छेड काढणाऱ्यांना मुलांसोबत ही मुलगी काढते सेल्फी!

छेड काढणाऱ्या मुलांचा प्रतिकार करण्याची जगावेगळी पद्धत.

फोटो स्रोत, INSTAGRAM

फोटो कॅप्शन, छेड काढणाऱ्या मुलांचा प्रतिकार करण्याची जगावेगळी पद्धत.
    • Author, लिंजी ब्राऊन
    • Role, बीबीसी न्यूजबीट

जगात असा एकही कोपरा नसेल जिथे महिलांची छेड काढली जात नाही. छेड काढणे, शिटी मारणे, अश्लील शेरेबाजी करणे या गोष्टींचा त्रास महिलांना जगभर सहन करावा लागतो.

अनेकदा महिला त्याकडे दुर्लक्ष करतात किंवा त्याची तीव्रता जर अधिक असेल तर प्रतिकार करतात. पण अॅमस्टरडॅममधल्या एका विद्यार्थिनीने एक जगावेगळा मार्ग शोधून काढला आहे.

तिची छेड काढणाऱ्या व्यक्तीसोबत ती सेल्फी घेते आणि कॅटकॉलर या तिने तयार केलेल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर टाकते. 20 वर्षांच्या नोआ जानसामाने गेल्या काही दिवसांपासून आपली छेड काढणाऱ्यांसोबत सेल्फी घ्यायला सुरुवात केली आहे.

नोआ जानसामा

फोटो स्रोत, INSTAGRAM

फोटो कॅप्शन, ती सेल्फी घेते आणि कॅटकॉलर या इंस्टाग्रामवर अकाउंटवर टाकते.

तिनं बीबीसीला सांगितलं की ती जेव्हा रस्त्यावरुन फिरत असताना तिची नेहमीच छेड काढली जायची. काही जण तर तिला शारीरिक संबंधांची मागणी देखील करायचे.

"जर माझी कुणी छेड काढली, तर काय करावं हे मला सुचतचं नव्हतं. जर मी प्रतिकार केला तर परिस्थिती आणखी बिघडेल, ही भीतीदेखील मला सतावत होती."

"या गोष्टीकडं दुर्लक्ष करण्याची पण माझी इच्छा नव्हती. काही लोक छेडछाड करून सहीसलामत सुटतात आणि त्यांच्यावर काही कारवाईही होत नाही, हे पाहून मला दुःख वाटलं.

तेव्हापासून मी छेड काढणाऱ्यांना सेल्फी काढण्याची विनंती करू लागले. ते लोक लगेच तयार होत असत. काहींना तर अभिमानदेखील वाटतो," ती सांगते.

नोआ जानसामा

फोटो स्रोत, InSTAGRAM

फोटो कॅप्शन, 'छेड काढणाऱ्यांकडं दुर्लक्ष करून चालणार नाही.'

"सेल्फी घेण्यामागचा उद्देश काय, असं मला त्यांच्यापैकी फारसं कुणी विचारत नाही. त्यामुळं मी त्यांना सांगत नाही. आतापर्यंत फक्त एकाच व्यक्तीनं मला विचारलं की हे नेमकं कशासाठी आहे. मी त्याला याबद्दल सांगितले. पण त्याने तरीदेखील सेल्फी घेऊ दिला," नोआ सांगते.

तिला हा प्रकल्प महिनाभर चालवायचा आहे.

नोआ म्हणते, "माझ्या मित्रांना ही कल्पनादेखील नसते की महिलांना कोणत्या त्रासाचा सामना रोज करावा लागतो."

नोआ जानसामा

फोटो स्रोत, Instagram

फोटो कॅप्शन, 'समाजात जागरुकता निर्माण व्हावी म्हणून मी हे सेल्फी घेते.'

"जगातल्या 50 टक्के समाजाला रोज कोणत्या ना कोणत्या त्रासाला सामोरं जावं लागतं. पण उरलेल्या अर्ध्या समाजाच्या हे गावी देखील नसतं, हे जरा मला विचित्रच वाटतं."

"मला या पुरुषांचा अपमान करायचा नाही. तर मला फक्त या गोष्टीबद्दल जागरुकता निर्माण करायची आहे," असं ती म्हणते.

"जर या पुरुषांनी मला म्हटलं की आमची छायाचित्रं काढून टाका तर मी ती जरूर काढून टाकेन. मला त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करायचं नाहीये," अशी ती पुस्ती जोडते.

नोआ जानसामा

फोटो स्रोत, Instagram

फोटो कॅप्शन, तिला अनेक लोकांचं समर्थन मिळत आहे.

"माझी प्रतिक्रिया ही केवळ एखाद्या आरशासारखी आहे. ते लोक माझ्या खासगी आयुष्यात डोकावत आहेत तर मी पण त्यांच्या आयुष्यात डोकावत आहे, असा माझ्या या प्रकल्पाचा अर्थ आहे," असं स्पष्टीकरण ती देते.

"माझा प्रकल्प जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा असं मला वाटतं. ही जागतिक समस्या आहे. त्यामुळं मी माझं अकाउंट दुसऱ्या देशातल्या दुसऱ्या महिलेला देणार आहे, जेणेकरुन हे समजेल की दुसऱ्या देशात किंवा शहरातदेखील सारख्याच समस्या आहेत का."

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)