कॅटलोनियाचा कारभार पुर्णपणे ताब्यात घेण्याच्या स्पेनच्या हालचाली

पंतप्रधान रेजॉय

फोटो स्रोत, EPA

फोटो कॅप्शन, 'आणीबाणी लागू करण्याची आमची इच्छा नव्हती पण आता पर्याय उरला नाही.'

कॅटलोनियाच्या नेत्यांना पदच्यूत करून आपल्या हातात सर्व सूत्र घेण्याची योजना स्पेनच्या पंतप्रधानांनी आखली आहे. कॅटलोनियात आणीबाणी लागू करून हा प्रांत सरकारद्वारे नियंत्रित केला जाईल.

मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मारिआनो रेजॉय यांनी आपली योजना बोलून दाखवली. त्याच बरोबर या भागात निवडणुका घेण्यात येतील असं देखील त्यांनी म्हटलं आहे.

त्यांच्या या निर्णयावर संसदेकडून शिक्कामोर्तब झाल्यावर या निर्णयाची अंमलबजावणी होईल.

कॅटलोनियाच्या नेत्यांनी स्वातंत्र्यासाठी सार्वमत घेतल्यानंतर तीन आठवड्यानंतर स्पेन सरकारनं हे पाऊल उचललं आहे.

कॅटलोनियामध्ये झालेले सार्वमत हे स्पेनच्या सर्वोच्च न्यायालयानं बेकायदेशीर ठरवलं आहे. हे मतदान घटनाबाह्य आहे आणि यामुळे देश दुभंगला जाईल असं न्यायालयानं म्हटलं आहे.

स्पेन

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, कलम 155 नुसार कॅटलोनियामध्ये आणीबाणी लागू होण्याची शक्यता

कतालान नेते कार्ल्स पुजडिमाँ यांनी सरकारनं दिलेल्या सूचनांना केराची टोपली दाखवली आहे. स्वतंत्र कॅटलोनियाचा हट्ट सोडा असं सरकारनं वारंवार सांगितलं आहे. पण, त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केलं आहे.

कतालान सरकार कायद्याच्या विरोधात वागत आहे, त्यामुळे त्यांच्यावर थेट कारवाई करण्यावाचून पर्याय उरला नाही असं पंतप्रधान रेजॉय यांनी म्हटलं आहे.

जर अशी परिस्थिती उद्भवली तर स्पेनच्या घटनेच्या कलम 155 नुसार कोणत्याही स्वायत्त प्रांतावर केंद्र सरकार आपलं नियंत्रण मिळवून कारभार चालवू शकतं.

पण, यासाठी संसदेची परवानगी आवश्यक असते. पुढील आठवड्यामध्ये यावर संसदेत मतदान होईल.

155 कलम लागू करण्याची आमची इच्छा नव्हती. पण, हा सर्व घटनाक्रम पाहता ते अनिवार्य झालं आहे असं पंतप्रधान रेजॉय यांनी म्हटलं आहे.

कॅटलोनियाच्या स्थानिक सरकारनं 1 ऑक्टोबरला वेगळ्या देशासाठी जनमत चाचणी घेतली होती.

या सार्वमतामध्ये 43 टक्के कतालान लोकांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी 90 टक्के लोकांनी कॅटलोनिया स्वतंत्र व्हावा असं म्हटलं होतं.

व्हीडिओ कॅप्शन, कॅटलोनियामध्ये सार्वमतादरम्यान नेमकं काय घडलं?

ज्या लोकांना कॅटलोनिया स्पेनपासून वेगळा व्हावा असं वाटत नव्हतं त्या लोकांनी या सार्वमतावर बहिष्कार टाकला होता.

या चाचणीनंतर कार्ल्स पुजडिमाँ आणि इतर नेत्यांनी स्वातंत्र्याची घोषणा केली. पण, लगेच ती घोषणा रद्द करण्यात आली.

काय आहे कलम 155 ?

स्पेनच्या राज्यघटनेनुसार आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये तिथल्या केंद्र सरकारला कोणत्याही स्वायत्त राज्यावर थेट नियंत्रण मिळवण्याचा अधिकार मिळतो. आतापर्यंत ही परिस्थिती स्पेनमध्ये कधीच उद्भवली नव्हती.

एखादी गोष्ट जनहिताची नसेल तर त्या परिस्थितीमध्ये सरकार देशातील कोणत्याही प्रांताचं थेट नियंत्रित करू शकते. वेळ आल्यास बळाचा वापर करण्याची परवानगी देखील या कलमामुळे सरकारला आहे.

कॅटलोनिया हा प्रदेश स्वायत्त आहे. पोलीस प्रशासन, शिक्षण आणि आरोग्य सेवांचं नियंत्रण स्थानिक सरकारकडे आहे.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)