केनेडींना कुणी मारलं? फायलींचा पेटारा उघडला, पण रहस्य उलगडणार का?

व्हीडिओ कॅप्शन, जेएफ केनेडी यांच्या हत्येसंदर्भातील कागदपत्रं सार्वजनिक होणार आहेत.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी माजी राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांच्या हत्येसंबंधी 2,800 फाइल्स शुक्रवारी सार्वजनिकदृष्ट्या खुल्या केल्या आहेत. 52 वर्षांनंतर या मृत्यूभोवतीचं असलेलं गूढ उलगडणार का?

सार्वजनिक करण्यात आलेल्या या कागदपत्रांनंतर अनेक तर्कवितर्क असलेल्या या घटनेबद्दल जनतेला संपूर्ण माहिती असावी, असं डोनाल्ड ट्रंप यांनी म्हटलं आहे.

मात्र सुरक्षेच्या कारणास्तव अन्य काही संवेदनशील फाइल्सची सार्वजनिक करण्यास त्यांनी नकार दिला आहे. मग यानंतरही केनेडींच्या हत्येभोवती असलेलं गूढ कायम राहणार का?

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

1992 मध्ये अमेरिकेच्या संसदेने संमत केलेल्या विधेयकानुसार हत्येच्या संदर्भातील 50 लाख पानांचा मजकूर 25 वर्षांत जाहीर करणं अपेक्षित होतं. याकरता 27 ऑक्टोबर ही तारीख निर्धारित होती. आणि शुक्रवारी 90 टक्क्यांहून अधिक कागदपत्रं जनतेसाठी खुली करण्यात आली आहेत.

नक्की काय घडलं होतं?

माजी राष्ट्राध्यक्ष केनेडी यांचा मृत्यू 22 नोव्हेंबर 1963 रोजी झाला होता. अमेरिकेतच डल्लास प्रांतात खुल्या लिमोझिन गाडीतून जात असताना त्यांच्यावर हल्ला झाला होता.

ट्रंप, अमेरिका, केनेडी

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, जॉन एफ केनेडी यांचे संग्रहित छायाचित्र

टेक्सास प्रांताचे गव्हर्नर जॉन कॉनली गाडीच्या सुरुवातीच्या भागात केनेडी यांच्यासोबत बसले होते. कॉनली या हल्ल्यात जखमी झाले आणि जेडी टिपीट या पोलीस अधिकाऱ्याचा थोड्या वेळाने मृत्यू झाला होता.

याप्रकरणी ली हार्वे ओसवाल्डला अटक करण्यात आली होती आणि त्याच्यावर राष्ट्राध्यक्ष केनेडी आणि पोलीस अधिकारी टिपीट यांच्या मृत्यूचे आरोप निश्चित करण्यात आले होते. पण त्याने हे मान्य करण्यास नकार दिला.

अधिकृत स्पष्टीकरण काय?

सप्टेंबर 1964 मध्ये प्रसिद्ध झालेल्या 'द वॉरन कमिशन'च्या अहवालानुसार ओसवाल्डने 'टेक्सास स्कूल बुक डिपॉझिटरी' बिल्डिंगमधून केनेडी यांच्या दिशेने गोळीबार केला.

ली हार्वे ओसवाल्ड आणि जॅक रूबी केनेडी यांच्या हत्येच्या कटात ओसवाल्ड तसंच रूबी सामील असल्याचा कोणताही पुरावा उपलब्ध नसल्याचा निर्वाळा या अहवालात देण्यात आला.

ट्रंप, अमेरिका, केनेडी

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, केनेडी यांच्या मृत्यूनंतर लिंडन बैन्स जॉन्सन यांनी अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला होता.

1979 मध्ये 'हाऊस सिलेक्ट कमिटी ऑन असॅसिनेशन्स'च्या अहवालानुसार केनेडी यांची हत्या दोन बंदूकधाऱ्यांनी केल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती.

ली हार्वे ओसवाल्ड कोण?

माजी नौदल अधिकारी आणि स्वयंघोषित मार्क्सवादी असलेल्या ओसवाल्डने 1959 मध्ये रशियाला भेट दिली. 1962 पर्यंत तो तिथंच होता.

मिन्स्क शहरात तो रेडिओ आणि टीव्ही क्षेत्रात कार्यरत होता. रशियातच त्याला आयुष्याची साथीदार मिळाली.

केनेडी यांच्या हत्येच्या दोन महिने आधी ओसवाल्ड क्युबा आणि रशियाच्या दूतावासांमध्ये गेला होता, असं वॉरन कमिशनच्या अहवालात नमूद करण्यात आलं होतं.

नुकत्याच उघड झालेल्या फाईल्समध्ये असं सांगितलं आहे की FBIने पोलिसांना ओसवाल्ड यांच्या जीवाला धोका असल्याचा इशारा दिला होता.

FBIचे संचालक लिहितात, "आम्ही पोलीसप्रमुखांना याबाबत इशारा दिल होता. तेव्हा ओसवाल्डला पुरेसं संरक्षण देण्याचं आश्वासन पोलिसांनी दिलं होतं."

केनेडी यांच्या हत्येनंतर दोन दिवसांनी डल्लास पोलीस डिपार्टमेंटच्या तळघरात त्याला ठार करण्यात आलं होतं.

स्थानिक नाईटक्लबचा मालक जॅक रूबी याने ओसवाल्डवर गोळीबार केला.

विविध मतप्रवाह

केनेडी यांची हत्या दोन बंदूकधाऱ्यांनी केली असावी, असा एक मतप्रवाह आहे. पण दुसऱ्या एका मतप्रवाहानुसार केनेडी यांच्यावर मागून नव्हे तर समोरून हल्ला झाला होता.

ट्रंप, अमेरिका, केनेडी

फोटो स्रोत, EPA

फोटो कॅप्शन, केनेडी यांच्या हत्येमागचं गूढ अद्यापही उलगडलेलं नाही

ओसवाल्डला अटक केल्यानंतर त्याची पॅराफिन चाचणी घेण्यात आली. त्यानुसार त्याने रायफल चालवली नसल्याचं स्पष्ट झालं होतं. मात्र या चाचणीच्या वैधता आणि अचूकतेबाबत शंका व्यक्त करण्यात आली होती.

केनेडी यांच्या दिशेने झाडण्यात आलेली गोळी मला लागली नसल्याचं कॉनली यांनी स्पष्ट केलं होतं. परंतु वॉरन कमिशनमध्ये याच्या परस्पराविरोधी नोंदी होत्या.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)