलेल्या प्रतिक्रियेचा एक व्हीडिओ व्हायरल झाला होता. त्यामुळे सिंग यांचा या निवडणुकीत भाव वधारला, असं मानलं जातं.

फोटो स्रोत, Reuters
सिंग हे आधी क्रिमिनल डिफेन्स लॉयर होते. जीक्यू मासिकासाठी केलेल्या प्रोफाईल शूटमुळे त्यांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं.
त्यांची वैयक्तिक स्टाईल - भडक रंगाची पगडी, त्यांचा वैशिष्ट्यपूर्ण सूट हा त्यांच्या राजकीय ब्रँडचा कसा भाग झाला, याविषयी स्वतः जगमित सिंग यांनीच एका अमेरिकन नियतकालिकाला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं.
"मी वेगळा दिसत असल्याने मी लोकांचं लक्ष वेधून घेतो, हे मला कळलं होतं," ते सांगतात.
"काही लोकांना हे विचित्र वाटू शकतं पण मला असं वाटतं की लोक माझ्याकडे बघणारच असतील तर त्यांना बघण्यासारखं काहीतरी करावं, असा मी विचार केला", जगमित सिंग म्हणतात.

फोटो स्रोत, JAGMEET SINGH/FACEBOOK
पक्षाशी एकनिष्ठ समजल्या जाणाऱ्या टॉम मुकये यांना एप्रिल 2016 साली पक्षातून निलंबित केल्यानंतर फेडरल न्यू डेमोक्रॅट्स नेतृत्वाच्या शोधात होते.
कॅनडामध्ये पुढील निवडणूक 2019 साली होणार आहे.
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








